मानधनात वाढ करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी मुख्यालयासमोर भर पावसात आंदोलन

ठोक मानधनावरील प्राथमिक शिक्षकांचे आमरण उपोषण

तुर्भे : मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या ठोक मानधनावरील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, प्राथमिक माध्यमिक शिक्षक यांनी २५ जुलै रोजी महापालिका मुख्यालयासमोर भर पावसात उघड्यावर आमरण उपोषण सुरु केले आहे. सन २०१७ पासून या शिक्षकांच्या मानधनात वाढ झालेली नाही, अशी वस्तुस्थिती असून ती मानधनात वाढ करण्याविषयी प्रशासन सकारात्मक आहे. या संदर्भात लवकरच आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त अमरीश पटनिगीरे यांनी दिली.

महापालिकेत मानधन तत्वावर सन २०१० पासून प्राथमिक शिक्षक १३८, माध्यमिक  शिक्षक (ठोक मानधन) ५४, माध्यमिक (शिक्षण सेवक) ३१, बालवाडी शिक्षिका १२०, मदतनीस १२४ असे एकूण ४६७ शिक्षक, शिक्षिका, मदतनीस कार्यरत आहेत. या सर्व घटकांनी अनेक वर्षापासून वेतनवाढीची मागणी करुनही केवळ लवकरच वाढ करु, असे आश्वासन मिळाले असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

राज्यभरात शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना महापालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागात मोलाचा वाटा असणाऱ्या शिक्षकांना रोजंदारीप्रमाणे वागवले जात असून या शिक्षकांबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. परंतु, आम्हाला रोजंदारीप्रमाणे वागवले जात असून उन्हाळी सुट्टीत कायम शिक्षकांना लाखो रुपये पगार तर ठोक मानधनावरील शिक्षकांना मात्र बिनपगारी ठेवण्याचे काम महापालिकेने केले आहे. कायम शिक्षक आणि ठोक मानधन शिक्षक या दोन्हीही शिक्षकांचे काम समान असल्याने असा दुजाभाव का? असा प्रश्न उपस्थित करुन ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांनाही कायम शिक्षकांप्रमाणेच वेतनवाढ मिळावी, कायम सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पालकांनी शाळेत दिलेले नंबर सुरक्षित राहत नाहीत का?