मुशाफिरी : काकड्यांच्या पोरींची ष्टोरी

काकड्यांच्या पोरींची ष्टोरी

   मराठी सिनेमा आणि धो धो कलेवशन? पाच कोटी निर्मिती खर्च आणि हा मजकूर छापून येईल तोवर जवळपास अठ्ठावन्न कोटींची कमाई? हे काहीसं अविश्वसनीय आणि स्वप्नवत वाटणारं असलं तरी ते वास्तव आहे. हिंदीवालेपण म्हणे मागील व येणाऱ्या दोन-तीन आठवड्यात स्वतःचे सिनेमे प्रदर्शित करायला कचरताहेत. होय ! हे सारे प्रत्यक्षात घडतंय ते ‘बाईपण भारी देवा' या माधुरी भोसले निर्मित, वैशाली नाईक लिखित आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठी सिनेमाच्या चकित करणाऱ्या करामतीमुळे. एक मराठी लेखक, पत्रकार, सिनेरसिक, मुलाखतकार म्हणून मला तर बाबा याचा जाम अभिमान आणि आनंद आहे.

   आज पन्नास ते साठ या वयोगटात असणारी पिढी गेली कित्येक वर्षे मराठी सिनेमे बघत आली आहे. कृष्णधवल, गेवा कलर, सप्तरंगात, इस्टमनकलर वगैरे प्रकारात सिनेमे पाहिले. गणेशोत्सवात चटई, बारदानावर किंवा तसेच रस्त्यावर बसून आणि थेटरात जाऊन मराठी सिनेमांवर प्रेम करणाऱ्यांची आमची ती पिढी. तिकिट खिडकीवर रांगा लावून सहकुटुंब मराठी सिनेमाचा आस्वाद घेणाऱ्या त्या पिढीचे कित्येक सदस्य आज वयाच्या साठीच्या घरात असतील. मराठी चित्रपट म्हणजे लावणी, तमाशा किंवा मराठी चित्रपट म्हणजे गरीब बिच्चारी सून आणि तिला छळणारी खाष्ट सासू किंवा आगाऊ नणंद, मराठी चित्रपट म्हणजे राजा परांजपे, राजा गोसावी, रमेश देव, शरद तळवळकर, दादा साळवी, अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, रविंद्र महाजनी, रमेश भाटकर, जयश्री गडकर, सीमा, सुलोचनाबाई, रत्नमालाबाई, उमा, अनुपमा, ललिता पवार, आशा काळे, रंजना, उषा चव्हाण, उषा नाईक, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशांच्या अभिनयाची जुगलबंदी, मराठी चित्रपट म्हणजे दादा काेंडक्यांचे द्वर्थी संवाद, मराठी चित्रपट म्हणजे व्ही. शांताराम यांची आशयघनता, मराठी चित्रपट म्हणजे महेश-अशोक-लक्ष्या-सचिन-भरत-मकरंद यांचा मनमुराद धांगडधिंगा वगैरे समीकरणे रुढ झालेली या पिढीने पाहिली. त्याच पिढीला बिनधास्त, श्वास, चौकट राजा, सातच्या आत घरात, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धवका, सैराट, दुनियादारी, पक पक पकाक, क्षणभर विश्रांती, झिम्मा, वेड, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, वाळवी या व अशा चाकोरीबाहेरच्या चित्रपटांनी अशाही विषयांवर चांगले चित्रपट बनतात याचा भरवसा दिला. मुख्य म्हणजे सिनेमाची तांत्रिक बाजू खूप सुधारली, आणखी आशयघनता आली. फिरोझखान हा हिंदी निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता जसा चित्रीकरणाबाबत अजिबात तडजोड करीत नसे..तसे लॅव्हिश, सुरेख, नयनरम्य चित्रीकरण मराठी सिनेमांत अवतरले आणि पठडीतल्या मराठी चित्रपटसृष्टीने कुस पालटली. त्यालाही पुरेसा अवधी लोटला आहे.

