जागतिक रक्तदाता दिन  

आज १४ जून, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील डॉ कार्ल लॅडस्टेनर या संशोधकाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. १४ जून हा त्यांचा जन्मदिन आहे. भारतात फक्त ०.६ टक्केच लोक रक्तदान करीत असतात. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात हे प्रमाण खूप कमी आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे लक्षात घेऊन प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.  

डॉ कार्ल लॅडस्टेनर यांनी ‘एबीओ' हा नवा रक्तगट शोधून काढला त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. पहिला जागतिक रक्तदाता दिन २००५ साली साजरा झाला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक सूत्र घेऊन हा दिवस साजरा केला जातो. माता सुरक्षा, रक्तदान श्रेष्ठ दान, डोनेट प्लेटलेट्‌स यासारखे सूत्र घेऊन त्याची माहिती या दिवशी दिली जाते. रक्तदानाचे आवाहन केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या या दिवसाच्या साजरीकरणात रेड क्रॉस सोसायटीचा हिरीरीने भाग असतो. कौन्सिल ऑफ युरोप ही संघटना देखील रक्तदाना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करते.

आपल्या देशात देखील विविध शासकीय,  सामाजिक, सेवाभावी संस्था या दिवसाचे आयोजन करून  लोकांमध्ये रक्तदाना संदर्भात जनजागृती करतात. या दिवशी रक्तदात्यांच्या सन्मान केला जातो. रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदान श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं कारण या दानामुळे माणसाचा जीव वाचतो. सुरक्षित रक्त ही अलीकडची वैश्विक समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी ९ कोटी युनिटपेक्षा अधिक रक्त दान केले जाते, तरीही रक्ताचा तुटवडा जाणवतो. अपघातग्रस्त व्यक्ती, शस्त्रक्रिया झालेले व्यक्ती, रक्तातील त्रुटी असलेल्या व्याधीग्रस्त व्यक्ती, बाळंतपणात होणारे मातांचे मृत्यू आणि कुपोषण, विविध प्रकारचे बाळ मृत्यू, साथीचे आजार अशावेळी रक्ताची खूप गरज पडते. कोरोना काळात तर रक्ताचा कसा अभूतपूर्व तुटवडा जाणवला होता हे आपण पाहिलेच आहे. कोरोना काळात रक्तदान शिबिरे बंद असल्याने देशात रक्तदानाचा अभूतपूर्व असा तुटवडा जाणवला होता. रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांनी नागरिकांना रक्तदान करावे असे आव्हान केले होते. भविष्यातही रक्ताचा असा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

आपल्या रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचतो. म्हणूनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हणतात.  रक्तदानाच्या रूपाने आपण मानवतेला एक मोठी देणगी बहाल करतो. रक्तदान केल्याने कोणतीही इजा किंवा दुष्परिणाम होत नाही. मनुष्याच्या शरीरात ५ लिटर रक्त असते आणि रक्तदानात केवळ ३५० मिली इतकेच रक्त घेतले जाते त्यामुळे कोणतीही कमजोरी जाणवत नाही. विशेष म्हणजे २४ ते ४८ तासात जेवढे रक्त आपण दान दिले आहे तेवढे पूर्ववत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हणून प्रचार होत असला तरी आपल्याकडे रक्तदात्यांची संख्या खुपच कमी आहे. भारतात फक्त ०.६ टक्केच लोक रक्तदान करीत असतात. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात हे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे देशात रक्ताची खूप कमतरता भासते त्यात कोरोना सारख्या महामारीत तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते. अपघातातील रुग्ण, प्रसव काळ, अतिदक्षता विभाग, तातडीच्या शस्त्रक्रिया अशा वेळी रक्ताची गरज निर्माण होते जर रुग्णांना वेळीच रक्त मिळाले नाही तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सजग राहायला हवे. आपल्या रक्तामुळे कुणाचा तरी प्राण वाचणार आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे लक्षात घेऊन प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.   -श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 निर्लज्जपणाची हद्द! : थेट मंत्रालयातून