मुशाफिरी : शराब करी खराब

शराब करी खराब

   ‘कौन कंबख्त बर्दाश्त करनेके लिए पिता है' असा एक संवाद ‘देवदास' नावाच्या सिनेमात आहे. अर्थात असले चित्रपटीय व त्या त्या कथानकाची गरज म्हणून लिहीले गेलेले संवाद बाकीच्यांनी फारशा गांभीर्याने घ्यायचे नसतात म्हणा! दारु, सुरा, सोमरस, मद्य, शराब, लिकर या व अशा अनेक नावांनी सर्वांना परिचित असलेल्या अंमली द्रवापासून आपल्या मुलाने, भावाने, नवऱ्याने, भाच्याने, पुतण्याने कायमचे दूरच राहावे अशाच अर्थाचे संस्कार चांगल्या घरांमधून केले जात असतात. ‘दारु पी' असे कोणतीच सुसंस्कारी माता, पत्नी, बहीण, आजी, काकी, मामी कधीही सांगत नसते. ...आणि जिथे असे सांगितले जाते ते घर कधीही चांगले नसतेच!

   या दारुला म्हणे पुराणकालीन इतिहास आहे. मग त्याचप्रमाणे या दारुचे प्राशन करुन स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे वाटोळे करुन घेण्यालाही तितकाच जुना इतिहास असणार! काही विद्वान लोक सांगतात की ‘देवही दारुचा अर्थात सोमरसाचा आस्वाद घ्यायचे, मग आम्ही प्यालो तर कुठे बिघडले?' यातून हे विद्वान स्वतःला त्या बाबतीत देवांच्या रांगेत बसवू पाहतात. पण देवत्व, त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य, त्यांची वर्णिनेली कर्तव्ये याचा मात्र यांना रीतसर विसर पडतो आणि दारुचेच तेवढे ‘सोयीने' लक्षात ठेवले जाते. मराठीतील विख्यात साहित्यिक राम गणेश गडकरी यांनी ‘एकच प्याला' हे नाटक लिहिले आणि त्यातून सुधाकर या गृहस्थाची करुण कहाणी नाट्यरसिकांसमोर आणली. आर्य मदिरा मंडळ, तळीराम, सिंधु या साऱ्यातून या दारुबद्दल त्यांनी सांगितले खरे; पण स्वतः गडकरी हे या अतिदारुपान व अतिधूम्रपानामुळे वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी हे जग सोडून कायमचे निघून गेले. कलावंत, सर्जनशील व्यक्तीमत्वे ही म्हणे कलंदर, अवलिये, स्वच्छंदी असतात. त्यांच्या मनाला येईल तसे वागतात. कुणाचे फारसे ऐकत नसतात. मराठीतील एक ज्येष्ठ गायक गायनाच्या मैफिली करताना समोर जो पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचे, त्यातही दारु भरुन ठेवत. आता बोला!

