महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
भारतातील शिल्पधन श्रीपुरमचे भव्य सुवर्ण मंदिर
सुवर्ण मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अमृतसरचे सुवर्ण मंदिरच उभं राहातं. पण आता वेल्लोर शहराच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या श्रीपुरम येथे संपूर्ण सोन्यांनी मढलेले भव्य सुवर्ण मंदिर उभारण्यात आले आहे. चला आता डोळ्याचं पारणं फिटविणारं हेच सुवर्ण मंदिर पाहूया....
या भव्य मंदिराला महालक्ष्मी सुवर्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. पंजाबमधील अमृतसर येथे बांधलेल्या सुंदर सुवर्ण मंदिराप्रमाणेच वेल्लोर येथील सुवर्ण मंदिराचाही जगातील आश्चर्यांमध्ये समावेश आहे. सोन्याने बनवलेल्या या अप्रतिम मंदिराचे सौंदर्य पाहण्यासाठी दररोज एक लाखाहून अधिक भाविक येतात.
दक्षिण भारतात बनवलेली मंदिरे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. ही मंदिरे प्रामुख्याने हिंदू मंदिरे आहेत. दक्षिण भारतातील या मंदिरांचे सौंदर्य आणि कलाकुसर हे पाहण्यासारखे आहे. तामिळनाडूच्या वेल्लोर शहरातील श्रीपुरम येथील सुवर्ण मंदिर दक्षिण भारतातील नारायणी अम्मा नावाच्या एका साधूने बांधले आहे, त्यांचे खरे नाव सतीश कुमार आहे. महालक्ष्मीचं हे मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णतः सोन्याचं बनविलेलं आहे. या सुवर्णमंदिराची चमक इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळीच आहे.
मंदिर पाहिल्यावर येथे नक्कीच महालक्ष्मीचा वास असेल असा विश्वास वाटतो. कळसापासून खांबांपर्यंत आणि पायापासून गाभाऱ्यापर्यंत सगळं सोन्याचं बनवलेलं आहे. इथं आल्यावर नजर जाईल तिथपर्यंत सोनंच सोनं दिसतं. मंदिराच्या भिंती सोन्याच्या, मंदिराचे सर्व खांब सोन्याचे, मंदिराची चौकट सोन्याची आणि मंदिरातील देवीची मूर्तीही सोन्याचीच. इथं आल्यावर मिडास राजाची कथा आठवते. तो ज्या वस्तूला हात लावायचा तिचं सोनं व्हायचं. इथंही प्रत्येक वस्तू सोन्याची आहे. देशातलं हे नवीन सुवर्णमंदिर शंभर-सव्वाशे नाही, तर चक्क १५०० किलो सोन्यापासून तयार करण्यात आलं आहे. जगातलं हे एकमेव मंदिर असावं जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं वापरलेलं आहे. सकाळी सूर्याची पहिली किरणं पडताच मंदिर झळाळून निघतं आणि रात्रीच्या वेळी हजारो विद्युत दीपांनी मंदिरचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.
वेल्लोर जिल्ह्यातल्या श्रीपूरम या निसर्गरम्य ठिकाणी तयार करण्यात आलेलं हे वैभवशाली सुवर्णमंदिर म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं नवीन केंद्र बनलं आहे. मंदिराचा प्रत्येक खांब त्याचा इंच अन् इंच भाग सोन्याने सजविलेला आहे. मंदिरात ९ ते १५ सोन्याचे पाट आहेत, जे शिलालेखांनी सुशोभित आहेत. मंदिरातील शिलालेखांची कला वेदांमधून घ्ोतली आहे. हे मंदिर नवीनच असल्यामुळे इथल्या सोन्याची झळाळीही इतर सुवर्णमंदिरांपेक्षा जास्त चमकदार आहे.
१०१ एकर जागेवर उभारलेलं हे सुवर्णमंदिर तयार करण्यासाठी १५०० किलो सोनं लागलं ज्याची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त आहे. दिवसा सूर्यप्रकाशात तर हे मंदिर दुरूनही उठून दिसतं. पण, रात्री लायटिंगमध्ये त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. कल्पनेतला स्वर्ग साक्षात भूमीवर तर अवतरला नाही ना, असं वाटतं. एखाद्या चित्रपटात किंवा स्वप्नातही जेवढं सोनं आपण कधी पाहिलं नसेल, ज्याची कल्पनादेखील आपण कधी केली नसेल, एवढं सोनं इथं उघड्यावर खुलेआम पाहायला मिळतं. मंदिराच्या सुरक्षेसाठी येथे चोवीस तास पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.
हे मंदिर बनविण्यासाठी तांब्याच्या हजारो प्लेट्सवर सोन्याचे नऊ ते दहा थर देण्यात आले आहेत. ७ वर्षे दररोज ८०० कामगार हे मंदिर तयार करण्यासाठी काम करीत होते. मंदिराच्या दर्शनी भागातील १००८ दिव्यांची तांब्याचे १० स्तर असलेली दीपमाळ लक्ष वेधून घ्ोते. कासवाच्या पाठीवर ही दीपमाळ उभारण्यात आली आहे. विशेष प्रसंगी १००८ दिव्यांची ही दीपमाळ प्रज्वलित करण्यात येते. दीपमाळेच्या मागे तीन दिशांना माँ दुर्गा, माँ लक्ष्मी आणि माँ सरस्वती यांच्या आकर्षक रंगीत मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात देशातील प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘तीर्थम सरोवर' बनविलेले आहे. मंदिराच्या प्रवेशमार्गावर हिरवागार बगीचा फुलविण्यात आला आहे. २० हजार प्रकारच्या नैसर्गिक औषधी आणि फुलांच्या रोपांनी, वृक्षांनी आणि झाडांनी हा बगीचा समृद्ध झालेला आहे. निसर्गापासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.
या मंदिरातली महालक्ष्मीची मुख्य मूर्ती ७० किलो सोन्यातून तयार केलेली आहे. मुख्य मंदिरात पुरुषभर उंचीची चांदीची गाय लक्षवेधक आहे. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर चांदीच्या गायीचं दर्शन लक्षात राहतं.
महालक्ष्मी नारायणी मंदिराची रचना सहा टोकांच्या चांदणी किंवा स्टारसारखी आहे. या रचनेला श्रीचक्र म्हणतात. मुख्य मंदिरात जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतराच्या या स्टार मार्गावर हिरवळ तयार करण्यात आली आहे. उन्हा-पावसापासून भाविकांचं रक्षण करण्यासाठी वर छत करण्यात आलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा मानवता आणि जनकल्याणासाठी उपयुक्त संदेश फलक लावण्यात आले आहेत. या अद्भुतरम्य आणि शांत वातावरणात येथील संदेशफलक अतिशय प्रभावी वाटतात. मंदिर निर्माण करणाऱ्यां ‘शक्तिआम्मा' या तरुण संन्याशाचा उद्देशही हाच आहे.
आपली नजर जिथंवर पोहोचते तिथं सोनंच सोनं दिसतं. तेही अत्यंत सुंदर, सुबक आणि मनमोहक नक्षीकाम केलेलं. आपण स्वर्गात महालक्ष्मीच्या खऱ्याखुऱ्या महालात तर नाही ना असं वाटू लागतं. स्वर्गसुख यापेक्षा आणखी काय वेगळं असतं?
माहिती संक.