मुशाफिरी : नागपूरच नव्हे, सारा महाराष्ट्र कलंकित झाला... उध्दव ठाकरेंचं काय चुकलं?

नागपूरच नव्हे, सारा महाराष्ट्र कलंकित झाला... उध्दव ठाकरेंचं काय चुकलं? देवेंद्र फडणवीस यांच्या कलाकारीने नागपूरच कलंकित झाला असं नाही. साऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. हे राज्यच कलंकित झालं. देशात खालच्या राजकरणासाठी पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारची नावं घ्ोतली जायची. आज ती राज्यंही महाराष्ट्राचं नाव घ्ोऊ लागली आहेत. यावरून महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवली ते लक्षात येईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरमध्ये जाऊन काही बोलले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी साऱ्या महाराष्ट्रात त्यांचा निषेध केला. राज्याच्या भल्याची ज्यांना अक्कल नाही तेही यानिमित्त बाहेर आले. स्पष्ट बोललं की माणसाला झोंबतं. जे स्पष्ट बोलतात तेच दिसतात. महाराष्ट्रात असं उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत नसते. उध्दव ठाकरे यांनी ही हिंमत थेट नागपूरमध्ये जाऊन दाखवली आणि कोण गजहब झाला. आपल्या नेत्याची कोणी निंदानालस्ती केली तर त्याचा निषेध करायचा अधिकार त्याच्या समर्थकांना असायलाच हवा. पण ज्याच्या समर्थनार्थ आपण हे करतो, तो त्या समर्थनाच्या पात्रतेचा आहे काय, याची जाणीव समर्थकांनी ठेवली पाहिजे. जो कलंकित शब्द उध्दव यांनी फडणवीस यांच्यासाठी वापरला त्याहून कितीतरी वाईट शब्दप्रयोग स्वतः फडणवीस, त्यांच्या भाजपचे नेते आणि त्यांचे समर्थक उघडपणे विरोधकांसाठी करत असतात. यातून उध्दव ठाकरे सुटण्याचा प्रश्न नाही. असले शब्दोच्चार उध्दव ठाकरे यांच्याविषयी काढताना भाजपच्या नेत्यांची जीभ तेव्हा अडखळली नाही. आजारी असलेल्या व्यक्तीविषयी तर प्रत्येकाच्या मनात सहानुभूती असली पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचा जराही लवलेश भाजपच्या नेत्यांकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे नाही. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं, अशी भाजप नेत्यांची वागण्याची पद्धत आहे. भाजप नेते आणि आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये जाऊन केल्याने भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला. खरं तर उध्दव ठाकरे अर्धंच बोलले. देवेंद्र फडणवीस यांच्या कलाकारीने नागपूरच कलंकित झाला असं नाही. साऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. हे राज्यच कलंकित झालं. देशात खालच्या राजकरणासाठी पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारची नावं घ्ोतली जायची. आज ती राज्यंही महाराष्ट्राचं नाव घ्ोऊ लागली आहेत. यावरून महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवली ते लक्षात येईल. एक शहर वा राज्य उगाच कलंकित होत नसतो. शहर, राज्य ही तर निर्जीव संकल्पना. त्या शहरातील सजीव असलेली व्यक्ती जेव्हा विकृत बनते तेव्हा शहराला कलंक लागला असं मानलं जातं. फडणवीस यांच्यावर असे बोल खाण्याची वेळ ही येणारच होती. २०१४ पासून त्यांची वर्तणूक त्याच तोडीची होती. नागपूरला कलंक असं तिथे राजकारणात वावरणाऱ्या नितीन गडकरीपासून इतर नेत्यांना का संबोधलं जात नाही? त्यासाठी फडणवीसांचंच नाव का घ्ोतलं जातं, याचा विचार स्वतः फडणविसांनी आणि भाजपच्या नेत्यांनी करावा. त्यांनी यासाठी हवं तर आत्मपरीक्षण करावं. ते केलं तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची जाण त्यांना आहे, असं म्हणता येईल. कलंकित म्हणून दोष दिला म्हणून राज्यभर पुतळे जाळून आणि पायदळी तुडवून काहीही होणार नाही. याने लोकभावना नाही बदलणार. लोकांची मनं जाणून घ्ोतली तर भाजप नेत्यांचे डोळे उघडतील. समर्थक वगळता कोणीही फडणवीस यांच्या कृतीचं समर्थन करताना दिसत नाही. उलट महाराष्ट्र खड्डयात घातल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. लोकांमध्ये फिरलं तर उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या दोषाहून कितीतरी लाखोल्या भाजप नेत्यांना ऐकाव्या लागतील. उगाच कोणाची तळी राखून काहीही होणार नाही. उध्दव ठाकरे यांना इतक्या खाली का यावं लागलं, याचा विचार भाजपचे नेते करणार आहेत की नाहीत? महाराष्ट्रात आजवरच्या राजकारणात