महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
प्रासंगिक : शिवराज्याभिषेक आणि आम्ही
शिवाजी महाराज हे ‘छत्रपती शिवाजी महाराज', झाले, त्या अविस्मरणीय प्रसंगास ६ जून २०२३ रोजी बरोबर ३४९ वर्ष पूर्ण होऊन, ३५० वें वर्ष सुरू होत आहे. त्या निमित्तानं खूप सारी धामधूम सुरू आहे, ती कृतीतून कायम टिकावी, एक दिवशीच्या भक्तीतून आटू आणि दाटू नये,नाहीतर शिव विचार, आचार आणि संस्कारांचा धागा तुटू आणि फाटू दिल्यास आपणास ते बोल लागेल.
६ जुन १६७४ ते ६ जून १९७४ बरोबर, शिवराज्यभिषेकास ३०० वर्ष पूर्ण झाली होती म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी हया रायगडावर येऊन गेल्या होत्या, महाराज यांना वंदन करून गेल्यात, मात्र गडांचा राजा रायगड आजही तसाच आहे, तो फक्त आणि फक्त उत्सव धनी झाल्यासारखा सजतोय दिसतोय, सोहळा झाल्यावर गडावर असणारे आपले प्रेम हे, ‘भारत माझा देश आहे,.... आणि माझे माझ्या देशावर प्रेम आहे,' इतकेच दिसते.
आजही महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३५० वर्ष पदार्पण सुरुवात होत असतांना, महाराज यांच्या ३५० किल्यांवर भगवा ध्वज आणि रोषणाई करून भागणार नाही तर त्या सर्व आपल्या स्वराज्य, स्वातंत्र्य आणि आभूषणावर आपणास महाराष्ट्र अर्थव्यवस्था कशी पेलवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. कर दुबईसारखे देश वाळूत काहीतरी उभे करून पैसे कमावत आहेत, तर आपणास महाराज यांच्या गडांवर संपूर्ण हिंदुस्थानची देखील चलनवाढ करत येईल, असे स्वप्न बघून कृती केली पाहिजे. महाराज यांच्या आधी आणि नंतर देखील बरेच राजे झाले; मात्र जे प्रेम आणि जनमानसांची राज मान्यता छत्रपती शिवाजी महाराज यांना मिळाली त्यास अनेक कारणं कारणीभूत आहेत. प्रथमतः महाराज यांनी आपल्या मातोश्री जिजाऊ यांच्या मनातील अष्टप्रधानमंडळ नेमून त्यात पंतप्रधान, हे पद निर्माण करून स्वराज्याचे पहिले पंतप्रधानपदासाठी मोरोपंत पिंगळे यांना नेमून, एक नितांत सुंदर संदेश जगास दिला.तो म्हणजे शिवराय जरी ६ जून दिवशी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इतिहासाने नोंद घ्ोतली आहे तरी त्यांचं दिवशी ते जगाला पहिला पंतप्रधान देणारे एकमेव राजे ठरले, हे आपणास अधोरेखित करावेच लागेल, कारण महाराज यांचा कामाचा वसा, ठसा हा नसानसात स्फुलिंग निर्माण करणारा आहे.
महाराज हे छत्रपती झाल्यानंतर, जो त्या कामी राज्याभिषेकासाठी ५० लाख रुपये खर्च झाला होता, तो त्यांनी पुढील काही महिन्यातच पेडगावच्या मोहिमेत दामदुपट्टीने वसूल करून, लाखात कमाई करून, स्वतःच्या राज्याभिषेकसाठी झालेला जनतेच्या पैशांचा खर्च महाराज हिशेब बंद करतात, त्याच वेळा कळलं की, महाराज हे अर्थ साक्षरतेचे गोड उदाहरण आहेत. अर्थात त्यांनी, राज्याभिषेक झाल्या झाल्या तांबे हया धातूपासून, शिवराई आणि सोन्याचे, होन हे चलन विनिमय जनतेस उपलब्ध करून दिले. जेव्हां राजे दक्षिण दिग्विजयसाठी निघालेत तेव्हा ज्या सत्य बाबींचा आपणास गर्व असणे गरजेचे आहे, ते म्हणजे महाराज हे ब्रिटन, फ्रेंच,आणि डच व्यापारी यांच्यासोबत अनेक करार करत होते. यातील एक महत्वाचा करार डच व्यापारी आणि महाराज यांच्यात २४ ऑगस्ट १६७४ एक करार कौलनामा झाला. आभार व्यक्त करण्यास त्यांच्या वतीने हर्बर्ट डी जागेर याने महाराज यांची भेट घ्ोतली, त्याने ती भेट सविस्तर लिहून ठेवली आहे. त्यात शिवराय त्यास तंबी देतात, ते म्हणतात, मुसलमानांच्या राज्यात तुम्हास स्त्री पुरुष गुलाम खरेदी विक्री मुभा होती, यापुढे ती मात्र नसेल, तसे दिसल्यास प्रतिबंध केला जाईल. हे महाराज जूनमध्ये राजा झाल्याझाल्या ऑगस्टमध्ये अवघ्या तीन महिन्यात, आपला संदेश ते सांगून स्वतःचा वचक निर्माण करतात. गुलामांचा व्यापार बंद करण्यास उत्सुक असल्याचे नमूद करतात.
रोटीबेटी बंदी, समुद्र बंदी, जिझिया कर, शेंडी आणि लग्न कर सारख्या प्रथा महाराज यांनी बंद करून, राजव्यवहार कोश निर्माण करून भाषा शुध्द करत असता, काल गणनेसाठी शक ही प्रणाली सुरू करून, गनिमी कावा हे स्वतंत्र तंत्र एक मंत्र म्हणून राजमुद्रित केले. एकूणच महाराज हे राजा झाले तरी लोकाभिमुख राष्ट्र निर्माण करणारे लोकांचे राजे ठरले, ही खूप गर्व आणि अभिमानाची बाब आहे. शिवराय यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन निर्माण करून आपल्या सिंहासनाची किंमत करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, याची देखील दखल घ्ोतली. एका मणामध्ये ४० किलो धरले तरी १२८० किलो होतात. एका किलोमध्ये १००० ग्रॅम, आज सोन्याचा भाव सरासरी ५ हजार रुपये पकडला तरी एका किलोस ५० लाख मोजावे लागतील, त्यावरून महाराज यांच्या सिंहासनाची किंमत किती श्रीमंत होती, हे देखील समजते.
एकूणच, शिवराय यांचा आज छत्रपती होण्याचा जो महोत्सव साजरा करण्यात येतो आहे, तो उत्सव म्हणून एक दिवसाचा न राहता, कायम रोजचाच व्हावा, त्यात कृती असावी, डोळस भक्ती आणि प्रेम असावं. असे होऊ नये की जसे आपण शिर्डीस जे साईबाबांना आवडणार नाही तेच करतो आणि त्यांचा विचार बाजूला सारून सोन्याची चादर अर्पण करून, दडपण साईबाबांवर आणून त्यांच्या विचारांना तिलांजली देतो, तसेच जर महाराज आज पुन्हा महाराष्ट्रात जन्मास आलेत तर त्यांना आपला उबग येऊन कर्नाटकमध्ये जावे असे वाटू नये, इतकी तरी काळजी घ्यावी, कारण महाराज आपले काळीज आहेत.
सर्वांना महाराज यांच्या स्वराज्यभिषेक निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन!
प्रा.रविंद्र ऊ पाटील, रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपरखैरणे.