मुशाफिरी - केवळ ऐकणारा भेटला म्हणून !

बोलणे ही निसर्गाने मानवप्राण्याला दिलेली अनमोल देणगी आहे. काहींचे बोलणे ऐकत राहावे असे असते. काहींच्या वाणीला मंत्राचे सामर्थ्य असते. काहींचे मिश्किल, शेलवया शिव्या देत बोलणेही अनेकदा सुसह्य व वातावरण हलके करणारे असते. तर काहीजण नुसतेच अरभाट आणि चिल्लर पध्दतीचे अघळपघळ, बिनकामाचे बोलून समोरच्याला पकवण्यात मातब्बर असतात.

 नेरुळ, नवी मुंबई येथील लंडन पिल्सनर कंपनीत मी १९८५ ते २००१ अशी सुमारे पंधरा वर्षे काम केले. तेथे आमच्यासोबत एन.एन.भरुचा नावाचे ज्येष्ठ पारशी गृहस्थ सिव्हील सुपरवायजर म्हणून कामाला होते. त्याहीवेळी ते वयाने सत्तरीच्या पुढेच होते. कंपनीचे मालक लोक पारशी असल्याने भरुचा यांना विहित वयोमानानंतरही कामासाठी संधी मिळाली होती. स्वभावाने मिश्किल, नर्मविनोदी, किरट्या आवाजात बोलणारे, मराठीचे चांगले जाणकार असलेले भरुचा उंचीने ठेंगणे, पाठीला पोक असलेले व त्याही वयात चश्म्याविनाही वाचू शकणारे असे होते. दर दोन चार वावयांनंतर कचकचीत ‘शाकाहारी' शिवी दिल्याशिवाय त्यांचे संभाषण पुरे होत नसे. पण त्यांच्या मराठी, हिंदी, पारशी, गुजराती मिश्रित शिव्या ऐकायलाही मजा येत असे. त्यांना दिवसभर फ्रीझमध्ये ठेवलेली कॉफी प्यायला आवडे. त्यांना नेहमीचे डाळ, भात, भाजी, चपाती, अंडी, मटण, चिकन असे काही खाताना मी कधी पाहिले नाही. कारण त्यांच्या तोंडात दातही शिल्लक नव्हते. आमच्या ऑफिस बॉयने बनवून फ्रीझमध्ये ठेवलेली कॉफी थंड अवस्थेतच दिवसातून अनेकदा ते पित असत. त्यांना पाहुन मला पु.ल.देशपांड्यांच्या ‘व्यवित आणि वल्ली' मधील ‘हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका'च आठवत राही.

काम करताना ताण आला, वेळ जात नसला किंवा उगाचच खुमखुमी आली की मी भरुचांना डिवचत असे. मग त्यांच्या शिव्या ऐकल्या की ‘फ्रेश' होऊन पुढच्या कामाला लागत असे. मुंबई सेन्ट्रल भागात राहणाऱ्या भरुचांच्या घरी कूणीच नव्हते, त्यांचा विवाहही झाला नव्हता असे मी ऐकून होतो. पुढे त्यांचे काय झाले हे कळायला काहीच मार्ग नव्हता. आता तर ते या जगातही नसतील. सांगायचे तात्पर्य हेच की आपले जीवन मजेशीर, सर्वसमावेशक करण्यासाठी विविध प्रकारच्या अनुभवांची आवश्यकता असते. काही अनुभव हे आनंद देऊन जातात ...तर काही व्यवित का उगाच आपल्या संपर्कात आल्या (किंवा आपण त्यांच्या संपर्कात आलो...व्हाईस वर्सा) आणि आपल्याला त्या व्यवित पिडत राहिल्या असे वाटत राहते. विशेषकरुन वृध्दत्वाकडे झुकलेल्या व विस्मृतीचा आजार जडलेल्या लोकांच्या संपर्कात राहायला अनेकांना आवडत नाही. पत्रकार म्हणून माझा संपर्क दोन-तीन वर्षाच्या चिमुरडीपासून ९३ वर्षांच्या आजी-आजोबा-पणजी-पणजोबांपर्यंत साऱ्यांशी येतो. गेली अनेक वर्षे प्रसारमाध्यम विश्वात राहुन शेकडो लोकांच्या मुलाखती घतल्याने लोकांना बोलते कसे करायचे ते कसब थोडेफार मला जमते. त्यांना बोलते करायला जमते.. पण बोलणे थांबवायला जमण्याचे कसब माझ्याकडे नाही. जसे अभिमन्युला चक्रव्युहात घुसायचे कसे तेवढेच ठाऊक होते, पण चक्रव्युह भेदायचे कसे हे माहित नसल्याने घात झाला. तसे काहीसे माझ्याबाबतीत झाले असावे.

