सायबर गुन्हे व अंमली पदार्थाबाबत विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांकडून मार्गदर्शन

सायबर क्राइम व अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर व्याख्यान

नवी मुंबई : वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती, ऑनलाईन होणारी फसवणूक, लैंगिक शोषण, अंमली पदार्थांचे सेवन, व्यसनाधीनता या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पनवेल तालुका पोलीस स्टेशन व अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने वावंजे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीराम शेठ पाटील ज्यु. कॉलेजमध्ये शुक्रवारी सायबर क्राइम व अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेल तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पोवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा देवून बौध्दिक कुवत सिध्द करण्याचा प्रयत्न करा, यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांची माहिती मिळवून शासकीय अधिकारी होण्याचे ध्येय ठेवा, जमिनीची विक्री करुन ऐशोआरामाचे जीवन जगण्याकडे समाजाचा कल वाढत आहे. त्यामुळे जमीनी विकू नका, असे आवाहन केले. त्याचप्रमाणें गळ्यात सोनं घालून दिखाऊपणा करण्यापेक्षा सोनं बँकेत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा, घराला सेफ्टी दरवाजे लावा, वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा. त्याचबरोबर मुलींनी सोशल मिडीयापासून दूर राहत स्वत:च्या करिअरकडे लक्ष द्या, गुड टच, बॅड टच ओळखायला शिका, अनोळखी मॅसेज, व्हिडीओ कॉल यांना प्रतिसाद देऊ नका अशा मार्मिक घटकांवर भाष्य करत विद्यार्थ्यांशी व्याख्यानाद्वारे पोवार यांनी संवाद साधला.  

तर अंमली पदार्थाचे सेवन करणे म्हणजे स्वत:चे आयुष्य स्वत: उद्ध्वस्त करण्यासारखे आहे. तसेच तरुणपिढी उद्ध्वस्त करुन भारताला नामशेष करण्यासाठी परराष्ट्रातून ड्रग्ज, गांजा या सारख्या अंमली पदार्थांचा पुरवठा होतो. सायबर गुन्हे वाढत असल्याने मोबाईलवरील अनोळखी लिंक ओपन करु नका, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस उप निरीक्षक विजय शिंगे यांनी केले.  

व्यसनाधीन व्यक्ती व्यसनाच्या पुर्ततेसाठी चोरी, लुटमार करतात आणि गुन्हेगार बनतात. व्यसनाधिनतेमुळे मानसिक आजार बळावतात. प्रसंगी अंमली पदार्थ मिळवताना कोणत्याही थरला ती व्यक्ती जाऊ शकते. भावनिक आव्हाने,खोटी प्रलोभने ओळखायला शिका, सुजाण नागरिक बना असे मत पोलीस हवालदार विकास साळवी यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचे चेअरमन जी. आर. पाटील, विद्यालयाचे प्राचार्य कारंडे , ग्रामस्थ रविंद्र पाटील व प्रकाश भेरे आदी उपस्थित होते.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलिबाग येथे जनसंवाद पदयात्रा