६ महिला शिक्षिका आणि ९ पुरुष शिक्षक यांचे अन्नत्याग आंदोलन

 शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका शिक्षकांचे आमरण उपोषण

तुर्भे : नवी मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका, मदतनीस, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांनी ठोक मानधनांमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी महापालिका मुख्यालय समोर आमरण उपोषण चालू केले आहे. यामध्ये ६ महिला शिक्षिका आणि ९ पुरुष शिक्षक यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे, अशी माहिती शिक्षक कृष्णा राठोड यांनी दिली. या शिक्षकांना पाठिंबा देणारे दोनशेहून अधिक शिक्षक ४ सप्टेंबर रोजी सकाळपासून तळपत्या उन्हामध्ये महापालिका मुख्यालयासमोर ठिया मांडून बसले आहेत.

महापालिका मधील प्राथमिक शिक्षकांना २० हजार, माध्यमिक शिक्षकांना २५ हजार, बालवाडी शिक्षकांना १५ हजार, मदतनीस यांना १२ हजार रुपये ठोक मानधन आहे. यापैकी सर्वांच्या मानधन मधून प्रत्येकी २ हजार रुपये प्रत्येक महिन्याला भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात केली जात आहे. त्यामुळे उरलेल्या तुरपुंज्या वेतनात प्रपंच कसा चालवायचा?, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. मागील ७ वर्षांपासून या शिक्षकांना कोणत्याही प्रकारची वेतन वाढ देण्यात आली नाही. त्याचवेळी आरोग्य विभाग आणि एनएमएमटी उपक्रमाच्या ठोक मानधन वरील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे यावर्षी आणि मागील वर्षी दोन वेळा वेतन वाढ देण्यात आली आहे.

महापालिकेने नवीन सुरु केलेल्या सीबीएससी शाळा किंवा इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना अनुक्रमे ३५ हजार आणि २७ हजार रुपये वेतन दिले जाते. मग १२ वर्षांपासुन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार देवून महापालिका त्यांची थट्टा करत आहे का?, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे. लवकरात लवकर वेतन वाढ व्हावी यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे, असे शिक्षक कृष्णा राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शिक्षक प्रतिनिधींची बैठक घ्ोतली होती. या बैठकीमध्ये १५ दिवसांमध्ये शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जुलै महिन्यामध्ये देखील मानधन वाढीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिक्षक आमरण उपोषणावर ठाम राहिले आहेत. 

 

--

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शहरातील सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना