पाऊस कधीचा पडतो...!

पाऊस कधीचा पडतो...!

   तुमचे आमचे सारे जीवनच खरे तर या पावसाभोवतीच गुंफले आहे. पाणी म्हणजे जीवन. हे पाणी आपल्याला पाऊस घेऊन येतो. हायड्रोजनचे दोन व ऑवसीजनचा एक अणू मिळून पाणी बनते..पण ते प्रयोगशाळेत !  तुम्हा आम्हाला नित्यनेमाच्या, दैनंदिन आयुष्यासाठी विधात्याने ढगातून पावसाच्या रुपाने पाठवलेलेच पाणी लागते. तुमचे वय कितीही असू द्या..पाऊस तुम्हाला आठवणींत रमायला लावतोच.

पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती दुःखाचा उतरला पारा नितळ उतरणी वरती

- ग्रेस.

   हा लेख लिहायला घेईपर्यंत तरी ज्याला पावसाळा म्हणतो अशा खऱ्या दमदार पावसाला मुंबई-नवी मुंबई आणि परिसरात सुरुवात झाली नव्हती. कवी ग्रेस यांची ही कविता दुःखाचा, नैराश्याचा, उदासिनतेचा माहौल उभा करणारी आहे. दुःख कुणास चुकले आहे? पाऊस अधिक पडला तरी दुःख, नाही पडला ती दुःख; कमी पडला तरीही दुःखच!  ‘पाऊस नकोच', हे कोण म्हणतं? फूटपाथवर बसून वस्तू विकणारे विक्रेते! कारण त्यांना मग ऊघड्यावर धंदा करता येत नाही. त्यांच्या पोटावर पाय येतो म्हणे! पण त्यांना हे माहित नाही की याच वस्तू विकत घेणाऱ्या सर्वांचे जीवन पावसावरच अवलंबून असते म्हणून.  तोच जर पडला नाही, तर यांना ग्राहक कसे मिळणार? यांची उपजिविका कशी होणार?  

   मला पाऊस थेट खेड्यातच घेऊन जातो. शहरातला पाऊस मी आयुष्यातील अनेक वर्षे अनुभवला, अनुभवत आहे. माझा जन्मच मुंबईचा असल्याने शहरी भागातील पावसाशी मी जन्मापासूनच सुपरिचित आहे. पण माझे शालेय, महाविद्यालयीन जीवन कल्याण पूर्वेकडील खेड्यात गेल्याने आयुष्यातील त्या साऱ्या पावसाळ्यांचा प्रभाव अधिक खोलवर राहणे अगदी स्वाभाविक आहे. त्या खेड्यात आम्ही राहू लागलो तेंव्हा तेथे सुरुवातीला वीज नव्हती. पाणी विहीरीवरुन भरावे लागे. पक्क्या रस्त्यांची सोय अजिबातच नव्हती. तो १९६८-६९ पासूनचा काळ असावा. इयत्ता दुसरी ते पार एम ए पर्यंतचे सारे शिक्षण मी त्या खेड्यात असतानाच घेतले. जून महिना आला, शाळा सुरु झाल्या की तो नव्या वह्या-पुस्तकांचा वास मला बेभान करी. आता गेली अठ्ठावीस वर्षे मी इन्फोटेक सिटी, देशातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या पाचात येणाऱ्या नवी मुंबईत वास्तव्य करीत आहे. इथे माझ्या पायांना माती लागणेही दुरापास्त होऊन बसले आहे. पावसाळ्यातील पहिल्या शिडकाव्यानंतर येणारा मातीचा सुगंध वगैरे दुरुच राहिले. पावसाळा असो की उन्हाळा...गायी, बैल, म्हशी यांच्या शेणा-मुताचा वास जिथे नित्यनेमाने पसरत असे अशा खेड्यात राहिल्याने त्या वेगळ्या माहौलाचा मी साक्षीदार आहे.

     ‘त्या' काळात सर्वसाधारणपणे वटपौर्णिमेच्या सुमारास पावसाच्या नियमित सरींना सुरुवात झालेली असे. माझी आई मलाही लहानपणी त्या वडाच्या झाडाकडे सोबत नेई. आजही तो वटवृक्ष तेथे तसाच आहे. आई मात्र आज माझ्या सोबतीला नाही. कल्याण पश्चिमेला त्यावेळी बागडे स्टोअर्स नावाचे शालेय-महाविद्यालयीन पुस्तके विकणारे दुकान होते. न्यू प्रकाश नावाच्या चित्रपटगृहासमोर! तेथून आईच मला वह्या-पुस्तके आणून देई. कल्याणच्या बाजारातून आंबे, फणस, वरुन चिकूसारखी दिसणारी..पण नरम आणि आंबट गोड चवीची अळू जातीची फळे, डाळी, तेले, कडधान्य आणि सोबत आम्हा भावंडांची वह्या पुस्तके आई आणी. या साऱ्यांचा तो संमिश्र दरवळ आणि सोबतीला ओल्या मातीचा तो धुंद सुवास! मी शिकून नोकरीला लागल्यावर आजवर देशी-विदेशी विविध प्रकारचे महागडे पर्फ्यूम्स वापरले...पण आईने पिशवीतून आणलेल्या त्या फळांसोबत नव्या पुस्तके-वह्यांचा आणि ओल्या मातीचा तो सुगंध मला कोणत्याच पर्फ्यूममध्ये कधीही आढळला नाही. आम्ही राहात असू त्या गावाजवळून काही अंतरावरुन उल्हास नदी वाहत असे. प्रचंड पाऊस झाला, पूर आला की तिचे पात्र खूप व्याप्तीचे होई आणि भयकारक भासे. पहिल्या पावसाच्या जोरदार सरींनंतर शेते, जमिन, झाडे पुरेपुर भिजली की जिकडे तिकडे चिखल होई. गावात वीज नव्हतीच आणि ती आल्यावरही कधी साधे आभाळ गडगडले, सोसाट्याचा वारा सुटला, एकदोन फांद्या पडल्या की ‘वीज मंडळाच्या कृपेने' वीज गायब होई. कधी कधी ती चार चार दिवस येत नसे. त्या पावसात गावातील लोक रात्री मुठे (शेतात, रानात दिसणारे खेकडे) पकडायला बाहेर पडत. पिवळे नांगे असलेले व चॉकलेटी रंगाच्या पाठीचे मुठे रात्रीच्या अंधारात टेंभे (पलिते) घेऊन शोधले जात. मुठे पकडण्यासाठी बिळात हात घातल्यावर कधी कधी सापही हाताला लागत असे. हे मुठे मग त्यांच्या पोटात बेसन घालून बनवले जात. प्रचंड टेस्टी असा हा प्रकार आहे. त्यातही मुठे मोठे असतील व त्यांच्या नांग्यांत पांढऱ्या शुभ्र रंगाचे भरपूर मांस असेल.. तर क्या कहने! पहिल्या पावसाच्या गडगडाटानंतर माळरानावर जमिनीतून ‘भोपर' नावाचे मऊ स्पंजसारखे आणि बटाट्यासारखे दिसणारे..पण पांढऱ्या रंगाचे कंद बाहेर येते. त्याची भाजी छान लागते. आता त्या खेड्यासभोवताली कुठेच माळराने शिल्लक राहिली नाहीत, तिथे भोपर कुठून दिसणार? नव्या पिढीतील अनेकांना हे भोपरही  माहित नसेल.

   पाऊस काळात आम्हाला शाळेत जाण्यासाठी वडील रेनकोट आणून देत. पण तेही लवकर फाटे. छत्र्यांची अवस्था मोठ्या सरींमध्ये दयनीय होत असे. कधी कधी सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे छत्र्या उलट्या होत व आमची दपतरासकट आंघोळ होत असे. भर पावसांत भिजून शाळेत गेल्यावर पुन्हा तेथे शाळा सुटेपर्यंत ओल्या कपड्यांनिशी बसणे हाही एक खास अनुभव असे. मग घरी आल्यावर ती वह्या-पुस्तके सुकवणे या प्रकाराला सामोरे जावे लागे. पावसाळा आणि राहत्या घराच्या आसपास पाहायला मिळणारे साप यांचे अनोखे समीकरण आहे. आमच्या जागेत भरपूर झाडे होती आणि पावसाळ्यात गवतही खूप वाढत असे. दारातच बांबूचेही बन होते.  कौलारु घर असल्याने वेड्यावाकड्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला की कौले खालीवर झाल्यास गळतीही लागे. नानेटी नावाचे बिनविषारी साप अंगणात पाहायला मिळत. धामण, अजगर, दिवड यांचेही दर्शन होई. काही साप फारच ‘मानवफ्रेंडली' व्हायला मागत व घरात घुसत. घराच्या आड्याला, कौलांखालच्या लाकडी पट्ट्‌यांना विळखा घालत. मग गावातील शेजारपाजारचे अतिउत्साही लोक येऊन त्यांना त्यांच्या पध्दतीने मार्गाला लावत असत. मीही त्या काळात अनेक सापांचा बंदोबस्त केला आहे. पुढे जाऊन मी सर्पमित्रांच्या सहवासात येईन, सर्पमित्रांचे कार्यक्रम आयोजित करीन, सर्पमैत्रीच्या शेकडो कार्यक्रमांचे निवेदन करीन, त्यांच्या मुलाखती घेऊन आघाडीच्या दैनिकांतून तसेच युट्युब वाहिन्यांवरुन प्रकाशित करीन असे मला तेंव्हा कधीही वाटले नव्हते.

   पावसाळा आणि आमच्या त्या खेड्यातील चिखल, रस्त्यांची नेहमीचीच दुर्दशा, रस्त्यावरुन पावसाचे भरभरुन वाहणारे पाणी, चपला तुटणे, पायाला नेहमीच काहीतरी लागून जखम होणे,  अंधार, साप, वीज जाणे, रस्त्याने येता-जाता चावरे कुत्रे मागे लागणे, मग चौदा इंजेवशनची भिती वगैरे या आणि अशा काही नकारात्मक गोष्टी पाहायला मिळत असल्या तरी पाऊस ‘नकोसा' कधीच वाटला नव्हता.  मी राहात असलेले ते खेडे हे आता खेडे राहिलेले नाही. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा तो एक प्रभाग बनला आहे. त्या खेड्याच्या अवतीभवतीच्या शेतात, रानात, मोकळ्या जागेत अगदी डोंगरावरही इमारती उभ्या राहिल्या आहेत. रस्ते पक्के बनवले गेले आहेत. पाणीपुरवठा नियमित होत आहे. विहीरी बुजवल्या गेल्या आहेत. उल्हास नदीच्या त्या विशाल पात्रातही भराव टाकून इमारती उभ्या राहिल्या आहेत. माती दिसणेही  अवघड झाले आहे. ...आणि इकडे मी नवी मुंबईच्या इंफोटेक व नियोजनबध्द महानगरात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून राहात असल्याने माझ्याही घराच्या अवतीभवती बगीचे, मैदाने सोडल्यास माती पाहायला मिळत नाही. त्यामुळे मातीचे महत्व अधिकच पटत चालले आहे आणि पहिल्या पावसाळ्यानंतरच्या तिच्या त्या बेभान सुगंधासाठी जीव आसुसलेला असतो.

   ...म्हणून दमदार पाऊस झाला की मग पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या आमच्या शाळेतले आम्ही मित्र मैत्रीणी, फिरस्तींचे समुह भटकंतीसाठी निघतो. अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, माळशेज, खोपोली अशा निसर्गसंपत्तीची अजूनही लयलुट असणाऱ्या भागातील डोंगर, धरणे, तलाव, नद्या, रिसॉर्ट, धबधबे यांची वाट धरतो. यंदा मात्र जूनचा आता शेवटचा आठवडा सुरु होऊनही पावसाने हवा तसा ताल धरलेला नाही. त्यासाठी ‘पड रे पाण्या'अशी खर्जातील आवाजात आळवणी करु या...!  

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थेट मंत्रालयातून