मुशाफिरी : आल्यासारख्याला दोन दिवस राहुनच जा

आल्यासारख्याला दोन दिवस राहुनच जा

सध्या अवतीभवती.. किमान शहरी भागात तरी वातावरणच असे आहे की शक्यतो कुणी कुणाकडे मुक्कामाला फारसे जात नाही. आपण कुणाकडे गेलोच नाही..म्हणजे कुणी आपल्याकडे येणार नाही अशा पध्दतीने काही लोक वागतात. सख्खे बहीण-भाऊ, काका-मामा, आत्या, मावश्या या नात्यांमध्ये पूर्वीसारखे सख्य राहिले आहे असे खात्रीलायकरित्या म्हणणे कठीण आहे. प्रत्येकाने आपापले व्याप वाढवून ठेवले आहेत. कुणी कुणाकडे गेले तर तोंडदेखले स्वागत होईल, जेवणाखाण्याचा आग्रहही होईल. पण ‘आल्यासारख्याला दोन दिवस राहुनच जा' असा तोंडभरुन आग्रह करण्याचे दिवस जणू इतिहासजमा झाले आहेत.

   आज पंचावन्न ते पासष्ट व त्याहुन अधिक वये असलेल्यांच्या पिढीतील लोकांच्या आयुष्याचा मोठा कालखंड हा सोशल मिडिया नामक आकर्षणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळातील आहे. ‘रॅट रेस, करिअर, विदेशात मुले पाठवणे, त्यांना डॉलर, पौंड, येन, रुबल कमावण्यासाठीच आपण जन्माला घातले आहे असा समज करुन घेत तशाच प्रकारे वागवणे, मी-माझा टीव्ही-माझे कुटुंब-माझ्या खिडकीतून दिसतो तेवढाच भारत' असले समज रुढ होण्याआधीचा तो सारा काळ! काका, मामा, मावश्या, आत्या आणि या साऱ्यांची मुले असे सगळे मिळून आपण एकच आहोत असे संस्कार मनावर असण्याचा तो कालखंड. नात्यांची विण घट्ट व नात्यापुढे पैसा, भौतिकवाद, चंगळवाद, स्वार्थ, करिअर वगैरे सारे दुय्यम मानले जाण्याचे ते साऱ्यांचे आयुष्य...

   ‘आजचा काळ व त्या वेळचा काळ' अशी तुलना वगैरे करण्याचा येथे अजिबात विचार नाही. पण एकूणच ‘त्या' काळी व्यवधाने कमी होती, गरजा आटोपशीर होत्या, चटकन श्रीमंत होण्याची कुणाला घाई नसे. त्यामुळे कुटुंब, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्यातील स्नेहसंबंध अधिक घट्ट असल्याचे कुणीही सांगेल. मला आठवते...मी सहावी-सातवीत असेन तेंव्हा आम्ही कल्याणला  राहात असताना आईने मला माझ्या बदलापूरच्या आत्याकडे काही कामानिमित्त एकट्यालाच पाठवले. मी तिकडे गेल्यावर आत्याने माझे नेहमीप्रमाणे आगतस्वागत केले, दुपारचे जेवण झाल्यावर मी परतण्यासाठी चुळबुळ करु लागलो. तर आत्या ओरडली..‘असा कसा जाशील लगेच? आता आलाच आहेस तर दोन दिवस राहुनच आरामात जा.'

   इकडे घरी मी तसे काहीच सांगितले नव्हते. तेंव्हा आमच्यापैकी कुणाकडेच टेलिफोनही नव्हते. मी एकुलता एक मुलगा असल्याने आई मला क्वचितच एकट्याला असे कुठल्या प्रवासाला पाठवीत असे. आत्याचा आग्रह मोडवेना, तिच्या मुलांबरोबर मला भरपूर खेळायचेही होते. मी राहिलो. पण दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी माझे वडील आत्याच्या घरी पोहचले. आणि मला लगेच निघण्यासाठी बजावू लागले. आत्या त्यांची समज घालत राहिली..की आता तो इथे आहे हे समजले ना..मी पाठवीन त्याला दोन दिवसांनी. पण वडीलांनी तिचे काहीच ऐकले नाही. त्यांनी मला घरी आणलेच. आता माझा एकुलता एक मुलगा न आम्हाला न सांगता कुठे गेलेला असला व काही न कळवल्यास त्याला परतायला उशिर लागला की मग मला माझ्या वडीलांच्या त्यावेळच्या कृतीमागील तगमगीचा अर्थ समजतो. माझ्या आयुष्यातील शालेय-महाविद्यालयीन  सुट्टयांचा  फार मोठा कालखंड हा माझ्या आत्यांकडील मुक्कामातच व्यतीत झाला आहे.  बदलापूरला राहणारी  सिताआत्या व त्या काळी म्हणजे १९७० ते १९७५ दरम्यान कल्याण येथील टाटा कॅम्प येथे राहणारी अनुआत्या यांची घरे म्हणजे माझे  सुट्टयांसाठीचे गंतव्यस्थान असे. मी तिकडे गेलो आणि जेवून खाऊन लगेच निघालो असे कधीही झाले नाही. आत्यांचा, त्यांच्या यजमानांचा, आतेभावंडांचा आग्रहच असा जबरदस्त असे विचारता सोय नाही.