   अर्थात नाट्यसृष्टी, चित्रपट-मालिका हे विश्वच मुळात निसरडे, मोहाचे, भुलभुलय्याचे, फसण्याची जास्त शक्यता असणारे आहे. मग तिथे काम करणाऱ्यांनी किती सावध असायला हवे? त्याऐवजी अकाली, अवचित, अचानक मिळालेल्या किंवा पात्रतेनुसार प्राप्त झालेल्या प्रतिष्ठा, प्रसिध्दी आणि पैसा यामुळे अनेकांचा तोल सुटतो आणि ते नशापानाच्या अतिरिक्त आहारी जातात. या मनोरंजन जगतात दारु पिऊन अकाली मृत्यु पावलेल्यांची संख्या खूप आहे. मात्र तरीही त्यानंतरची येणारी या क्षेत्रातील पिढी त्यावरुन कोणताच धडा घेऊ पाहात नाही, हे घोर दुर्दैवाचे! ज्याला इंडियन मेड फॉरिन लिकर किंवा सॉपट ड्रिंकचा एक प्रकार मानले जाते अशा बीयर उत्पादक कंपनीत मी अनेक वर्षे काम केले; मात्र उभ्या आयुष्यात मला त्या बीयरचा किंवा दारुच्या कोणत्याही प्रकाराचा घोट घ्यावा, चवीपुरती तरी चाखावी असे कधीही मनात आले नाही. उलट तिथे काम करताना मी काही कामगारांना दारु सोडावी यासाठी आग्रह धरत असे व त्यामुळे काहीजणांची दारु सुटलीही! अर्थात त्याचे श्रेय त्या त्या व्यवतींच्या मनोनिग्रहालाच जाते. कारण दारु पिणे हे व्यसन आणि एक आजार आहे. त्यावर इच्छा असेल तर मात करता येते. महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या ‘नशाबंदी मंडळ' आयोजित विविध स्पर्धांमधून मी तेंव्हाही भाग घेऊन पारितोषिके पटकावीत असे. एवसाईज अधिकाऱ्यांशीही माझे चांगले जमत असे. एक संवेदनशील अधिकारी म्हणत...इतरांची घरे बरबाद करुन दारु उत्पादक आपापली घरे आबादीआबाद करीत आहेत.  माझ्याप्रमाणेच कोणतेही घातक व्यसन नसलेले अन्यही काही सहकारी त्यावेळी होते. कल्याण पूर्वेस ज्या गावात माझे एकेकाळी वास्तव्य होते.. तेथील काही ठिकाणी दारु गाळण्याचा घरगुती व्यवसाय (हातभट्टी) चालत असे. त्यामुळे तेथील काही घरांची झालेली बरबादी, पोलीस-एवसाईजच्या लोकांनी तेथे छापे टाकणे, तेथे दारु प्यायला येणाऱ्या लोकांचे ते लटपटणे, गटारात पडणे, पडून मरणे, त्यांच्या घरच्या महिलांना अकाली विधवापणाचा सामना करावा लागणे, त्यांच्या मुलाबाळांची होणारी आबाळ, वाया जाणे, शैक्षणिक नुकसान होणे, सामाजिक अप्रतिष्ठा होणे, ‘बेवड्याची मुले' म्हणून त्यांच्या वाट्याला समाजाची अवहेलना येणे हे व असे अनेक प्रकार मी पाहात आल्याने दारु प्रकाराबद्दल माझी मनोभूमिका स्पष्ट झाली होती. त्यामुळे सहकारी, मित्र, सोबती निवडताना मी नेहमीच चोखंदळ राहिलो आहे. दारु प्यालेली व्यक्ती कशी वागते, दारुच्या अंमलाखालील व्यक्ती समोरच्याच्या नजरेला नजर न देता कशी वावरते, दारु मिळवण्यासाठी कोणत्याही थराला कशी जाते, दारुचा वास इतरांना जाऊ नये म्हणून बाम किंवा  तत्सम उग्र वासाचे काहीतरी अंगाला कसे लावून घेते हे सगळे प्रकार मी पाहात आलो आहे.

   देशाचे केंद्र व राज्य सरकार हे दारुबंदी बाबत अनेक उपक्रम राबवत असल्याचे सांगितले जात असले तरी ते अर्धसत्य आहे. दारुमुळे मिळणाऱ्या उत्पादन शुल्क, अबकारी करावर कुणालाच पाणी सोडायचे नाही हे वास्तव आहे. भारतातील अनेक राज्यांत दारुबंदी जाहीर केली गेली व नंतर ती मागे घेतली गेली. शेजारच्या गुजरात राज्यात दारुबंदी आहे. पण चोरटी दारु तिथे मुबलक प्रमाणात मिळते, हे कुणीही पाहू शकेल. वाशीच्या साहित्य मंदिरातील एका कार्यक्रमाच्या भाषणामध्ये नवी मुंबईतील विख्यात बांधकाम व्यावसायिक श्री. सुरेश हावरे म्हणाले होते की, दारुबंदी व दारु दुकाने, दारुची गोदामे, बार यांना परमिट देणारी खाती एकाच सरकारची अंगे असतात.

   दारु सेवनाने होणाऱ्या नुकसानीचा सर्वाधिक दुष्परिणाम हा रस्ते अपघातातून दिसून येतो. दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांकडून निष्पाप, कोणतीच चूक नसलेल्या इतरांचे प्राण अपघातांमुळे गेले आहेत. केवळ काही ठिकाणीच वाहतूक पोलीस ‘ब्रेथ अनालायझर' लावून चालकांची तपासणी करतात. पण शेकडो नव्हे, हजारो वाहनचालक हे दारुच्या अंमलाखाली वाहने चालवून इतरांच्या मृत्यूंचे कारण बनतात, ते या तपासणीच्या फेऱ्यात येतच नाहीत. समृध्दी महामार्ग सध्या अपघातांच्या बाबतीत एक नंबरवर आहे. तेथे वाहन घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाची ‘ब्रेथ अनालायझर'ने तपासणी करुन दारुच्या अंमलाखाली असणाऱ्यांना प्रवास नाकारला व त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द केले तेथील अपघातांचे प्रमाण कित्येक पटींनी कमी होईल. दारु प्याल्याने लिव्हर खराब होते, गाल अकाली ओघळतात, लैंगिक क्षमता घटून नपुंसकत्व येण्याचा धोका वाढतो, रवत दूषित होते, रक्तदान करुन इतरांच्या उपयोगी पडण्याची शक्यता संपते, दारु प्राशनाने येणाऱ्या श्वासदुर्गंधामुळे चांगली माणसे दारुड्यांपासून अंतर ठेवत वागतात, कामाच्या जागी लोक बेवड्यांची टिंगल करतात, दारुड्या माणूस  पत्नी-मुलीचे समाजातील वाईट नजरेच्या माणसांपासून रक्षण करण्यास असमर्थ ठरत जातो हे व असे शेकडो तोटे  केवळ दारुप्राशनामुळे सोसावे लागतात...आणि तरीही लोक दारु प्यायचे सोडत नाही व सरकार शंभर टक्के दारुबंदी करायचे धोरण अवलंबत नाही..हा किती मोठा विरोधाभास म्हटला पाहिजे.  

   अनेक मामल्यात लिकर, वाईन हे औषध म्हणून घ्यायला किंवा अति थंड प्रदेशात शरीरात उष्णता यावी म्हणून घेण्यास मान्यता आहे. पण औषध हे चमचा किंवा कपातून तेवढ्यापुरते व आजारातून बाहेर पडण्यासाठीच घ्यायचे असते. अर्धा लिटर बाटलीभर औषध कुणी आजारी व्यक्ती रिचवत नसते. पहिल्या धारेची दारु म्हणे रॉकेलसारखी पेट घेते. अनेक लिकर, वाईन मधून मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल असते.  मग तुम्ही विचार करा..ही दारु बेवडे लोकांच्या पोटात जाऊन त्यांच्या आतड्यांचे, पचनसंस्थेचे व त्यांचे एकूणच किती वाटोळे करीत असेल? माफक प्रमाणात विष जरी घेतले तरी पचते असे म्हणतात. दारु, वाईन, लिकर, मद्य रास्त प्रमाणात सेवन करुन सुयोग्य शरीर राखणारे व समाजातील आपली इभ्रतही जपणारे अनेकजण माझ्या पाहण्यात आहेत.  जे मद्यपान करतात.. पण त्याची वकिली किंवा मद्यपानाचे जाहीर समर्थन करीत नाहीत..त्यांचे मद्य प्राशन त्यांच्या व त्यांच्या समूहापुरतेच सिमीत असते. ..आणि अति पिण्याने वाया गेलेले, गल्लोगल्ली रस्त्यात पडलेले, दारु पिऊन पगार उडवल्याने याच्या त्याच्याकडे भिका मागणारे, अति मद्य प्राशनाने विविध रोगांची लागण झालेले, कामाच्या ठिकाणी अप्रतिष्ठा झालेले पुरुष आणि स्वतःला मॉडर्न भासवण्याच्या प्रयत्नात दारु पिणाऱ्या काही नटखट, नटरंगी महिला याही तुम्ही जिकडे तिकडे पाहात असालच. यांच्या मुलाबाळांवर काय परिणाम होत असेल? अशांच्या घरच्यांनी, मित्रपरिवाराने, डॉक्टरांनी, समाजसेवी संस्थांनी वेळोवेळी समजावूनही ‘आम्ही आमच्या पैशाने पितो, तुमच्या वडिलांचे काय जाते?'  असे म्हणणारे आर्य मदिरा मंडळाचे काही विद्वान तळीरामछाप सदस्यही अवतीभवती वावरत असतात. त्यांनी स्वतःच्या पैशांनी खुशाल मद्य प्राशन करावे... पण मग त्यानंतर स्वतःच्या पायांनी स्वतःच्याच घरी जावे, मित्रांचा आधार  घेऊ नये आणि मदतीसाठी कुणाकडे हातही पसरु नये..या पलिकडे आपण बापुडे काय म्हणणार?

(मुशाफिरी)  राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक: दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पंचनामा : राजाची सद्‌सद्‌विवेकबुद्धी कधी जागी होणार ?