   ‘बाईपण भारी देवा' हा चित्रपट पाहायला महिला वर्ग त्यांचे व्हाट्‌स अप समुह, भिशी समुह, सोसायट्या, महिला मंडळे, लोकल ट्रेनमधील समुह, नातेवाईक मंडळी अशा मिळून साऱ्याजणी जात आहे हीच किती मोठी आश्वासक बाब आहे. हा चित्रपट माझी पत्नी आणि सूनेने जाऊन पाहिला. त्यानंतर मी आणि मुलाने सोबत जाऊन नवी मुंबईतील त्याच चित्रपटगृहात पाहिला. या दोन्ही वेळी आजूबाजूला हिंदी-इंग्रजी बोलणारे अमराठी प्रेक्षकही सहकुटुंब तिथे आले होते हे विशेष सांगण्यासारखे आहे. या चित्रपटात काकडे यांच्या सहा मुलींची कथा सांगितली आहे. बाईपण म्हणजे रांधा, वाढा, खरकटी काढा, पुरुषवर्गाची मनमानी सोसा, गरोदरपण, बाळंतपण, मुलं वाढवणं, त्यांचे अभ्यास घेणं, सासू-नणंद यांच्याकडून छळवाद सोसणं या साऱ्याच्याही पलिकडे आणखी बरंच काही तापदायक असतं ते सांगणारा हा चित्रपट आहे. दुःख, वेदना, त्रास, अडचणी, मानहानी, जाच, छळ हा केवळ गरीब बायकांच्याच वाट्याला येत असतो, उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत महिलांना कोणतेही व्याप, ताप, मनःस्ताप असे नसतातच या पारंपारिक समजाला धवका देणारा हा चित्रपट म्हणूनच वेगळ्या वळणाचा ठरतो. सिनेमा म्हटला की देखणा-गोरागोमटा हिरो पाहिजे, नाजुक चणीची नटी पाहिजे, बागेत झाडाभोवती फिरत किंवा वलब्जमधली गाणी पाहिजेत, चवीला एखाद दुसरे आयटम साँग पाहिजे याही समीकरणाला ‘बाईपण' ने चाट दिली आहे. रोहिणी हट्टंगडी (जया), वंदना गुप्ते (शशी),  सुकन्या कुलकर्णी (साधना) शिल्पा नवलकर (केतकी), सुचित्रा बांदेकर (पल्लवी) आणि दीपा परब-चौधरी (चारु) अशा सहा विवाहित बहिणींच्या आयुष्याची ही कथा आहे. यातील काळ लक्षात घेतला तर या चित्रपटात मॉल्स दिसतात, मनाविरुध्द घडल्यावर या बहिणी मिळून साऱ्याजणी बियरचे घोटही घेताना दिसताहेत. म्हणजे गेल्या पंधरावीस वर्षातला हा काळ दिसतो आणि तरीही काकड्यांना सहा मुली होत्या (कुटुंबनियोजन, आटोपशीर परिवार याबद्दल काकडे सिरीयस नव्हते) हे पटायला जरा जड जाते. पण सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून तिकडे आपण फारशा गांभीर्याने नको पाहू या. वय वर्षे एक्केचाळीस ते साठीच्या पुढच्या साऱ्या अभिनेत्री, सिनेमात रुढ अर्थाने कुणीही हिरो नाही, फारशी गाणी नाहीत, सहा बहिणी, त्यांच्यातल्या आंतरक्रिया आणि मंगळागौरीची स्पर्धा एवढेच काय ते कथानक आणि तरीही चित्रपट सुपरडुपर हिट याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे यांना शंभरपैकी एकशे दहा गुण द्यायला हरकत नाही. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेमुळे तसेच ‘अगंबाई अरेच्चा'सारख्या काही सिनेमांमुळे केदार शिंदे यांचा घरोघरी जो कुटुंबवत्सल चाहता प्रेक्षकवर्ग तयार झाला होता, तो  ‘बाईपण'च्या वेळी चांगलाच कामी आलेला दिसतोय असे मी म्हटले तर वावगे ठरु नये.

    ‘बाईपण'च्या यशात अनेक घटकांचा वाटा आहे. त्यातील एक महत्वपूर्ण घटक म्हणजे चित्रपटाचे देखणे छायांकन. वासुदेव राणे यांनी ते काम अत्यंत चोखपणे पार पाडले असून ‘क्लोज अप्स' मधून या महिलांच्या वेदना प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहचतात. चारु (दीपा परब) नवऱ्याच्या नाकर्तेपणाने पुरती कोलमडते व भर पार्टीतून बाहेर येऊन कारमध्ये बसून मोठ्याने रडत दुःखाला वाट करुन देते आणि मग तिला सावरायला तिची बहिण साधना (सुकन्या कुलकर्णी) येते हा प्रसंग भल्याभल्यांना डोळे पुसायला लावणारा ठरतो. शशीच्या (वंदना गुप्ते) मुलीचे (सुरुची आडारकर) ‘फायब्रॉईड'चे आपरेशन होते, त्यावेळची व नंतरची घालमेल रोहिणी हट्टंगडी व वंदना गुप्ते यांनी ज्या कमालीने चेहऱ्यावर दाखवली आहे व छायांकनकाराने जी कॅमेऱ्यात टिपली आहे, त्याला तोड नाही. त्याहीवेळी तुमच्या खिशातला रुमाल डोळ्यांना लागू शकतो. डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी ‘या हिस्ट्रेकटॉमी  शस्त्रक्रियेची तितकी आवश्यकता नव्हती, हा प्रसंग अवास्तव आहे' असे एका लेखात म्हटले आहे. जवळपास अर्धेअधिक आयुष्य एकमेकींविरुध्द उभ्या ठाकलेल्या दोन बहिणींना एकत्र आणण्यासाठी वापरलेली ती एक वलृप्ती म्हणून सिनेमॅटीक लिबर्टी दिग्दर्शकाने घेतली असे यावर आपण म्हणुया फारतर!

