‘सिडको'च्या सह-व्यवस्थापकीय संचालकांनी गाजवली दक्षिण आफ्रिका

जागतिक कॉम्रेडस् मॅरेथॉनमध्ये डॉ. कैलास शिंदे यांचा ठसा

नवी मुंबई : जगातील सर्वात आव्हानात्मक आणि खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन महाराष्ट्रातील सनदी अधिकारी तथा ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. जगात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या ‘मॅरेथॉन'चे ८७.७ कि.मी. अंतर डॉ. कैलास शिंदे यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी ११ तास ६ मिनिटांत पूर्ण केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे कॉम्रेडस्‌ अल्ट्रा मॅरेथॉन सुरु होऊन १०० वर्षे झाली आहेत. यावर्षी या ‘मॅरेथॉन'चे शताब्धी वर्ष दक्षिण आफ्रिकेत साजरे करण्यात आले.  

दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारित्झबर्ग ते डर्बन या दोन शहरादरम्यान ८७.७ कि.मी. अंतराची मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी १२ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. डॉ. कैलास शिंदे यांनी ११.०६ तासांत ८७.७ किमी अंतर पार करुन आपली क्षमता सिध्द केली आहे.

मुंबई मॅरेथॉनसह महाराष्ट्रातील विविध मॅरेथॉन मध्ये नियमित भाग घेणारे सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'मध्ये यावर्षी सहभाग घेण्याचा निश्चय केला होता. त्याअनुषंगाने काही महिन्यांपासून ते पहाटेच्या सुमारास नवी मुंबईतील रस्त्यांवर, डोंगररांगांवर सराव करत होते. अखेर विहित कालावधीमध्ये सदर मॅरेथॉन पूर्ण करुन डॉ. शिंदे यांनी आपली क्षमता सिध्द केली आहे.  

‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'ची वैशिष्ट्येः

पीटरमारित्झबर्ग ते डरबन या दोन शहरादरम्यान ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन' आयोजित केली जाते. सदरचे अंतर ८७.७ कि.मी. इतके आहे. १२ तासात सदर अंतर पार करणे आवश्यक असते. पहाटे साडेपाच वाजता सुरु होणारी अल्ट्रामॅरेथॉन संध्याकाळी साडेपाचला संपते. जगभरातून २० हजार तर भारतातून ४०३ धावपटू या ‘कॉम्रेडस्‌ अल्ट्रा मॅरेथॉन' साठी सहभागी झाले होते. सदर स्पर्धा पूर्ण करण्यासाठी धावपटुंना निध्राारित वेळेत पाच कट ऑफ पॉईंटस्‌ पर्यंत पोहोचणे गरजेचे असते. शारीरिक, मानसिक, समर्पण आणि चिकाटी आदि गुणांची चाचणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात असल्याचे डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

आंतरराष्ट्रीय नॅचरल बॉडी बिल्डींग स्पर्धेत शीतल आंधळे यांना सुवर्णपदक