कोपरखैरणे मधील जागृतीची आकाशाला गवसणी

नवी मुंबईतील पहिली महिला वैमानिक बनण्याचा मिळवला मान

वाशी : कोपरखैरणे येथे राहणारी युवती जागृती रोहिदास पाटील २०० तास विमान चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करुन वैमानिक परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. जागृती पाटील हिने मध्य प्रदेशमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे. सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या केल्यानंतर ती कोपरखैरणे येथे परतली आहे. दरम्यान, नवी मुंबईतील पहिली महिला वैमानिक बनण्याचा बहुमान जागृती पाटील मिळवला आहे.

जागृती पाटील हिने बारावी नंतर मध्य प्रदेश येथील गुना येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षक पंधरा तास तिच्या सोबत राहून तांत्रिक प्रशिक्षण द्यायचे. जागृती पाटील हिने वैमानिक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच परीक्षा यशस्वीरित्या पार केल्या आहेत. त्यामुळे वैमानिक म्हणून तिला आता परवाना मिळाला आहे.  सध्या एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून पुढील सेवा देण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.

कोव्हीड काळ पकडून सुमारे चार वर्ष प्रशिक्षण घेतल्यावर जागृती पाटील कोपरखैरणे येथे परतली आहे. महाराष्ट्रातून एकमेव मुलगी म्हणून तिने या प्रशिक्षण संस्थेत सहभाग घेतला होता. तर जागृती नवी मुंबई शहरातून पहिली महिला वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करणारी तरुणी ठरली आहे. सुमारे सतरा हजार फुट उंचीवर विमान उडविण्याचे प्रशिक्षण तिने घेतले आहे.

पालकांनी मुलगी असल्याने वेगळे काही तरी करण्यासाठी नेहमीच जागृतीला प्रतिसाद दिला. आता प्रशिक्षण पूर्ण झाल्याने जागृती हिने नवी मुंबई शहरामधील पहिली महिला वैमानिक म्हणून मान मिळवला आहे. दरम्यान, जागृती  पाटील हिच्यावर विविध स्तरामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शाळांसमोरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचा पुढाकार