मुशाफिरी : पातळी सोडणारे...आणि संयमाने बोलणारे !

पातळी सोडणारे...आणि संयमाने बोलणारे !

   इंग्रजांच्या गुलामीत असल्यापासूनच्या कालखंडाचा विचार केला तर पातळी सोडून राजकारण्यांचे बोलणे आत्ताच सुरु नसून त्याही काळात हे लोक मोकाटपणे बोलत असत. तेंव्हा सोशल मिडिया नसल्यामुळे नवरा-बायको, भाऊ-बहिणी, आजी-नातवंडे, नातेवाईक, शेजारी-पाजारी आतासारखे एकमेकांसमोर बसून मोबाईलमध्ये घुसलेले नसत. शिक्षणाचे प्रमाण कमी होते. टीव्ही आला नव्हता. वर्तमानपत्रे वाचली तरच राजकारणी किंवा अन्य कुणी दुसऱ्याबद्दल काय बोलल्याचे समजे. आता ते ‘सारे करलो दुनिया मुठ्ठीमे' स्वरुपात त्याच क्षणाला बसल्याजागी समजते.  

   दिवस होता..१० जून २०२३. स्थळ नेरुळ, नवी मुंबईमधील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरील प्रशस्त सभागृह आणि प्रमुख पाहुणे, ववते होते महाराष्ट्राचे तत्कालिन विधानसभाध्यक्ष आणि तत्कालिन गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील. कार्यक्रम होता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या नवी मुंबई केंद्रातील कृतज्ञता पुरस्कार वितरणाचा. पुरस्कार विजेत्यांमध्ये तीन सेवाभावी-स्वयंसेवी संस्था,  माझ्यासह तीन पत्रकार आणि अन्य विविध क्षेत्रातील गुणवंतांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकाहुन एक विविध प्रकारच्या आमदारांचे भाषण ऐकण्याची, त्यांना योग्य वेळी रोखण्याची, समज देण्याची, प्रसंगी कारवाई करण्याचीही जबाबदारी पेलणारे श्री. दिलीपजी वळसे-पाटील या प्रसंगी आमच्यासमोर बोलताना काय विचार मांडतात याची मला उत्सुकता लागलेली...

   कोणताही वक्ता हा आपल्या भवतालाचा, वर्तमानात घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेत, मागील काही दाखले देत, भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग, घटना यांचे अवलोकन करतच आपले विचार मांडत असतो. त्याप्रमाणे श्री. वळसे पाटील यांचे भाषणही मुद्देसूद, नेटके, प्रसंगानुरुप होते यात शंकाच नाही. त्यांनी सध्या टीव्हीवर ज्या प्रकारे पातळी सोडून राजकीय मंडळी प्रतिस्पध्यार्ंचा उल्लेख करत सुटली आहेत तिकडे अंगुलीनिर्देश करीत ‘पाच मिनिटांत टीव्ही बंद करावासा वाटतो' असे म्हणत ‘अलिकडील राजकारणाचा स्तर खालावला' असल्याचा मुद्दा आपल्या भाषणात मांडला. नवरा-बायकोही दोन-दोन तास एकमेकांसमोर बसलेले असतानाही परस्परांशी अजिबात न बोलता कसे मोबाईलमध्येच घुसलेले असतात, काय होणार या देशाचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला तोही विचार करायला लावणारा आहे. त्यातील राजकारण्यांच्या  ‘पातळी सोडून बोलण्या'च्या मुद्दयाचा आपण विचार करु या.

    देशाच्या पारतंत्र्य काळातही या मराठी मुलकात मराठी माणसांनीच एकमेकांविरोधात अनर्गल, कठोर, असंवेदनशील शब्दांचा यथेच्छ उपयोग केल्याची उदाहरणे आहेत. यात एकेकाळचे शिक्षक तसेच संपादक, नाटककार, निर्माते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ‘मुलुखमैदान तोफ' म्हणून ओळखले जाणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आघाडीवर होते. ते राजकारणातही सक्रीय होते व महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे आमदारही होते.  त्यांनी भूदान यज्ञाचे प्रणेते आणि देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कारप्राप्त विनोबा भावे यांना ‘विनोबा की वानरोबा?' असे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धामधुमीत म्हटले होते. तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘नर्कतीर्थ' असेही त्यांनी संबोधले होते. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना ‘संडासातून पळालेला वीर' असे म्हणण्यापर्यंत अत्रे यांनी मजल मारली होती. मंत्रीपद भूषवलेल्या नामदार स.का.पाटील यांना त्यांनी ‘नासका पाटील' असे नाव ठेवले होते. तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर गोळ्या चालवणाऱ्या तत्कालिन मुंबई राज्य ‘मुख्यमंत्री मोरारजी देसाई याला महारोग होईल, त्याची बोटे झडतील' असे लिहायला-बोलायला त्यांनी कमी केले नव्हते. अत्रे यांना काही अंशी लगाम लावण्याचे काम तत्कालिन पत्रकार, साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे यांनी केले होते. त्यावेळी भाव्यांचे आदेश व अत्रे यांचे नवयुग या दोन वर्तमानपत्रांतून एकमेकांविरोधात यथेच्छ चिखलफेक करण्याचे कामही चाले. परस्परांविरोधातील बदनामीकारक मजकूरावरुन प्रकरण न्यायालयापर्यंतही गेले होते. त्यावेळी अत्रे काँग्रेसींची पाठराखण करीत, तर भावे हे हिंदुत्ववाद्यांची! त्यावरुनही इथे न छापण्यासारख्या शब्दात एकमेकांबद्दल त्यांनी वर्तमानपत्रांतून वृत्त प्रसिध्द केले आहे. याच अत्रे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘वरळीचा डुवकर' असे म्हणायला कमी केले नव्हते.

   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक नामांकित, वलयांकित मराठी व्यक्तीमत्वांनाही शेलक्या शब्दांनी दुखावले. माजी खासदार, पानीवाली बाई मृणाल गोरे यांनी ते ‘पुतना मावशी' असे म्हणत. छगन भुजबळांना ‘लखोबा लोखंडे' हे नाव त्यांनी ठेवले होते. सायंदैनिक आपलं महानगरचे संपादक निखिल वागळे यांना ते ‘माहिमचा महारोगी' असे म्हणत असत. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या व पु्‌न्हा शिवसेना सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा उल्लेख बाळासाहेबांनी सामनाच्या अग्रलेखातून ‘फितुर भोसला' असा केला होता. लोकसभा निवडणुकीसाठीच्या पेण येथील जाहिर सभेत बाळासाहेब ‘कॉंग्रेस हा हिजड्यांचा पक्ष' असे म्हणाले होते व ती बातमी सामनाने पहिल्या पानावर आठ कॉलमांत छापली होती. शरद पवार यांना त्यांनी 'मैद्याचं पोतं' असंही अनेकदा संबोधलं हेही अनेकांच्या स्मरणात असेलच!

   खरेतर आक्रमक भाषणांसाठी स्व. प्रमोद महाजन तसे नावाजलेले नव्हते. पण त्यांनीही एका जाहीर सभेत ‘या काँग्रेसवाल्यांना तांबी बसवायला पाहिजे' असं म्हणून टाकलं होतं. सांगायचं तात्पर्य हेच की आता संजय राऊत, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, विनायक राऊत, नारायण राणे, नितेश राणे, गुलाब पवार आणि मंडळी ज्या भाषेत बोलत आहेत, त्याच्याही पेक्षा जहाल व कडवट भाषा ही आधीच्या पिढीतील राजकारण्यांनीही वापरली आहे; पण सोशल मिडिया त्यावेळी अस्तित्वात नसल्याने ती ववतव्ये लगेच व्हायरल होऊन दंगली, चप्पलफेक, दगडफेक, बंद, चवका जाम, जोडेमारी, शुद्धिकरणे, पोस्टरी जाळपोळ तेवढी होत नसे. शाब्दिक निषेधावर भागत असे. त्यावेळचे नेतेही माफ करण्याचा मोठेपणा दाखवीत. या मोठेपणाचे एक उदाहरण मला ज्या यशवंतराव चव्हाण सेंटरचा पुरस्कार मिळाला, त्याच महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे यांच्याशी संबंधित आहे. स्व. यशवंतराव चव्हाण राज्याचे प्रथम मुख्यमंत्री झाल्यावर आचार्य प्र.के.अत्रे यांनी त्यांच्यावर या मुलबाळ नसलेल्या माणसाकडून महाराष्ट्राची कशी प्रगती होईल, यांच्या कामाने राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल? या प्रकारचे शब्दप्रयोग वापरत झोंबरी टीका केली होती.

   संवेदनशील, उच्चशिक्षित, संयमी यशवंतरावांनी अत्रे यांना या टीकेनंतर आपल्या दालनात बोलावून सांगितले की अत्रेसाहेब, ‘तुम्ही माझ्यावर जहरी टीका केलीत..मला मूलबाळ नसलेला म्हटलेत. पण मला मूलबाळ का झाले नाही, तेही जरा ऐका.'  मग यशवंतरावांनी सांगितले की, ‘इंग्रज राजवटीत मी आंदोलने करीत असल्याने मागावर असलेले इंग्रज पोलीस माझ्या घरी मला शोधत आले. माझ्या पत्नीला त्यांनी माझा ठावठिकाणा विचारला, तो तिने न सांगितल्याने तिच्या पोटावर इंग्रज अधिकाऱ्याने लाथ मारली. त्यावेळी गरोदर असलेल्या वेणूताई चव्हाण यांचा गर्भपात झाला व त्यापुढे त्या कधीही आई होऊ शकणार नाहीत असे डॉक्टरांनी जाहिर केले.'  हे ऐकून सद्‌गदीत झालेल्या अत्रे यांनी यशवंतरावांची माफी मागितली व त्यांच्या पाया पडण्यासाठी ते वाकले. तेंव्हा यशवंतरावांनी त्यांना वरचेवर धरले व म्हणाले की, ‘विद्वत्तेने सत्तेपुढे असे झुकायचे नसते.'

   या प्रसंगाचा उल्लेख यशवंतरावांच्या भूमिका, त्रणानुबंध या पुस्तकांत नसावा. तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘कऱ्हेचं पाणी' या आत्मचरित्रातही तो नाही. मग कुणी विचारील की हे तुम्हाला कसं समजलं म्हणून! हा उल्लेख मी याच स्तंभातून पंधरा वर्षांपूर्वी केला होता..तो वाचून महाराष्ट्राचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, रायगडचे माजी खासदार, पनवेलचे माजी आमदार स्व. दि.बा. पाटील साहेब यांनीही मला असेच फोन करुन ‘या' उल्लेखाबद्दल विचारणा केली होती. त्याचे उत्तर असे की २००४ साली स्त्री शक्ती संवर्धन केंद्र, कन्नमवार नगर-विक्रोळी या संस्थेने ठेवलेल्या ‘वृत्तपत्रलेखक : एक जागृत व जबाबदार नागरिक' या विषयावरील लेख स्पर्धेत मला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले होते आणि पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे होते आचार्य अत्रे यांचे निकटतम सहकारी आणि त्यांच्या वर्तमानपत्राचे उपसंपादक स्व. काकासाहेब पुरंदरे. त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणात हा प्रसंग सांगितला होता. पुरंदरे यांना अत्रे किंवा यशवंतराव यांच्याबद्दल चूकीची, स्व-रचित, काल्पनिक माहिती देण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे असे घडले असणार असे मानायला जागा आहे.

   वाद  तेंव्हाही व्हायचे, पातळी सोडून भाषा तेंव्हाही वापरली जायची...पण त्यावेळची व्यक्तीमत्वेही डोंगरासारखी होती. समोरच्याचे म्हणणे पटल्यावर माफी मागण्याचा मोठेपणा त्यांच्या ठायी असल्याने त्यांना खुल्या दिलाने क्षमाही केली जात असे. यशवंतरावांच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाल्यावर हे सारे आज मला पुन्हा लख्खपणे आठवले.

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक - दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पाऊस कधीचा पडतो...!