कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेच्या पालकांचे आंदोलन

२६ जून रोजी थेट महापालिका मुख्यालयात शाळा भरविण्याचा इशारा

नवी मुंबई : आधुनिक पध्दतीचे दर्जेदार शिक्षणाचा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचा बुरखा कोपखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई शाळेतील पालकांनी उतरवला. गेल्या दोन वर्षांपासून या शाळेसाठी शिक्षकांची मागणी करुनही प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करुन न दिल्याने संतप्त झालेल्या पालकांनी २२ जून रोजी शाळेचा प्रवेशद्वारावर मुलांसह पाच तास ठिय्या आंदोलन केले. तसेच महापालिका प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त पालकांनी आक्रमक होत जोपर्यंत  कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेसाठी पुरेसे शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळा बंदची घोषणा करतानाच येत्या २६ जून रोजी थेट महापालिका मुख्यालयामध्ये शाळा भरविण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

कोपरखैरणे मधील महापालिकेच्या सीबीएसई शाळेत सद्यस्थितीत १,३७५ विद्यार्थी पटसंख्या असून या शाळेसाठी फक्त दहा शिक्षकांचीच नियुवती करण्यात आलेली आहे. त्यामुळे या शाळेचे पालक शिक्षकांची संख्या वाढवावी यासाठी गेली दोन वर्षांपासून मागणी करीत आहेत. त्यासाठी या पालकांनी महापालिका अधिकारी तसेच राजकीय नेत्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. यावर्षी कोपखैरणे सीबीएसई शाळेसाठी शिक्षकांची संख्या वाढण्याची पालकांना अपेक्षा होती. पण, शाळा सुरु होऊन बरेच दिवस झाले तरीही या शाळेसाठी शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे पालकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.

यावेळी पालकांच्या शिष्टमंडळाला महपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी चर्चेसाठी बोलावले. या चर्चेदरम्यान आयुवत नार्वेकर यांनी महापालिका प्रशासनामार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु असून लवकरच शाळेसाठी शिक्षक मिळतील, असे नेहमीचे उत्तर दिले. त्यामुळे पालकांनी आम्हाला ठोस लेखी आश्वासन द्या, असे सांगितले. पण, तसे आम्ही देऊ शकत नाही असे आयुवतांनी सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी २२ जून रोजी मुलांसह शाळेत येऊन प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु केले. त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करुन निषेधाच्या घोषणा दिल्या. सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला. यावेळी पालकांसमवेत विद्यार्थ्यांनीही आम्हाला शिक्षक द्या, अशा घोषणा दिल्या. जोपर्यंत शाळेमध्ये शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसंगी येत्या २६ जून रोजी महापालिका मुख्यालयात शाळा भरविण्याची घोषणा केली.

या आंदोलनावेळी पोलिसांनी देखील पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकांनी आम्हाला शिक्षक कधी देताय ते लेखी द्या, तरच आंदोलन मागे घेऊ असे पोलिसांना सांगितले.

विशेष म्हणजे पालकांनी आंदोलन सुरु केल्यानंतर महापालिका प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही. फवत तेथे आलेल्या शाळेच्या केंद्र समन्वयकांनी देखील आपले म्हणणे वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो एवढेच सांगून तेथून काढता पाय घेतला.

ऑर्डर काढलेल्या ६ शिक्षकांची शाळेला दांडी?
पालकांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी महापालिका प्रशासनाने २१ जून रोजी रात्री महापालिकेच्या इतर शाळेतील सहा शिक्षकांची कोपरखैरणे सीबीएसई शाळेत नियुवतीची ऑर्डर काढली. सदरची ऑर्डर दाखवत प्रशासनाने पालकांना आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. त्यावेळी ते शिक्षक आहेत कुठे? असा सवाल पालकांनी महापालिका प्रशासनाला केला. अखेर  ज्यांची महापालिका प्रशासनाने ऑर्डर काढली, ते शिक्षक २२ जून रोजी कोपरखैरणे येथे हजरच झाले नाहीत. विशेष म्हणजे यातील एकही शिक्षक या शाळेत दिवसभर फिरकला नाही.

‘मनसेे'सह ‘भाजपा' पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा...
यावेळी पालकांच्या आंदोलनाला ‘मनसेे'च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील आंदाेलन स्थळी येऊन आपला पाठिंबा दर्शविला. त्याचवेळी पालकांच्या आंदोलनाची खबर लागताच माजी आमदार संदीप नाईक यांनी स्थानिक माजी नगरसेवक मुनावर पटेल आणि लीलाधर नाईक यांना आंदोलनस्थळी पाठवले. या दोघांनीही पालकांना शिक्षक नियुवतीसाठ काही दिवस प्रतिक्षा करण्याची  विनंती केली. मात्र, पालकांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यामुळे मनावर पटेल यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिकेच्या शाळांमध्ये अवतरली पंढरी