पाणी वाचवा..भविष्यासाठी नियोजन करा.!

पाणी वाचवा..भविष्यासाठी नियोजन करा.!

असं म्हणतात की, भविष्यात जर दुर्दैवाने तिसरे महायुध्द पेटले तर ते पाण्यावरून होईल. हा जरी काहीसा अतिशयोक्तीचा भाग गृहीत धरला तर पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. ही वास्तविकतासुध्दा नाकारून चालणार नाही. निसर्गाने आपल्याला जमीन, हवा, पाणी या गोष्टी फुकट दिल्या आहेत. त्याचा उपयोग आणि नियोजन करणे हे आपल्या हातात असताना आपण बेफीकीरेने वागत आहोत. रेन हार्वेस्टिगच्या माध्यमातून आपण जरी काही पाण्याचे नियोजन करीत असलो तरी ते पुरेसे नाही.

 हे सारे आपण अनुभवत असताना आपण त्याकडे म्हणावे तितके गांभीर्याने बघत नाही, अथवा विचार, आचार अंमलात आणत नाही, हेही तितकेच खरे आहे. अलीकडे हवामानात सातत्याने होणारे बदल आणि त्याचा ऋतुंवर होणारा परिणाम लक्षात आता ऋतूचक्र सुध्दा बदलतचालली असून पूर्वीसारखा समाधानाकारक पाऊसपडत नाही आणि पडला तरी अवेळी पडतो. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर त्याचा परिणाम होतो हे आपण अनुभवत आहोत.

आज मुंबईसह उपनगरातून खास करून ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहारातून अनेक मोठ मोठे गृहप्रकल्प, टोलेजंग इमारती साकारत असताना त्यांना जीवनावश्यक मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनव संबंधित महापालिका, एमआयडीसी सारख्या संस्था व विकासक/बिल्डर्स सक्षम आहेत कां ? असल्या तर ते रस्ता, पाणी, वीज यासारख्या सेवासुविधा चोवीस तास देऊ शकतील काय ? याचासुध्दा विचार विनिमय आणि योग्य ते परीक्षण करूनच मगच परवानगी देणे उपयुक्त ठरेल. आज लोक लाखो/करोडो रुपये खर्चून जर त्यांना पुरेसेपाणी मिळणार नसेल तर काय उपयोग ? बाकी सुविधांसाठी निदान काहीसा पर्याय तरी आहे. पण पाणी ही जीवनावश्यक गरज आहे आणि त्याची योग्य आणि समाधानकारक पूर्तता होण्यासाठी सर्वांनीच नियोजन करून जलसाक्षर होण्याची गरज आहे.

सर्व साधारण एप्रिल/मे मध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा तुटवडा भासत असतो हे आजवर आपण अनुभवत आलो असताना सुध्दा आपण नियोजन करण्यात कमी पडत आहोत हेही तितकेच खरे.चोवीस तास पाणी ही जरीगरज असली तरी त्यातून वाया जाणारे पाणी याची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर आहे. काही ठिकाणी पाणी रिसायकल करून आपण वापरू शकत असलो तरी पाण्याची काटकसर करून पाणी वापरले गेले तर त्याचा आपण निर्श्वितच साठा करू शकतो. रेन हार्वेस्टिंग मधून साठलेले पाणी, तसेच साधारण दोन/तीन महिने म्हणजेच जाने ते मार्च या काळात चोवीस तासा ऐवजी जरतीन/तीन तास सकाळ/संध्याकाळ पाणी वापरले तर पाण्याचा साठा होऊन, मे महिन्यात पाणी आणीबाणी नक्कीच उद्भवणार नाही. म्हणूनच पाणीवाचवून योग्य पद्धतीने नियोजन करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जलसाक्षर होऊन त्यामधून जर व्यापक जनजागृती झाली तर पाण्याचा तुटवडा नक्कीच भासणार नाही. -पुरुषोत्तम कृ आठलेकर, डोंबिवली. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 इतिहास दर्शन -  रंजक की बोधक?