मनसे विद्यार्थी सेनेचे महापालिका आयुक्तांना पत्र

महापालिकेच्या सीबीएसई शाळेत शिक्षक भरती प्रक्रिया रखडली ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेत शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने आज सोमवार, दिनांक १९ जून २०२३ रोजी निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, शहर सचिव समृद्ध भोपी, शहर सहसचिव नितीन काटेकर, शहर सहसचिव गणेश भोसले, मा. शहर सचिव सुमित जाधव, विभाग अध्यक्ष प्रदयुमन हेगडे हे उपस्थित होते.

गेली दोन वर्षे पालकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे उंबरठे झिजवूनही कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई बोर्डच्या शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. आता या शाळेत सहावीचा वर्ग वाढला असून, पटसंख्या १,३६५ पर्यंत गेली आहे. मात्र, त्यांना शिकविण्यासाठी मुख्याध्यापकांसह दहा शिक्षकच आहेत. त्यामुळे आता दिवसाआड शाळा भरविण्याचा निर्णय झाला आहे. यावर पालकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पालकांना शाळेचे नवीन वेळापत्रक पाठवले असून, यात पहिली व दुसरी हे वर्ग सोमवारी व बुधवारी भरविण्यात येणार असून, त्यांच्या असलेल्या चार तुकड्यांच्या आता दोनच तुकड्या करण्यात आल्या आहेत. तर तिसरी व पाचवीचे वर्ग मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी भरणार असून तिसरीच्या दोन, चौथीची एक व पाचवीची एक तुकडी केली आहे. तर सहावीचे वर्ग नियमित भरविण्यात येणार आहेत. मात्र, त्यांची १६० विद्यार्थ्यांची एकच तुकडी करण्यात आली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झालेच. शिवाय आता शाळा सुरू होऊन हे दुसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दर्जेदार शिक्षणाचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या शाळेत अशी परिस्थिती कोणामुळे ओढवली ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आला आहे. तसेच महापालिकेला ही शाळा बंद करायची आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत आता महापालिका मुख्यालयातच शाळा भरवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महापालिका आयुक्तांना निवेदनातून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर शिक्षक भरती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जून अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

modi@9 महा-जनसंपर्क-अभियान