महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मुशाफिरी ; केवळ आहार नव्हे, मदतकार्यही ‘समतोल' असावे !
केवळ आहार नव्हे, मदतकार्यही ‘समतोल' असावे !
आता पावसाळी दिवस म्हणजे घाटात जागोजागी दिसणाऱ्या धबधब्यांखाली न्हाऊन निघण्याचा काळ! पण ज्या मुलांना घरच्यांच्या मायेचा ओलावा लाभत नाही अशांची भेट घ्यायची संधी आम्हाला लाभली होती. अडचणीत असलेल्या घटकांना सहकार्य केले पाहिजे. त्यांच्यासाठी झटणाऱ्या संस्थांना मदत किती दिली ते महत्वाचे नाही, रवकम शेकड्यात दिली, हजारात की लाखात तेही महत्वाचे नाही. ती दिली पाहिजे, दान केले पाहिजे. संकटात पडलेल्यांच्या सहाय्यार्थ पुढे सरसावले पाहिजे हा आपल्या संस्कृतीचा संस्कार आहे. तो पुढील पिढीकडे संक्रमित व्हायला हवा.
गोष्ट ६ जुलैच्या रात्रीची असेल..मी सहकुटुंब सातारा-कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी येथे होतो. नवी मुंबईचे नाट्यकर्मी श्री. रवींद्र औटी यांचा मोबाईलवर कॉल आला की आपल्याला येत्या रविवारी ९ तारखेस कल्याण तालुवयातील मामनोली येथे असणाऱ्या ‘समतोल फाऊंडेशन' या संस्थेला भेट द्यायची आहे. त्यानंतर बदलापूरच्या बारवी धरणावर भिजायला जायचे आहे. मग बदलापूरातील चित्रकार सचिन जुवाटकर यांच्या ‘चित्रदालना'ला भेट द्यायची आहे. तुम्हाला सोबत कसेही करुन यायचेच आहे. ‘कविता डॉट कॉम' चे निर्मिती सूत्रधार प्रा. रविंद्र पाटील, कवि वैभव वऱ्हाडी, नारायण लांडगे पाटील, रुद्राक्ष पातारे ही मंडळीही साथीला असतील. तु्म्ही कोपरखैरणे येथे सकाळी आठ वाजता येऊन थांबा. तेथून तु्म्हाला आम्ही कारने घेऊ आणि पुढचा प्रवास करु.
सर्वसाधारणपणे आता नवी मुंबई-ठाणे-उरण-पनवेल मधील अनेकांना आणि या स्तंभाच्या कित्येक वाचकांना माझ्या भटकंतीची सवय झाली आहे आणि जवळच्या मित्रमंडळींना नेहमीच वाटतं की हा जिकडेतिकडे फिरुन माहिती घेत लिखाण करीत असतो; मग आपल्याही सोबत याने कधीतरी यावे. त्यामुळे होते काय, की माझीही काही आधी ठरवून ठेवलेली कामे असतील याचा कसलाही विचार न करता अनेकजण बेधडक मला बोलावण्याचे काम करतात. तुझे काही पूर्वनियोजित काम नाही ना, तू दमलेला-थकलेला तर नाहीस ना, वेळ आहे का, मोकळा आहेस का म्हणून विचारीत बसत नाही. ‘आम्ही ठरवलंय..तू थेट निघायचं आहे' असा आदेशच असतो अनेकांचा. अर्थात तेवढा त्यांचा माझ्यावर ‘प्रेमाचा अधिकार'ही असतोच म्हणा! खरे तर रविंद्र औटी यांनी विचारले तेंव्हा कोल्हापूरातील स्थानिक स्थलदर्शनानंतरचा प्रवास करीत मी काहीसा थकून कोल्हापूरच्या हॉटेलात नुकताच कुठे विसावलो होतो. इंडियन पिंच्याक सिलाट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले यांनी शनिवारी ८ तारखेस या इंडोेनेशियन युध्दकलांच्या राज्यस्तरीय स्पर्धांच्या उद्घाटनासाठीही निमंत्रित केले होतेच. ७ तारखेस घरी परतल्यावर ८ तारखेला शनिवारी कार्यालयात जाऊन पेपरचे कामही पाहायचे होते. पण ९ तारखेसाठी औटी यातील काही ऐकणार नाही याची खात्री होती व एका चांगल्या संस्थेचे काम प्रत्यक्ष जाऊन पाहायला मिळणार याचाही मोह होताच; त्यामुळे मी लगेच होकार भरला.
