पनवेलकर सियाच्या तिक्ष्ण बुध्दीमत्तेचे सर्वत्र कौतुक

चिमुरड्या सियाच्या विक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'मध्ये नोंद    

नवी मुंबई : ज्या वयात व्यवस्थित बोलता येत नाही, उभेही राहता येत नाही अशा वयात २५ देशांचे राष्ट्रध्वज ओळखणाया पनवेल मधील करंजाडे येथील सिया कैकाडी या १ वर्ष १० महिन्याच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ पाठोपाठ युके देशातील ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'ने नोंद घ्ोतली आहे. नुकतेच सियाला ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'कडून गौरविण्यात आले आहे. चिमुकल्या सियाची इतक्या कमी वयात ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'मध्ये नोंद झाल्याने तिच्या तिक्ष्ण बुध्दीमत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

 पनवेलच्या करंजाडे भागात राहणाऱ्या सिया सचिन कैकाडी या चिमुकलीचे वय अवघे १ वर्ष १० महिने इतके असून या वयात सियाने अवघ्या २ मिनिटे ३० सेकंदात २५ देशांचे राष्ट्रध्वज ओळखले आहेत. समोर ठेवलेल्या राष्ट्रध्वजाच्या देशांचे नाव पुकारल्यानंतर सियाने अचुकपणे राष्ट्रध्वज ओळखले आहेत. त्यामुळे गतवर्षी सियाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌'मध्ये नोंद झाली होती. त्यापाठोपाठ आता युकेतील ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'ने सियाच्या रेकॉर्डची नोंद घेऊन तिचा गौरव केला आहे. नुकतेच ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'ने सियाच्या पनवेल मधील घरी तिच्या रेकॉर्डचे प्रमाणपत्र पाठवून दिले आहे. येत्या दोन-तीन महिन्यात परदेशात होणाऱ्या रेकॉर्ड पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी सियाला प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.    

सियाच्या या तिक्ष्ण बुध्दीची पारख तिची आई सुप्रिया यांनी केली. त्यानंतर सुप्रिया यांनी सियाची नियमित उजळणी सुरु केली. यात सियाकडून कौतुकास्पद प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुप्रिया यांनी तो गुण ओळखुन सियाच्या रेकॉर्डचा व्हिडीओ प्रथम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌'ला तसेच ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'ला पाठविला होता. सियाच्या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌'ने नोंद घेऊन तिचा गौरव केला. त्यानंतर सियाच्या या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्डस्‌ युनिव्हर्सिटी'ने १२ मे २०२३ रोजी घेऊन तिचा गौरव केला आहे.  

सिया ९ महिन्याची असतानाच ती सगळ्या देशाचे झेंडे ओळखत होती. दिवसातून तीनवेळा प्रत्येकी पाच मिनिटे अगदी हसत खेळत सियाचा अभ्यास घेतला. यातूनच सिया सर्व गोष्टी ओळखू लागल्या. याशिवाय चिमुकली सिया ए टू झेड अल्फाबेट ओळखते. त्याचप्रमाणे १४ भाज्या, १७ शरीराचे भाग, १९ जंगली प्राणी, १८ फळे ओळखते. या व्यतिरिक्त डॉक्टर्स, छायाचित्रकार, ग्रह तारे, सैनिक यांना देखील सिया त्वरित ओळखत असल्याचे सुप्रिया कैकाडी यांनी सांगितले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी