नवी मुंबईकर विशेष खेळाडू तनया पाताडे हिचे विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान यश

बास्केटबॉलमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देण्यात तनयाचे महत्वपूर्ण योगदान

नवी मुंबई ः जर्मनी येथे १७ ते 2५ जून कालावधीत पार पडलेल्या ‘ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेम्स-२०२३'मध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या भारतीय बास्केटबॉल संघातील नवी मुंबईकर दिव्यांग खेळाडू तनया पाताडे हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सीबीडी-बेलापूर येथील ‘स्वामी ब्रह्मांनद प्रतिष्ठान'च्या शाळेतील मतिमंदत्व असलेल्या तनजा पाताडे या विद्यार्थिनीने अत्यंत जिद्दीने स्वतःच्या शारीरिक कमतरतेवर मात करीत कठोर परिश्रम घ्ोऊन भारतीय बास्केटबॉल संघात प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळविला. भारतीय संघातील राष्ट्रीय बास्केटबॉलपटू म्हणून उत्तम खेळ करीत भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून देण्यात तनया हिने महत्वपूर्ण योगदान दिले.

तनया प्रमाणेच या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत ‘स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान'च्या शाळेतील शिक्षिका रुपाली धांडोरे यांनी देखील भारतीय विशेष जलतरण खेळाडुंच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच छाया सावंत यांची ‘विशेष ऑलिम्पिक बर्लिन आयोजन समिती'ने स्वयंसेवक म्हणून निवड केली होती. या तिन्ही महिलांचा विशेष ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग आणि त्यांनी केलेली कामगिरी नवी मुंबईच्या नावलौकिकात भर घालणारी आहे.
जून महिन्यात बर्लिन, जर्मनी येथे ‘स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेम्स-२०२३'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १९० देशांतील ७ हजार स्पेशल ऑलिम्पिक ॲथलीट आणि युनिफाईड पार्टनर्सनी २६ खेळांमध्ये सहभाग घ्ोतला. भारताकडून १९८ दिव्यांग खेळाडू आणि ५७ प्रशिक्षकांनी १६ खेळांमध्ये सहभाग घ्ोतला. त्यात उत्तम कामगिरी करीत भारताने ६६ सुवर्ण, ५० रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण १७५ पदके जिंकली. स्पेशल ऑलिम्पिक भारत यांच्या अंतर्गत महाराष्ट्र मधील १४ खेळाडू आणि १ युनिफाईड पार्टनरने ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकून लक्षवेधी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
 

यामध्ये सीबीडीतील ‘स्वामी ब्रह्मांनद प्रतिष्ठान'च्या शाळेतील विशेष विद्यार्थिनी तनया पाताडे हिने बास्केटबॉल खेळात उत्तम कामगिरी केली. तनया क्रीडा शिक्षक सारंग राठोड यांच्या हाताखाली प्रशिक्षण घ्ोत आहे. विशेष ऑलिम्पिक करिता भारत आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी वायसीएमए-बेलापूर आणि फादर ॲग्नेल मल्टिपर्पज स्कुल-वाशी यांनी तनयाच्या सरावासाठी त्यांची जागा उपलब्ध करुन दिली. शिवाय तेथील बास्केटबॉल प्रशिक्षक दिगंबर माळी यांचेही तिला विशेष मार्गदर्शन लाभले. ‘स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेम'मध्ये नवी मुंबई मधील खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल नवी मुंबई शहरवासियांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 इंडोनेशियन युध्दकला स्पर्धेत नवी मुंबईच्या संघाने केली पदकांची लयलूट