तुम्ही आम्ही किंवा आपल्यातले अनेकजण हे चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेले, चांगल्या संस्कारांनिशी वाढलेले, चांगली नोकरी, चांगले घर, माफक वेतन अशा स्थितीतील असतात. त्यामुळे आपल्या संरक्षित, सुरक्षित, चाकोरीबध्द सीमेमध्ये जगणाऱ्या कित्येकांना त्यापलिकडेही एक दुर्लक्षित, उपेक्षित, त्याज्य, द्वेषाचे धनी असलेले एक विश्व आहे, याचा मागमूसही नसतो. घरातून पळून आलेली मुले, रेल्वे स्टेशनमध्ये राहणारी मुले, पालकांबद्दल माहिती सांगता न येणारी मुले, शिक्षणापासून वंचित राहिलेली वीटभट्टी कामगारांची मुले यांच्यासाठी हे ‘समतोल फाऊंडेशन' काम करत आहे. समतोल म्हणजे स-समता, म-ममता, तो-तोहफा आणि ल-लक्ष्य अशी फोड आहे. या संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आहेत. नुसती ऐकीव किंवा छापील किंवा डिजिटल माहिती कुठेही मिळेल; पण प्रत्यक्ष ग्राऊंड झिरोवर जाऊन ते जाणून घ्यायची तीव्र इच्छा मला नेहमीच असते..ती रविंद्रजी औटी यांनी आखलेल्या या दौऱ्यामुळे पूर्ण झाली.
आता पावसाळी दिवस म्हणजे घाटात जागोजागी दिसणाऱ्या धबधब्यांखाली न्हाऊन निघण्याचा काळ! पण ज्या मुलांना घरच्यांच्या मायेचा ओलावा लाभत नाही अशांची भेट घ्यायची संधी यानिमित्त आम्हाला लाभली होती. समतोल फाऊंडेशनचे संस्थापक सचिव व महाराष्ट्र राज्य बालहवक संरक्षण आयोगाचे सदस्य श्री. विजय रामचंद्र जाधव हे आम्हाला माहिती देण्यासाठी विशेषकरुन तेथे उपस्थित होते. खरेतर तो सारा परिसर कल्याण, शहाड, अंबरनाथ अशा साऱ्याच रेल्वेस्थानकांपासून खूपच दूर आहे. राज्य परिवहनची एस.टीही त्या भागात मर्यादित फेऱ्या मारते. कल्याण आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या सीमेवर या समतोल फाऊंडेशनचे स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र कल्याण-मुरबाड रस्त्यावर मामनोली गावाजवळ वसलेले आहे. तेथे घरातून पळून आलेली, रेल्वे स्टेशनवर सापडलेली मुले सांभाळण्यात येतात. निराधार, निराश्रित, एकल पालकांच्या मुलग्यांना तेथे सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम आखले जातात. त्यांना शालेय शिक्षणासोबतच प्लंबिंग, वेल्डिंग, आयुर्वेदीक नर्सरी प्रशिक्षण, गोसेवा, जैविक शेती यांच्याबद्दल अवगत केले जाते. ही मुले वेगवेगळ्या जातीची, धर्माची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी आहेत. रेल्वे स्थानकांवर किंवा अन्यत्र अडचणीत सापडलेल्या मुली मग तुम्ही येथे का आणत नाही? या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना विजय जाधव म्हणाले की वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरीक, मानसिक अडचणी वेगवेगळ्या असतात. कायदेशीर बाबीही त्यात अनेक असतात. मग त्यावरच लक्ष केंद्रीत करावे लागेल. आजवर अशा सुमारे ४२ हजारांहुन अधिक मुलग्यांचे पुनर्वसन या समतोल फाऊंडेशनकडून झाले आहे हे ऐकले की, मनात आणले तर एखादी बिगर शासकीय-बिगर राजकीय संस्था कसे डोंगराएवढे काम करु शकते, याचा विश्वास दृढमूल होतो.
