महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मुशाफिरी : साराच दोष पावसाचा नसतो!
साराच दोष पावसाचा नसतो!
काही अपवाद वगळता असा मुसळधार पाऊस अचानक पडत नाही. आपल्या कॅलेंडरमध्ये दिल्यानुसार तो जुन ते सप्टेंबर या महिन्यांतच अधिककरुन पडतो, जुलै मध्ये खूपच पडतो हे साऱ्यांना माहित असूनही त्यानुसार मग आपले रस्ते, पूल, भूस्खलनाची शक्यता असलेल्या जागा, पूराची शक्यता असलेली गावे-शहरे-वस्त्या यांचे अत्याधुनिक व उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने संभाव्य धोक्यांपासून बचावासाठी नियोजन, सुधारणा, उपाययोजना करणे शवय आहे. पण ते केले जात नाही, संकटे आल्यावर धावाधाव केली जाते, हे खेदजनक आहे.
दरवर्षी जुलै महिना आला रे आला की निसर्गात मोठी उलथापालथ होताना दिसून येते. प्रचंड पावसाचा, पूराचा, दुर्घटनांचा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण करणारा हा जालिम महिना आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. फार मागचे नाही. नऊ वर्षांपूर्वीचे सांगतो. ३० जुलै २०१४ या दिवशी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुवयात असणाऱ्या माळीण या गावाचा बाजूलाच असणाऱ्या डोंगराने घास घेतला आणि झोपेत असलेल्या गावकऱ्यांचा त्या मातीच्या ढिगाऱ्याखालीच दबून मृत्यू झाला. १५१ मृत व १०० जण बेपत्ता झाल्याचे सरकारी माहिती सांगते. प्रत्यक्षात काही वेगळा आकडाही असू शकेल. २४ जुलै २०२१ रोजी महाड येथील तळिये गावातही अशीच दुर्घटना घडली. त्याहीवेळी ४९ मृत आणि ४७ बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येते. आता रायगड जिल्हयातल्या खालापूर तालुवयातील इर्शाळगड येथे भूस्खलन होऊन २९ हून अधिक मृत तर १०० जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते. हे बेपत्ता झालेले लोक शक्यतो पुन्हा कधीही सापडत नसतात. याच काळात ठाकुर्ली येथे बराच वेळ थांबलेल्या ट्रेनमधून उतरुन रेल्वेमार्गातून चालणाऱ्या आजोबांच्या हातातून चिमुकली मुलगी सटकून नाल्यात पडली व वाहुन गेली. खूप वेळ शोधाशोध करुनही तिचा पत्ता लागला नसल्याने शोधकार्यही थांबवण्यात आले. ही झाली अलिकडच्या काळातील जुलै महिन्यात घडून गेलेली प्रामुख्याने ठाणे, रायगड व पुणे जिल्ह्यातील काही दुर्घटनांची उदाहरणे. त्यात भर पडतेय ती समृध्दी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांची. विविध शहरांत, गावांत तसेच बोरघाट, माळशेज घाट येथे कोसळणाऱ्या दरडींमुळे घडून येणाऱ्या दुदैवी घटनांची!
सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या काळात पावसाचा जोर हा सर्वोच्च असतो. पूर्वीच्या काळी केवळ नक्षत्रे, भरती-ओहोटी, पंचांग यांवर अवलंबून लोक अदमास बांधत असत. दरम्यान विविध शोध लागले. हवामान खाते अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज झाले. कोणते वादळ कधी येणार आहे, कोणत्या प्रदेशांतून जाणार आहे, समुद्रात कमी-जास्त दाबाचे पट्टे कधी तयार होतील, किती मीटर ऊंचीच्या लाटा उसळतील याचे जवळपास खरे ठरणारे ( होय..आधीच्या हवामान खात्याच्या अंदाजांची टिंगल उडवण्यात येत असे..) अदमास आता वर्तवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात नेहमी जाणारे आगरी-कोळी मासेमार बांधव, किनाऱ्यावर राहणारे नागरिक, नदीकाठची गावे, वस्त्या यांना सावधगिरीच्या सूचना देता येऊ लागल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना सज्ज ठेवता येण्याचा सशवत पर्याय उपलब्ध झाला आहे...आणि तरीही दुर्घटना वाढत आहेत. लोकांचे प्राण जाताहेत. रस्ते, रेल्वे, जल व हवाई अशा चारही प्रवासी मार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढच होत आहे.
याचाच अर्थ हा की आपण इतिहासापासून, मागील दुर्घटनांपासून काहीही शिकायला मागत नाही, सुधारणा करायला मागत नाही हाच होत नाही का? रायगड जिल्ह्यात भिरा येथे, खालापूर येथे तसेच सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे, आंबोली येथे, पाटण तालुवयात पाथरपुंज येथे, घाटघर..तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड पर्जन्यवृष्टी होते. पण अलिकडे असा तुफानी, संततधार पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग अशा कोकणपट्टीतील विविध जिल्ह्यांतून दरवर्षी जुलै महिन्यात पडू लागला असून २६ जुलै २००५ चा भिजका आणि थिजवून टाकणारा दिवस कोणताच मुंबईकर कधीही विसरु शकणार नाही. इतकी वर्षे हा पाऊस पडतोय, इतकी वर्षे तो नेहमीच रस्त्यांची चाळण करतोय, दरवर्षी नद्यांना त्यामुळे पूर येतात, अतिवृष्टीमुळे दरवर्षी शेकडो झोपड्या कोसळतात, अनेक जुन्या इमारती धराशायी होतात, जमिन खचते, पूल पडतात, शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्तांची दरवर्षी हानी होतेच; पण त्याहुनही मोलाची जिवितहानीही होत असते. पडणाऱ्या या साऱ्या पावसाचे पाणी गटाराला जाऊन मिळते, जे तुमच्या आमच्या वापराचे राहात नाही...आणि त्याच वेळी तिकडे विदर्भ, मराठवाड्यातील हजारो नागरिक, शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यांच्यातील अनेकांना पिण्याचे पाणीही पुरेसे मिळत नाही. रेन वाटर हार्वेस्टींगच्या अनेक गोष्टी नुसत्या केल्या जातात. पण पावसाचे पाणी हे असे गटारे, नदी, समुद्राला जाऊन मिळत असते, मग जलसंधारणाच्या योजनांवर किती काम झाले, ते कोणत्या टप्प्यात आहे, त्याची प्रगति काय आहे याबद्दल नागरिक मोर्चे काढत नाही. राजकारणी आंदोलने करीत नाहीत, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून कुणी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधत नाही. हिंदुत्वावर मोर्चे निघतात, देवळे उघडण्यासाठी मोर्चे निघतात, सिडकोने मशिदीकरिता भूखंड का दिला म्हणून आंदोलने होतात, पक्ष सोडलेल्या-पक्ष फोडून सत्ताकारणात घुसलेल्या लोकांवर तासन्तास चर्चा होतात, गद्दार-खोकेसम्राट-टरबुज्या-मनोरुग्ण-काेंबडीचोर-घरबश्या-पेंग्विन-आयत्या बिळावरचा नागोबा-टग्या या व अशा शेलवया शब्दात एकमेकांवर प्रहार केले जातात; पण माणसांची मूलभूत गरज असणारे जे पाणी आहे, ते पावसाचे पाणी असे वाहुन जात गटाराला मिळतेय..ते वाचवू या, त्यावर प्रक्रिया करुन ते वापरात आणू या, त्यासाठी जनमत संघटित करु या, सत्ताधाऱ्यांवर दबाब टाकू या असे कुणाच्याही मनात येत नाही, ही घोर शोकांतिका म्हटली पाहिजे.
