महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
निर्लज्जपणाची हद्द! : थेट मंत्रालयातून
निर्लज्जपणाची हद्द! -
सारं काही माझ्यामुळेच घडतं. विश्वाचा निर्माता मीच, अशा अहंकारात वावरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार बालासोरच्या भीषण रेल्वे अपघाताने लोप पावला तर चांगलंच. पण घमेंडी माणसाची देहबोली तसं होऊ देत नाही. शाबासकी घ्यायची असेल तर मी आणि संकट आलं की दुसऱ्याला पुढे करण्याची हिकमत मोदींनाच शोभते. इतरांच्या ती अंगलट आली असती. स्वातंत्र्यानंतर आजवरच्या भीषण अपघातातील एक अशा बालासोरच्या तिहेरी रेल्वे अपघाताने हाहाःकार माजला नसता तर नवलच. या घाताने भारत सरकारचा, सरकार चालवणाऱ्या भाजपचा आणि भाजपचं नेतृत्व करणाऱ्या मोदी-शहांच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटला. तरी निर्लज्जासारखी ही माणसं लोकांना फसवताहेत. भाजप सत्तेच्या नऊ वर्षात देशाने काय कमावले आणि किती गमावले याची उजळणी केली तर सरकारच्या नादानपणामुळे देश पंचवीस वर्षं मागे गेला, असंच म्हणावं लागेल. लाज तेव्हा जाते जेव्हा आपण अपघासारख्या घटनांचं इव्हेंट करायला मागे पुढे पहात नाही. केंद्रातल्या मोदींच्या सत्तेतील मंत्री कोण याची माहिती घ्ोतली तर ती कोणीही देऊ शकत नाही. ज्याला ती असेल तो त्या मंत्र्याकडील खात्याची धड माहिती देऊ शकणार नाही. याला अपवाद विरोधकांवरील कारवाईने कायम लाईमलाईटमध्ये असणारे अमित शहा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी. सकारात्मक कामासाठी मोदींच्या मंत्रिमंडळातील गडकरी हे एकमेव मंत्री लक्षात राहतात. इतर मंत्री कोण आणि ते काय करतात याचं देशालाही काही ठावूक नाही. कारण जे काम एखाद्या खासदाराने वा राज्यमंत्र्याने करायचं ते काम पंतप्रधान मोदी यांच्या नावावर नोंदवलं जात असल्याने तिथे ना मंत्र्याला किंमत ना राज्यमंत्र्याला. खासदार तर पासंगालाही पुरत नाहीत.
बालासोरच्या अपघाताने अश्विनी वैष्णव हे देशाचे रेल्वेमंत्री आहेत हे देशवासीयांना कळलं. तेही अपघातातग्रस्त झालेल्या रेल्वेच्या बोगीच्या खालून बाहेर आले तेव्हा. आपण मंत्री आहोत हे कळावं म्हणून हा इव्हेंट करण्यात आला की काय असं वाटावं. लाज कशी कोळून प्यायची असते ते पंतप्रधान मोदींनी याआधीच अनेक इव्हेंटमधून दाखवून दिलंय. अपघातस्थळी भेट द्यायला गेले तेव्हाही तीनवेळा कपडे बदलून इथेही मोदींनी इव्हेंटबाजी करून घ्ोतली. पण वैष्णव तर एकेकाळी प्रशासनाची जबाबदारी घ्ोणारे नेते. त्यांनी किमान असला दिखावा टाळावा? वैष्णव यांनी मंत्री म्हणून दाखवलेली ‘तत्परता' देशाने पाहिली. तात्काळ रवाना झालेल्या मोदींचे तीनदा बदललेले कपडेही लोकांनी पाहिले. मनाचीही नसली की असा प्रकार होतो. निर्लज्ज असे वर्तन करू शकतात.
आपल्या देशातील रेल्वेचं जाळं हे जगातील इतर कुठल्याही देशाहून मोठं आहे. ६८ हजार ६३ किलोमीटरच्या या रेल्वेच्या जाळ्याने देशवासीयांना अधिक सुखकर आणि आरामदायी तसंच वेळेत प्रवास करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळालीच. पण अल्परोजंदारी करणाऱ्यांनाही रेल्वेने हात दिला. त्यांना कमी पैशात प्रवासाची संधी मिळाली. आणि की पगारातही उसंत मिळाली. १८७५ ला मुंबई ते ठाणे या पहिल्या लोहमार्गाचा मुहूर्त केवळ ब्रिटिशांच्या कर्तबगारीपुरता सिमीत होता. आज तो विस्तारला गेला आहे. केंद्र सरकारांनी वेळोवेळी निर्णय घ्ोत सारा देश रेल्वेच्या जाळ्यांनी विणून काढला. मोदी आणि त्यांची पिळावळ काहीही म्हणत असली तरी केंद्रातल्या काँग्रेस सरकारांनी यासाठी घ्ोतलेल्या मेहनतीचं कौतुक करावच लागेल. ७० वर्षात काँग्रेसने काय केलं, असं विचारणाऱ्या मुर्दाडांना ते सांगून उपयोग नाही. प्रा. मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या नेतृत्वात कोकणात रेल्वेचं जाळं विणलं जाऊ लागलं तेव्हा खडतर भौगोलिकतेमुळे अपघातांची मालिका वाढली. अपघातांच्या या शुक्लकाष्टातून रेल्वेला बाहेर काढण्यासाठी त्यानंतरच्या काँग्रेस सरकारने पुढे मेट्रोमॅन म्हणून गौरवल्या इलात्तूवलपील तथा इ. श्रीधरन यांच्याकडे कोकण रेल्वेची जबाबदारी सोपवली. त्यांनी ती यथोचितपणे पार पाडली आणि संभाव्य अपघातांपासून देशाच्या रेल्वेचं रक्षण करण्याचा मार्ग आखून दिला. ही घटना २०१२ची. रेल्वेचे अपघात टाळावेत यासाठी संपूर्ण देशी तंत्र विकसित करून श्रीधरन यांनी तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांची वाहवा मिळवली. तेव्हा श्रेयासाठी कोणी काम करत नव्हतं. विशेष म्हणजे सरकारमधील मंत्र्यांनाही ती हौस नव्हती. मनमोहन सिंग तर त्याहूनही दूरचे होते. त्यांनी श्रीधरन यांना त्याचे जाहीर श्रेय देऊन त्यांचं कौतुक केलं. पण आज मोदींना ते योग्य वाटलं नाही. श्रीधरन यांना श्रेय देण्यास नकार देत स्वतःची छबी मोदींनी नाचवली. श्रीधरन यांचं हे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्याऐवजी सुमारे पाच वर्ष मोदींच्या सरकारने या यंत्रणेला दाबून ठेवलं. आणि पुन्हा सरकार आल्यावर जणू तो शोध आपलाच असं भासवून तेच तंत्र ‘रेल्वे कवच' नावाने विकसित केल्याचा बॅण्ड वाजवायला मोदींच्या चमच्यांनी सुरुवात केली. बालासोरच्या या अपघाताने मोदींचा हा खोटारडेपणा बाहेर आला. संबंध नसताना श्रीधरन यांचं श्रेय लाटण्याच्या हावरटपणाने मोदी सरकारचं पुरतं हसं झालं.
अपघात झालेल्या रेल्वेबोगी खालून बाहेर पडण्याचं नाटक करणाऱ्या याच रेल्वेमंत्र्याने ‘रेल्वे कवच'चं कवित्व गायलं होतं. आपण आणि मोदींचं सरकार किती कामात गुंतले आहोत, हे दाखवण्याचा वैष्णव यांचा आटापिटा तेव्हा कोणाच्या लक्षात आला नाही. ज्या कवचाची भाषा मंत्री करत होते त्याआधीच ते विकसित झालं होतं. टीसीईएस या नावाने ते विकसित होऊन ११ वर्षांचा काळ लोटला होता. २०१२मध्ये विकसित झालेल्या या यंत्रणेत तसुभरही प्रगती न करता ते श्रेय मंत्र्याने आणि मोदींनी स्वतःच्या नावावर खपवलं. प्रसिध्दीसाठी हापापलेल्या मोदी यांना असे इव्हेंट देणारेच मंत्री हवे असतात. पाचशे मीटरच्या अंतरात समोरासमोर येणाऱ्या कोणत्याही रेल्वेची एकमेकांशी टक्कर होणार नाही, असं हे मोदींचं तंत्रज्ञान बालासोरच्या अपघातात कुठे दडून बसलं होतं?
एकाचवेळी तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळून २७५ जणांचा बळी घ्ोत असूनही कोट्यवधींचा खर्च दाखवून विकसित केलेलं तंत्र कामी येत नसेल तर ते अपयश कोणाचं? मोदींनी ज्यासाठी कोट्यवधी रुपयांचा जाहिरात चुराडा केला, त्याची जबाबदारी कोणाची? हे कवच रेल्वेत का बसवलं गेलं नाही? ते न बसवता त्याचा ढोल वाजवला गेला की तो विकसित न करताच पैसे लाटले गेले?
१९५६ च्या कल्मेलाजू रेल्वे अपघातात १४२ जणांचे प्राण गेले तेव्हा या अपघाताची जबाबदारी घ्ोत तेव्हा जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळातील रेल्वेमंत्री असलेल्या लालबहाद्दूर शास्त्री यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. आता अशा राजीनाम्यांची पध्दत राहिलेली नाही. तो काळ नैतिकतेचा असेलही. पण १९९९च्या आसाममध्ये २९० जणांचा बळी घ्ोतलेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घ्ोत तेव्हा नितीश कुमार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आज पंतप्रधानांपासून सगळेच खोटेपणाची साथ देऊ लागल्याने मंत्र्यांच्या राजीनामा हा विषयच कालबाह्य होतो. २०१६मध्ये तंत्र विकसित केल्याचा ढोल पिटला जातो आणि २०१९पर्यंत ते जैसे थे राहतं. २०१९ मध्ये टेंडरिंग सुरू होतं आणि तीन कंपन्यांच्या नावाने कामं वितरित होतात. तरीही हे काम दोन टक्क्यांहून पुढे सरकत नाही, याचा अर्थ काय काढायचा? ६८ हजार ६३ किलोमीटरच्या रेल्वेच्या जाळ्यात केवळ १४४८ किलोमीटर इतक्याच क्षेत्रात या ॲण्टी कोलिजन यंत्रणेचं काम झालं. तरी ढोल पिटला गेलाच. याचा अर्थ शहाण्याने काय काढावा? सत्ताधाऱ्यांंच्या दुर्देवाने इ. श्रीधरन यांचं शिक्षण जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या काकिनाडाच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीत पूर्ण करून त्यांनी आपलं कसब दाखवलं. आज नेहरू मोदी सरकारला नकोसे झाले आहेत. उठसूठ नेहरूंची बदनामी केली जात आहे. जे बदनामी करतात त्यांना मोदी फॉलो करतात. यावरून आपली लायकी मोदी सिद्ध करतात असं म्हटलं तर चूक काय? बुलेट ट्रेन आणि वन्देमातरम ट्रेनचा थाटमाट करणाऱ्या या सरकारला सामान्यांच्या जिविताचं काही पडलं असतं तर रेल्वेची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न झाले असते. दुर्दैवाने सरकार सामान्यांचं राहिलेलं नाही हेच या अपघाताने सिद्ध केलंय... - प्रविण पुरो