   माझ्या परिचयाची एक ज्येष्ठ व्यवित आहे. वेळी अवेळी मला कॉल करुन आपली (रड)कथा ऐकवणे हा त्या व्यवतीचा छंद. त्यातही ‘ऐन तारुण्यात आपण कसा काळ गाजवला, अनेकांना कशी मदत केली, आता कसे सारेजण विसरले, आपल्याला कसे एकटे पाडले जात आहे' असल्याच कथा ऐकवण्यात तिला रुचि आहे. बरे, बोलायला सुरुवात करताना समोरची व्यवित (म्हणजे मी!) ऐकायच्या स्थितीत आहे का, वगैरे फालतू गोष्टींशी तिला काही देणे-घेणे नसते. मी मिटिंगमध्ये आहे, मुलाखतीचे रेकॉर्डिंग सुरु होणार आहे, बसमध्ये चढतोय, उतरतोय, ट्रेनमध्ये अवघडलेल्या अवस्थेत कसाबसा उभा आहे आदि फालतू बाबी तिच्या खिजगणतीतही नसतात. ती थेटच सुरु होते आणि मी न विचारलेले तपशीलही उगाचच पुरवत राहते. एकदा तर तिच्या घरचा एसी बिघडला. तर तेही पालुपद मला ऐकवलं आण एसी व्होल्टासचा होता की रिअरचा हेच तिला आठवत नसल्याबद्दल चऱ्हाट लावत बसली. मग एसी रिपेअरिंगवाले कसे बदमाष आहेत, आपल्या सोसायटीतील सिवयुरिटीवाले कसे हरामखोर आहेत, कुणालाही विचारपूस न करता थेट घरी येऊ देतात, मग मागील महिन्यात वरच्या मजल्यावरील पलॅटमध्ये कशी चोरी झाली याची कहाणी मला ऐकावी लागली, ज्यात मला काहीही स्वारस्य नव्हते. पण ‘हवकाचा श्रोता' म्हणून तिने मला सारे ऐकवले आणि शेवटी ‘तुझे सारे ठिक चालले आहे ना', असे म्हणून कॉल बंद केला. आता बोला!

   बोलणाऱ्यांच्याही नाना तऱ्हा असतात. मग ते रस्त्यात भेटून बोलणे असो, माईकवरील भाषण असो, लग्नात रिसेप्शननंतर खुर्च्या गोलाकार लावून हाणलेल्या गप्पा असोत की बस-रेल्वे प्रवासात बाजूला बसून केलेले संभाषण असो. काहीजण शेजारी बसूनही इतवया हळू आवाजात बोलतात की कधी कधी मला वाटते यांनी आवाज चढवल्यास सरकार ज्यादा जीएसटी आकारेल की काय याची भिती त्यांना सतावत असावी. काहीजण बाजूलाच बसून अशा आवाजात बोलतात की गावात शेती करताना या बांधावरच्या लोकांना जणू त्या बांधावरच्या लोकांशी  बोलवायचे आहे..त्या सगळ्यांना आवाज जावा. अनेकांना समोरच्याशी बोलताना भलतीकडेच पाहुन बोलायची सवय असते. तर काहीजणांना बोलताना तोंडातील थुंकीचा फवारा दुसऱ्यावर स्प्रे पेंटींगसारखा उडवीत बोलण्याची खोड असते. काही जण नाना पाटेकरसारखे भडाभडाछाप बोलत असतात. तर काही जणी मागच्या पिढीतील सिने अभिनेत्री राखीसारखे संवाद चावून गिळल्यासारखे बोलतात. अनेकजण साऱ्या आयुष्यभर बोबडकांदयासारखे बोलतात. कुणाच्या व्यंगावर बोट आपण ठेवू नये. पण आपल्या बोलण्याचा इतरांना उपद्रव होऊ नये एवढीतरी काळजी बोलणाऱ्याने घ्यावी ही अपेक्षाही गैर ठरु नये. टेलिव्हिजन आणि सोशल मिडियाने जग व्यापण्यापूर्वीच्या काळात रेडिओची चलती होती आणि त्यावरील कार्यक्रम ऐकण्यासाठी अनेकजण जिवाचा आटापिटा करीत असत. ‘बिनाका गीतमाला'  हा कार्यक्रम रेडिओ सिलोनवरुन प्रसारीत केला जाई. पण तेवढ्या लांबून प्रसारण केले जात असल्याने त्यावरील ‘सरताज गीत वा इतर पायदानवरील गाजलेली' गाणी कधीही धड ऐकता येत नसत. पण दुसरी काहीच सोय नसल्याने लोक तेही चालवून घेत. माझ्या एका आप्ताला तसे बोलायची सवय आहे. म्हणजे तो बोलतो आपल्या समोरच उभा राहुन..पण इतके अस्ताव्यस्त व अघळपघळ की याला नेमके काय म्हणायचे आहे ते आपल्याला विस्कटून विस्कटून शोधावे लागते आणि दहा-बारा वावयांना एकत्रित केल्यावर मग कुठे त्याच्या पहिल्या-दुसऱ्या वावयाचा अर्थ लक्षात येतो.