काही अपवाद वगळता हा पाऊस काही अचानक पडत नाही. आपल्या कॅलेंडरमध्ये दिल्यानुसार तो जुन ते सप्टेंबर या महिन्यांतच अधिककरुन पडतो हे साऱ्यांना ठाऊक आहे. हे माहित असूनही त्यानुसार मग आपले रस्ते, पूल, भूस्खलनाची शवयता असलेल्या जागा, पूराची शवयता असलेली गावे-शहरे-वस्त्या यांचे अत्याधुनिक व उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने संभाव्य धोवयांपासून बचावासाठी नियोजन, सुधारणा, उपाययोजना करणे शक्य आहे. पण ते केले जात नाही. महाडच्या सावित्री नदीवरील पूल अशाच पावसात पडला व त्यात अनेक वाहने त्यातील प्रवाशांसह वाहुन गेली. असे कितीतरी जुनाट, मोडकळीस आलेले पूल राज्यात असतील. विविध जिल्ह्यांमधील दुर्गम भागातील गाव आणि शहर यांच्यामध्ये नदी असल्यामुळे तेथे लाकडाचे लटलटते साकव आहेत व त्यावरुन जीव मुठीत घेऊन आजही विद्यार्थी, कामगार, गावकरी प्रवास करत असतात. एका गरोदर महिलेला भर पाण्यातून असेच दवाखान्यात नेल्यावरही तिचा जीव गेल्याची घटना ताजी आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ येथील सावित्री नदीवरील जुन्या पूलाच्या दुरस्तीवर १२ कोटी रुपये खर्चूनही तो अद्याप सुरुच झालेला नाही. म्हणून महाडपर्यंतचा हेलपाटा साऱ्यांना घालावा लागतो. नव्या पुलाला मंजूरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे, प्रसंगी आंदोलन करणे, विधानसभेत प्रश्नांची सरबत्ती करणे हे कोकणातील व अन्य भागांतील अनेक आमदारांच्या गावीही नाही. त्याऐवजी जुनी शिवसेना विरुध्द नवी शिंदेसेना, जुना राष्ट्रवादी थोर्ले पवार गट विरुध्द नवा राष्ट्रवादी धाकले पवार गट, जुने काँग्रेसी गांधी घराणे निष्ठावंत विरुध्द नवे उच्चविद्याविभूषित टेक्नोसेव्ही आधुनिक काँग्रेसी, जुने आरेसेस प्रणित निष्ठावंत भाजपाई विरुध्द इकडून तिकडून धरुन आणलेले नवभाजपाई आणि मग हे सारे एकमेकांविरुध्द किंवा एकमेकांच्या सोयीने एकमेकांच्या वळचणीची भूमिका घेणारे असे वाद खेळत राहणे खूप सोप्पे! तेच होताना तर आपण सारे पाहतोय. पावसाने मुंबईची तुंबई करुन ठेवलीय, तर ठाणे झालेय केविलवाणे ! राज्यातील ह्या साऱ्या गोष्टींना केवळ एकटा पाऊस नव्हे, तर सर्वपक्षीय सत्ताधारी आणि एसी केबिनमध्ये बसून कारभार हाकणारी आपली नोकरशाहीही आणि बेजबाबदारपणे वागणारे काही नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. सारी अत्याधुनिक यंत्रसामग्री हाती असतानाही काही सन्माननीय अपवाद सोडल्यास बाबूशाहीला ढिम्म बसून राहायला, तहान लागल्यावरच विहीर खोदायला आवडते. काही अपवाद वगळता आपल्याकडील मतदारांनीही तेच ते आणि तेच ते बेजबाबदार, अप्रामाणिक, भ्रष्ट लोक निवडून देत राहिल्यास नागरिकांच्या नशिबी तरी आणखी वेगळे काय येणार म्हणा! नुसत्या पावसाला दोष देऊन काय फायदा?
(मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.