        कोणत्याही रेल्वे स्टेशनवर कोणत्याही वेळी जाऊन परवानगीविना शूटिंग करता येत नाही, केले तर ते व्हायरल करता येत नाही... आणि तरीही या सहा बहिणींचा तुफान डान्स रेल्वे स्टेशनवर चित्रीत होतो आणि तो प्रचंड व्हायरल होतो, ही सुध्दा ‘सिनेमॅटिक लिबर्टी' म्हणूनच विचारात घ्यायला हरकत नाही. संकलक म्हणून मयूर हरदास यांनी; तर संगीतकार म्हणून साई-पियुष यांनी चोख काम बजावले आहे. महिला कलावंतांप्रमाणेच शरद पोंक्षे, स्वप्निल राजशेखर, तुषार दळवी, सोहम बांदेकर, रमाकांत दायमा, पियुष रानडे आदिंचीही कामे दमदारपणे वठली आहेत.  

   या चित्रपटाचे नाव म्हणे आधी ‘मंगळागौर' होते, करोनापूर्व काळात चित्रीकरणाला सुरुवात होणार होती, या चित्रपटाला आधी निर्माता मिळत नव्हता वगैरे वगैरे अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ते काहीही असो. त्या साऱ्याचा निकाल, एकत्रित परिणाम, प्रभाव जो काही आहे तो तुमच्यासमोर आहे. साधना (सुकन्या कुलकर्णी) ची सून म्हणून माधवीच्या छोटेखानी भूमिका रिया शर्मा हिने उमदेपणाने साकारली आहे. सोशल मिडियाला कुणीही कितीही नाके मुरडली तरी त्याचा प्रभाव काही कमी होण्याचे नाव घेत नाही. ‘बाईपण'च्या यशात ‘सोशल मिडिया'चा मोठा वाटा आहे, हे कुणासही मान्य व्हावे. त्याचे ‘पोस्टर' भारतरत्न सचिन तेंडुलकरने लाँच केले होते, तर त्याचा ‘ट्रेलर' अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला व ते सारे जनसामान्यांपर्यंत ‘सोशल मिडिया'मुळे जलदगत्या पोहचले हे दुर्लक्षुन चालणार नाही.

   बॉलिवूडचे मोठमोठे कलावंत मराठी नाट्यअभिनेते-अभिनेत्रींना वचकून असतात हे अनेकदा दिसून आले आहे. ‘बाईपण'मधील बव्हंशी कलाकार हे मराठी रंगभूमीवरूनच आलेले आहेत आणि आता त्यांनी हिंदी कलावंतांसह हिंदी निर्माते-दिग्दर्शक मंडळींनाही सावरुन बसायला लावले आहे हे निश्चित! मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी निर्माते, मराठी दिग्दर्शक, मराठी प्रेक्षक, मराठी वाचक, मराठी लेखक आणि मराठी सामान्यजनांसाठी व या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणाऱ्या अमराठी माणसांसाठीही ‘बाईपण भारी देवा' चे हे अफाट यश स्वागतार्ह आहे. त्यामुळे कोणताही खत्रुडपणा न दाखवता जिंदादिल वृत्तीेने, खिलाडूपणे व उमदेपणाने ‘बाईपण'वाल्या या साऱ्यांचे आपण अभिनंदन करु या.

त्याचवेळी : मणीपूर येथे दोन महिलांची धिंड काढून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करत पुरुषत्व सिध्द करु पाहणाऱ्या झुंडीचा आणि बघ्या लोकांचा तीव्र निषेध.

(मुशाफिरी) - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक: दै.आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

लेख संपदा : देश कि बेटीयाँ सुरक्षित आहेत का ?