शिक्षक दिनानिमित्त महापालिकेची विद्यार्थ्यांना भेट

 पनवेल महापालिकेच्या सर्व शाळा झाल्या डिजीटल

पनवेल : छडी लागे छम छम... विद्या येई घम घम... असा वाक्यप्रचार पूर्वी खूप प्रसिध्द होता, विद्यार्थ्यांकडून घोटवून घोटवून घेऊन त्याला परीक्षेत लिहायला लावण्याच्या संकल्पनेतून आपण बाहेर पडले आहोत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याला दृकश्राव्य माध्यमाचा लाभ घेता आला पाहिजे. या माध्यमातून कितीही जटील संकल्पना सोप्या पध्दतीने शिकविली जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. महापालिकेच्या शाळा डिजीटल झाल्याने येणाऱ्या काळात महापालिकेचे विद्यार्थीही विविध स्पर्धांमध्ये बक्षीसे घेतील, खासगी शाळांनाही त्यांची दखल घ्यावी लागेल. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व प्रशासनातील अधिकारी आणि शिक्षक उत्तम पध्दतीने काम काम करत आहे. येणाऱ्या काळात पनवेल महापालिका शिक्षणाच्या बाबतीत अव्वल ठरेल, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.

पनवेल महापालिकेच्या वतीने सर्व शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. ६ सप्टेंबर रोजी लोकनेते दि. बा. पाटील शाळेमध्ये डिजीटल क्लासरुमचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ‘भाजपा'च उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अतिरक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, माजी नगरसेवक नितीन पाटील, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी किर्ती महाजन, सन सिस्टम कंपनीचे लक्ष्मण वायकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी केले.

राज्य शासनाचे शाळांना प्राधान्य देण्याविषयीचे महापालिकांना निर्देश होते. त्याप्रमाणे इमारत सुव्यवस्थित करणे, शाळा डिजीटल करणे, वाचनालय उभारणे, संगणक कक्ष उभारण्यावर भर देण्यात येत आहे. या कामांमध्ये सगळयाच अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. पुढील काळात डिजीटल माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्याने अभ्यासक्रम सोपा वाटणार आहे. पुढील काळात महापालिकेच्या शाळांना विविध सोयीसुविधा देण्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे आयुवत गणेश देशमुख यांनी सांगितले.

डिजीटल क्लासरुम करणारी पनवेल महापालिका  एमएमआरडीए भागातील एकमेव महापालिका...
पनवेल महापालिकेच्या ११ शाळांमध्ये एकूण ५७ डिजीटल बोर्ड बसविण्यात आले आहे. एमएमआरडीए भागातील सर्व शाळा डिजीटल करणारी पनवेल महापालिका एकमेव महापालिका आहे.

डिजीटल बोर्ड...
या डिजीटल बोर्डमध्ये अंतर्गतच कॉम्प्युटर जोडलेला आहे. या डिजीटल बोर्डमध्ये मराठी, उर्दू, गूजराती अशा तीन माध्यमातील पहिली ते सातवीच्या वर्गांचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे. तसेच युट्युबचा पर्यायही यावर उपलब्ध आहे. कॉम्प्युटर प्रमाणे यामधील हव्या असणाऱ्या वर्गाच्या, हव्या त्या विषयातील धड्यावर जाऊन सिलेक्ट केले असता, ॲनिमेटेड स्परुपात तसेच शिक्षक शिकवतात. त्याप्रमाणे सर्व अभ्यासक्रम स्क्रीनवर दिसणार आहे. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही करता येणार आहे. डिजीटल बोर्ड शेअर करुन एकाचवेळी शिक्षकांना अनेक वर्गांना शिकविता येणार आहे.

यावेळी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोदी शाळा क्रमांक-८ येथील मुख्याध्यापिका अश्विनी भोईर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच येथून पुढे दरवर्षी महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी घोषित केले. त्यासाठी कमिटी गठीत करण्यात येणार असून कमिटी आपला अहवाल सादर करणार आहे. त्या अहवालाप्रमाणे सुचविण्यात आलेल्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नवी मुंबई महापालिका तर्फे ३२८ शिक्षक सन्मानित