या भेटीत विजय जाधव यांनी आम्हाला त्या संस्थेचा सारा परिसर सोबत नेऊन दाखवला. तेथे लावण्यात आलेली आंबा, जांभूळ, काजू, फणस, लिंबू, सिताफळ, कडुलिंब, पिंपळ, पपई, शेवगा, चिकू, आवळा, साग आदि झाडे आम्ही पाहिली. कोबी, पलॉवर, मिरची, टोमॅटो (होय! तोच तो..प्रतिकिलो दिडशेपार पोहचलेला!) ह्याही भाज्यांची रोपे पाहुन मन सुखावले. गायी, सौर उर्जा, गोबर गॅस प्लॅण्ट, शेततळे, कूपनलिका, गायीच्या शेणापासून बनवण्यात आलेली विविध उत्पादने, साबण हे सारे पाहुन घेतले. गरजू, विकलांग आणि इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना विनामूल्यरित्या जे ठाणे शहरात अन्नदान केले जाते, त्यासाठी येथील प्रकल्पातून आलेल्या भाज्या या समतोल फाऊंडेशनच्या अन्नछत्रातून उपयोगात आणल्या जातात हे समजून तर आणखीच समाधान वाटले. तेथेच नवकेसरी वर्तमानपत्राचे संपादक सागर पाटील यांनीही त्यांचा वाढदिवस संस्थेच्या या मुलांसोबत साजरा करण्याचे ठरवल्यामुळे तेही तेथे हजर राहिले व वाढदिवसाचा केक आमच्या व त्या मुलांच्या साथीने कापला. त्याच दिवशी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांचाही वाढदिवस होता. यावेळी ‘कविता डॉट कॉम'चे कवि रुद्राक्ष पातारे यांनी प्रसंगोचित कविता सादर केली व त्या कार्यक्रमाचे ओघवते व शैलीबध्द निवेदन मित्रवर्य नारायण लांडगे पाटील यांनी केले. समतोल फाऊंडेशन येथील मनपरिवर्तन केंद्रात आम्हीही दुपारच्या भोजनाचा आस्वाद त्या मुलांसोबत जमिनीवर बसून मांडी घालत घेतला. जेवणाआधी रीतसर त्यांची नेहमीची प्रार्थना म्हणण्यात आली. या संस्थेचे एक विश्वस्त व ज्यांच्या पुढाकारामुळे आम्हाला तेथवर जाऊन या सेवाकार्याची माहिती घेता आली ते नवी मुंबईकर रंगकर्मी श्री. रविंद्र औटी यांनी एका बंद लिफापयात एक धनादेश श्री. विजय जाधव यांच्याकडे संस्थेच्या कामासाठी सुपुर्द केला. अनेकदा सहकार्य, दान, मदत हे एका हाताने दिल्याचे दुसऱ्या हाताला कळू देऊ नये असे काही लोक मोठे सुभाषित ऐकवल्याच्या थाटात बोलत असतात. माझा याला विरोध आहे. मदत किती दिली ते महत्वाचे नाही, रक्कम शेकड्यात दिली, हजारात की लाखात तेही महत्वाचे नाही. ती दिली पाहिजे, दान केले पाहिजे. संकटात सापडलेल्यांच्या सहाय्यार्थ पुढे सरसावले पाहिजे हा आपल्या संस्कृतीचा संस्कार आहे. तो पुढील पिढीवर झालाच पाहिजे. त्यासाठी मदत, दान, सहकार्य करायला हवे हे नव्या पिढीला आपण सांगितलेच नाही, कळूच दिले नाही तर त्यांना समजणार कसे? मदत केवळ पैशांनीच करता येते असेही नाही. आपले नाव, आपली ओळख, आपले लिखाण, आपली मध्यस्थी, आपले निवेदन, आपला पाठपुरावा, आपली सकारात्मक इच्छाशक्तीही मदतीचे, सहकार्याचेच काम बजावत असते. अनेकदा पैशाच्या राशी ओतून होत नाही ते काम केवळ ओळखीने पटकन होऊन जाते. तीही अनमोल स्वरुपाची मदत ठरते. म्हणून केलेले दान, केलेली मदत याबद्दल सांगितले पाहिजे. म्हणजे नव्या पिढीसोबतच चंगळवादी, भौतिक सुखाला चटावत चाललेल्या, आरामदायी जीवन जगत असलेल्या, वाचनापासून दुरावलेल्या, सुखलोलुप लोकांनाही त्याची माहिती होऊन मदत करण्याची प्रेरणा मिळेल.
'समतोल फाऊंडेशन'चे काम पाहताना, त्यांच्याकडील भोजनाचा आस्वाद घेताना, त्या मुलांमध्ये रमताना, तेथे आलेल्या माऊली भजन मंडळाचे भजन ऐकताना वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. त्यामुळे बदलापूरच्या बारवी धरणाकडे जाण्याच्या बेत आम्ही गुंडाळला व सचिन जुवाटकर या ख्यातनाम चित्रकाराच्या कलादालनाची वाट धरली. पण तोवर आम्ही समतोलच्या सेवाकार्याच्या महतीमध्ये चिंब झालो होतो, त्यामुळे धरणाच्या धारेत भिजण्याचा आनंद त्यापुढे आम्हाला त्यावेळी तरी गौण वाटला. अजून पावसाचा मुवकाम भरपूर राहणार आहे, आसपासची धरणे आणखी भरणार आहेत. त्या भटकंतीची माहिती आणि सचिन जुवाटकरांच्या चित्रसामर्थ्याची महति लवकरच लेखनाद्वारे आणि नवे शहर युट्युबवरील व्हिडिओ मुलाखतीच्या माध्यमातून वाचक-दर्शकांसमोर येईलच !
(मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर.