केबीपी कॉलेजला मुंबई विद्यापीठाचा अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा

कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक तुरा

नवी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या शिफारशीवरून, व्यवस्थापन परिषदेने रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेजला अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा (एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज) प्रदान केला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा मिळालेली महाविद्यालये, यापुढे विद्यापीठ आणि महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करु शकणार आहेत.  

दरम्यान, अधिकारप्रदत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी स्तरावरचे अभ्यासक्रमसुध्दा सुरू करता येणार आहेत. अभ्यासक्रमाची शुल्करचना, अभ्यासक्रमाची पुनर्रचना, मूल्यांकनाची पद्धत, निकाल जाहीर करणे, गुणपत्रक प्रदान करणे याबाबत महाविद्यालयाला आता स्वातंत्र्य मिळणार असल्याचे केबीपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी सांगितले.  

अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. असा स्वायत्त दर्जा मिळवणारे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी हे रयत शिक्षण संस्थेतील आणि नवी मुंबई परिसरातील पहिले कॉलेज आहे. महाविद्यालयाला 2018 मध्ये युजीसीकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. गेल्या पाच वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचे निकष अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा प्राप्त करण्यासाठी महत्वाचे ठरले.  

स्वायत्तता मिळाल्यापासून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना रोजगारायोग्य बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, नवनवीन अभ्यासक्रम सुरु करणे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठी खास उपक्रम चालू करणे अशा अनेक पातळीवर महाविद्यालयात काम सुरु आहे.  
गेल्या पाच वर्षात सुरु केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये एम. एस्सी. डेटा सायन्स, जिओ-इनफॉरमॅटिक्स, बीबीए कॅपिटल मार्केट, लॉजिस्टिकस अँड सफ्लाय चेन मॅनेजमेन्ट, बी.एस्सी. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, पीएच.डी. इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश यांचा समावेश आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाने रिसर्च कन्सल्टन्सी अँड टेकनिकल सर्विसेस हि एफ.डी.ए. ची मान्यता असलेली प्रयोगशाळा चालू केली आहे,  जिथे अत्याधुनिक साधने आहेत. ही प्रयोगशाळा सर्वांच्या उपयोगासाठी उपलब्ध आहे. तर उद्योजकता विकासासाठी रयत सिन्टेनरी इनोव्हेशन इन्क्युबेशन फौंडेशन हे आधुनिक पद्धतीचे नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणारे केंद्र खारघर येथे सुरु करण्यात आले आहे.  
दरम्यान, महाविद्यालयाला २०१३ पासून आय एस ओ मानांकन प्राफ्त आहे. त्याचबरोबर २०१९ मध्ये भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी तर्फे स्टार स्टेटस देण्यात आले आहे. संपूर्ण भारतात असा मान फक्त ६५ महाविद्यालयांना आहे.  महाविद्यालयाच्या प्रगतीला अनुसरून २०१९ मध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत महाविद्यालयाला 5 करोड इतका निधी प्राप्त झाल्याची माहिती डॉ. शुभदा नायक यांनी दिली.  


महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, सचिव प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर मस्के, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी महाविद्यालयाला प्राफ्त झालेल्या यशाबद्दल प्राचार्या डॉ. शुभदा नायक आणि शिक्षक, शिक्षकेतर सेवकांचे अभिनंदन केले.  

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

कोपरखैरणे मधील जागृतीची आकाशाला गवसणी