नवी मुंबई महापालिका तर्फे ३२८ शिक्षक सन्मानित

गुणवंत विद्याार्थी घडवणाऱ्या महापालिका शाळेतील शिक्षकांचा गौरव

नवी मुंबई : शिक्षक दिन देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शिष्यवृत्तीसह इतर स्पर्धा परीक्षा, विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा, शालांत बोर्ड परीक्षा यामध्ये गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या महापालिका शाळांतील शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी आमदार गणेश नाईक, ‘बेलापूर'च्या आमदार  मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे, शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट, भांडार विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई समृध्द विचारांचे शहर असून दरवर्षी पटसंख्या वाढणारे महापालिकेचे शिक्षण व्हिजन कौतुकास पात्र आहे. यामागे शिक्षकांचे फार मोठे योगदान असून शिक्षण विभागाचा शाळानिहाय पॅटर्न तयार करण्याची सूचना आमदार नाईक यांनी केली.

याप्रसंगी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला. कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीत त्याच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचा मोठा वाटा असतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही आमदारांनी ठोक मानधनावरील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना महापालिकेला केल्या.
आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षण पध्दतीवर पालकांचा इतका विश्वास असल्यामुळेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी हजाराहून अधिक वाढत असल्याचे सांगितले. यावर्षी सीबीएससी बोर्डाची तिसरी शाळा सुरु झाली. तेथील प्रवेशासाठी वेगवेगळया स्तरातून मोठ्या प्रमाणात फोन आल्यामुळे नवी मुंबई शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व जाणवले, असेही आयुवत नार्वेकर म्हणाले. कोव्हीड कालावधीमुळे मागील तीन वर्ष होऊ न शकलेला शिक्षक दिन समारंभ यावर्षी उत्साहात साजरा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच दोन्ही आमदारांनी उल्लेख केलेल्या ठोक मानधनावरील शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत लवकरच निर्णय घ्ोण्यात येईल, असेही आयुवतांनी सांगितले.

याप्रसंगी सुप्रसिध्द साहित्यिक, वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी ‘अध्यापनाचे दीपस्तंभ' या विषयावर शिक्षकांशी सुसंवाद साधत त्यांचे प्रबोधन केले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता १० वी शालांत परीक्षेत १०० टक्के निकाल लागलेल्या सन २०२२ आणि २०२३ या शैक्षणिक वर्षातील महापालिका माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन २०२१, २०२२, २०२३ या वर्षातील पाचवी आणि आठवी इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. तसेच चेन्नई येथील युवा शास्त्रज्ञ प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी समुहाचे मार्गदर्शक शिक्षक त्याचप्रमाणे अगत्स्या फाऊंडेशन, थिंग बिग सायन्स कार्निव्हल आणि बाल वैज्ञाानिक परिषद, जिल्हास्तर विज्ञान परिषद यामध्ये सहभागी विदयार्थी समुहाचे मार्गदर्शक शिक्षक यांनाही सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र समन्वयक, माध्यमिक शाळा समन्वयक, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तांत्रिक सहाय्य करणारे शिक्षक, सर्व शिक्षा अभियानातील विषयतज्ञ, एमआयएस समन्वयक, आयई समन्वयक, रिसोर्च टिचर तसेच डॉक्टरेट पदवी धारण केलेले महापालिका शाळांतील चार शिक्षक अशा ३२८ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

शाळा क्रमांक-४२, घणसोली गाव येथील विद्यार्थी समुहाने ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या शाळांना सन्मानचिन्ह तसेच त्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांना प्रशस्तीपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स तर्फे अभीयंता दिन साजरा