घणसोली हायस्कूल येथे स्वच्छता हीच सेवा उपक्रम संपन्न

 शेतकरी शिक्षण संस्था हायस्कूल घणसोली येथे ‘स्वच्छता हीच सेवा' अभियान अंतर्गत एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपूर्ण देशात ‘सेवा पंधरवडा अभियान' राबविले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ ऑवटोबर रोजी घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्था हायस्कूल येथे आमदार रमेश पाटील यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छता हीच सेवा' अभियान अंतर्गत एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्यात आला.

देशातील प्रत्येक शहरात, गावांमध्ये एकाच वेळी १ तास स्वच्छतेसाठी या ‘महाश्रमदान'चे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वच्छतेची मोठी गरज लक्षात घेऊन स्वच्छ, निरोगी आणि सशक्त भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहिली. राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता मोहीम भारत सरकारचा सर्वात जलद आणि क्रांतिकारी उपक्रम असून त्याच अनुषंगाने आ. रमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

या स्वच्छता मोहिमेमध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध मान्यवरांनी सहभाग घेऊन स्वच्छतेची शपथ घेतली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आमदार रमेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला.

मानवी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून स्वच्छता मोहीम पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर असल्याचे आ. रमेश पाटील यांनी सांगितले. तसेच स्वच्छता मोहीम फक्त एका दिवसापूर्ती मर्यादित नसून ती राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने सदर मोहीम यशस्वी होण्याकरिता मोठा लोकसहभाग असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नवी मुंबई मधील अनधिकृत शाळांना १५ कोटी ५४ लाख रुपये दंड