मराठी दूरचित्रवाणी मालिकांसाठी पटकथा संवाद लेखक म्हणून लिखाण करणाऱ्या आणखी एका मित्राची तर न्यारीच तऱ्हा! खरे तर तो माझा प्रांत नव्हे. संवाद लेखनाचा मी कधी प्रयत्नही केला नाही. पण तरीही माझा तो मित्र असे लंबेचौडे संवाद मला मोबाईलवर कॉल करुन का बरे ऐकवतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. कदाचित तो माझ्यासारख्या इतरही ‘गाफील' श्रोत्यांच्या खनपटीला बसून त्यांनाही असेच त्याचे संवाद ऐकवत असावा असा माझा दाट संशय आहे. ‘ऐक ना जरा...नुकताच लिहिलंय.. कसं झालं आहे ते लगेच सांग..' अशी प्रस्तावना करीत त्याचा कॉल सुरु होतो. अनेकदा त्याने  मला अशा प्रकारचे कॉल करत मी प्रसाधन गृहात असताना तसेच कधी कधी तर हॉटेलमध्ये जेवत असताना, बाथरुममध्ये शॉवरखाली असताना, स्मशानात अंत्यविधीला गेलेलो असताना हे संवाद ऐकवायचा प्रयत्न केला आहे. मग ‘पायल निखिलला असे म्हणते...' (मग इथे पूर्ण लांबीचा डायलॉग..विस्तारभयास्तव मी इथे तो देत नाही.) चिरागने गश्मिरकडे जळजळीत कटाक्ष टाकत त्याला ऐकवले..‘हे बघ, मी काही केल्या त्या बंगल्यावरचा अधिकार सोडणार नाही आणि आईवडिलांची जबाबदारीही घेणार नाही...तुला करायचे ते कर.' हे असलं काहीतरी तो मला कोणत्याही कथानकाचा शेंडाबुडखा काहीही माहित नसताना मधूनच ऐकवत असतो...तेही मधले सारे पॉज-बिज घेत. आणि इकडे मी कपाळावर हात मारुन घघेत असतो.

अनेकांना स्वतः दुसऱ्याशी बोलत असताना चटकन हां... आता बोल याच्याशी/हिच्याशी म्हणत तिसऱ्याकडे फोन, मोबाईल देण्याची वाईट सवय असते. कुठलाही संदर्भ, परिचय, बोलण्याचा मु्‌द्दा, विषय माहित नसताना कुणाशी पटकन बोलणे म्हणजे सायकलने जाणाऱ्याला लगेच विमानात लोटण्यासारखा प्रकार असतो. अनेकांना याही संकटातून जावे लागत असते. तुमच्यापैकी कुणाकुणाला या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला आहे? बहुप्रतिक्षित पावसाच्या आणि  त्यानिमित्त करायच्या भटकंतीच्या आयोजनासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

राजेंद्र घरत, उपसंपादक, दै.आपलं नवे शहर, नवी मुंबई. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 जागतिक रक्तदाता दिन