या राज्याची अवहेलना होईल, असं एकाही नेत्याने केलं नाही. अगदीच अतिरेक म्हणजे गट बाजूला काढून काहीजण दुसऱ्या पक्षात सामीलही झाले. पण घर फोडून त्यातून बापालाच रस्त्यावर काढण्याचं पातक कोणी केलं नाही. याला अपवाद केवळ फडणवीस आहेत. राज्यातील राजकीय पक्ष फोडून तो पक्ष आपलाच असल्याची अक्कल कोणाही नेत्याने ना स्वतः वापरली ना इतरांना दिली. फडणवीस यांनी हे केलं. सत्तेसाठी माणसाने किती खाली यावं, याला काही मर्यादा आहेत. या मर्यादा पार केल्या की त्याला बोल हे खावेच लागतात. याला कोणीही अपवाद नाही. जैसी करनी तैसी भरनी... हा जगाचा नियम आहे. त्याला कोणी चुकलेलं नाही. सत्तेसाठी इतरांना इडीच्या जाळ्यात फसवण्याचं कलुषी कारस्थान आजवर कोणालाच जमलं नाही. इडी नावाची संस्था देशात होती, हेही कोणाच्या गावात नव्हतं. ती अचानक बाहेर आली, जेव्हा सत्तेची हाव वाढली. यासाठी जे निर्दोष होते त्यांनाही फसवलं गेलं. केवळ फसवलंच असं नाही तर त्यांना वर्षोन्वर्षं कोठडीत सडवण्याचा अघोरी प्रकार केला गेला. ज्याने हे केलं अशांच्याच वाट्यालाच कलंकाचे शब्द येत असतात. यामागे कोण होतं? ज्यांच्याविरोधात या यंत्रणांचा वापर करून घ्ोतला त्या छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे कोण? हे नेते याआधी नालायक ठरले होते. अचानक ते पावन व्हावेत? जनाची नसली तरी मनाची लाज ठेवली असती तरी असे उद्योग कोणी केले नसते. त्यांना सत्तेत बसवून स्वतः दूर राहिलं असतं तरी बचाव करण्याची संधी मिळाली असती. लाज गेल्यावर राजकरणात टिकून राहण्यासाठी अनैतिक मार्ग स्वीकारावे लागतात, असं निर्लज्जासारखं सांगितलं जातं तेव्हा तोच निर्लज्ज मार्ग उध्दव ठाकरे यांनी केवळ कलंकित शब्दापुरता वापरला तर गैर काय? पक्ष फोडण्याच्या पापापेक्षा हे कितीतरी चांगलं. विदर्भाने मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, जवाहरलाल दर्डा, श्रीकांत जिचकार, आताच्या राजकरणात नितीन गडकरी अशी असंख्य प्रतिभावान नेते महाराष्ट्राला दिले. त्यांच्यातल्या अनेकांनी तर महाराष्ट्रापासून वेगळं होण्याचीही भूमिका मांडली. या सर्वांनीच विदर्भाचं हित बघितलं. त्यासाठी नको ते मार्ग पत्करले नाहीत, की विदर्भाला विरोध करणाऱ्यांंवर यंत्रणांचा वापर केला नाही. ज्यांनी या मार्गांचा अवलंब केला त्यांना त्याची फळं मिळणं हा निसर्ग नियम आहे. ते उध्दव ठाकरे यांच्या दुषणाने मिळालं. यासाठी रस्त्यावर येऊन तमाशा करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पक्षाने केलेल्या पुनर्वसनाला जागत आहेत. प्रदेशाध्यक्ष पद मिळालं म्हणून वाह्यात जाणं त्यांना शोभत नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचीही काही जबाबदारी आहे. जी ते आज पाळताना दिसत नाहीत. शुचिर्भूत पक्षाचा कोणीही नेता काहीही बडबडतो, कोणाविरोधात कसलीही वक्तव्यं करतो. याने पक्षाची लाज जातेच; पण प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे यांचीही ते लाज घालवतात. आपला पक्ष सत्तेवर असल्याने तर ही जबाबदारी कित्तेक पटीने वाढत असते. कलंकाची व्याख्या करताना बावनकुळे स्वतःच्याच नेत्याची अक्कल काढत होते. सरकार स्थापनेपासून ते कोरोना काळातला लेखाजोखा काढताना चार बोटं भाजपकडे जात होती, याचंही भान बावनकुळ्यांना नव्हतं. याच सत्तेसाठी पहाटेचा शपथ घ्ोणाऱ्याची तुलना कशाने करायची? कोरोना काळात सातत्याने राजभवनाच्या येरझाऱ्या घालणाऱ्यांंची बोळवण कशीे करायची? राज्यात लोकं मरणासन्न झाली असताना आमदार आणि खासदारकीचा फंड खासगी पीएम केअरला द्या असं सांगणाऱ्यंाचं काय करायचं? सत्तेसाठी ईडी आणि इतर यंत्रणांचा बेमालूम वापर करणाऱ्यांना कसली बक्षिसं द्यायची? सत्तेसाठी पक्ष फोडून त्यांचा बाप बदलण्याची हिंमत देणाऱ्यांंना कुठल्या व्याख्येत तोलायचं? लबाड पोलीस आयुक्ताच्या संरक्षणार्थ साऱ्या पोलीस दलाला बदनाम करणाऱ्याला काय म्हणायचं? याच सत्तेसाठी सातत्याने खोटारडेपणा करणाऱ्यांवर काय बोल लावायचे? या सगळ्या घटना राज्याच्या राजकीय संस्कृतीला कलंक फासणाऱ्या नाहीत? तेव्हा रस्त्यावर तमाशा घालण्यापेक्षा भाजप नेत्यांनी आत्मपरिक्षण करावं. त्याने पक्षाचं आणि नेत्यांचंही कल्याण होईल. -प्रविण पुरो.
Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : काकड्यांच्या पोरींची ष्टोरी