   तेंव्हाही आम्ही मुले शिकत होतो, छंद जोपासत होतो, चांगले गुण मिळवून पास होत होतो, एकमेकांच्या आनंदात मनापासून सहभागी होत होतो. आमचे पालक मात्र त्यावेळी आम्हाला ‘पैशांच्या मागे धाव, गडगंज संपत्ती कमव, तुला त्या अमवयातमवयाला मागे टाकून पुढे जायचेय, तुझ्या प्रत्येक मिनिटाला आर्थिक मोल आहे म्हणून याच्या त्याच्याशी दोस्ती करुन, नातेवाईकांकडे मुवकाम करुन बहुमूल्य वेळ वाया घालवू नकोस' वगैरे प्रकारचे काहीही सांगत नसत. सारे वातावरण मोकळे ढाकळे, प्रेमाचे, सौहार्दाचे असे. अचानक सहकुटुंब कुणी आले तरी घरच्या महिलेच्या कपाळावर आठी उमटत नसे. जेवणाच्या वेळीही कुणी टपकले तर नाराजी दाखवली जात नसे. माझा एक मित्र भालचंद्र दत्तात्रय आचार्य हा १९८३-८४ पासून आमच्या घरी येत आहे. अनेकदा त्याने आमच्या घरी मुक्कामही केला आहे. त्याकाळी माझ्या आईच्या व नंतर माझ्या पत्नीच्या व आता माझ्या सूनेच्या अशा तीन पिढ्यांच्या गृहीणींच्या हातच्या भोजनाचा त्याने आस्वाद घेतला आहे. त्याचे आई-वडिल, एक भाऊ या दरम्यान हे जग सोडून गेले. फार मोठा मित्रपरिवारही त्याचा नाही. तो आजही आमच्याकडे हक्काने येतो आणि मुक्कामास थांबतो. सध्या अवतीभवती वातावरण असे आहे की शक्यतो कुणी कुणाकडे फारसे जात नाही. आपण कुणाकडे गेलो नाही..म्हणजे कुणी आपल्याकडे येणार नाही अशी नवी ‘संरक्षित' भूमिका घेऊन वावरणारे लोक अधिककरुन पाहायला मिळतात. सख्खे बहीण-भाऊ, काका-मामा, आत्या, मावश्या या नात्यांमध्ये पूर्वीसारखे सख्य राहिले आहे असे खात्रीलायकरित्या म्हणणे कठीण आहे. अनेक ठिकाणी तर या नात्यांमध्येच एक अप्रत्यक्ष ईर्षा, स्पर्धा, एकमेकांना पाण्यात पाहण्याची मानसिकता असावी की काय, असे वाटावे इतके वातावरण बिघडले आहे. त्यामुळे कुणा नातेवाईकाकडे गेल्यास तोंडदेखले स्वागत होईल, जेवणाखाण्याचा आग्रहही होईल. पण ‘आल्यासारख्याला दोन दिवस राहुनच जा' असा तोंडभरुन आग्रह करण्याचे,  हट्ट धरण्याचे दिवस आता जणू इतिहासजमा झाले आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी असे अजिबातच नव्हते हे मी खात्रीलायकपणे सांगू शकतो. मी लहानपणी पाहिले आहे की माझ्या शेजारी त्यांचे कुणी दूर राहणारे काका, मामा आले की त्यांना मुक्कामाला ठेवल्याशिवाय यजमान कुटुंब शांत राहात नसे. तरीही पाहुण्याने जायची घाई केली तर त्याच्या सामानाच्या बॅगा लपवून ठेवल्या जात. कधी कधी तर त्याच्या अंगावरचे कपडे पाण्याने भिजवून त्याला बाहेर पडण्याची अडचण निर्माण करुन ठेवली जात असे. या साऱ्यामागचा हेतू हाच की, त्या पाहुण्याने मुवकामाला राहावे, त्याचे आदरातिथ्य करण्याचा मान यजमान कुटुंबाला द्यावा... आणि हे आदरातिथ्य म्हणजे काही पंचपक्वानाचे जेवण, मोठ्या हॉटेलात पार्टी, अम्युुझमेंट पार्क, फार्म हाऊस किंवा महागड्या पर्यटनस्थळी भेट वगैरे असले काहीही नसे बरे! घरातच थांबून नेहमीच्याच गोड धोडाचा, तिखट जेवणाचा आस्वाद यजमानासोबत घ्यावा एवढीच अपेक्षा असे.

   त्या काळी चाळी, वाडे, गावची घरे, मोठी आवारे आणि खूप महत्वाचे म्हणजे खूप मोठी मने असणारे लोक होते. स्वतःची घरे छोटी असली तरी पाहुण्यांना आजुबाजूच्या घरात मुवकामासाठी धाडण्यात कुणालाही कसलाही कमीपणा वाटत नसे. मुंबईच्या दाटीवाटीच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांतूनही  मुवकामास गेलेल्या पाहुण्यालाही मग इतर डझनभर लोकांप्रमाणेच गच्चीवर झोपण्यात काहीही वाटत नसे. कधीकधी रात्री दारातच पथारी मारली जात असे. गावाकडे तर दारात, अंगणातल्या खाटेवर झोपण्यातली मौज काही वेगळीच! आजोळ, मामाचा गाव ही संकल्पना आज-कालची नव्हे; पण अनेकांच्या आजी-आजोबा, मामांबरोबरच ही संकल्पनाही आता काही सन्माननीय अपवाद वगळता जवळपास स्वर्गवासी झाली की काय, अशी भिती वाटते. ‘आल्यासारख्याला आता दोन चार दिवस राहुनच जा' असा आग्रह तेथील पुढची पिढी धरेल याची कसलीच शाश्वती राहिलेली नाही. अलिकडे अनेक घरांतून ‘करिअरीस्ट' लोकांचा वावर वाढला आहे. तुम्ही आलात काय, गेलात काय.. याचे त्या घरातील मुलांना फारसे पडलेले नसते. शिवाय ट्युशन, क्लास, छंद वर्ग, प्रॅवटीस, रियाझ, रिहर्सल, वेळी अवेळी होत राहिलेल्या विविध नीट-सेट आदि परिक्षा असले बहाणे सोबतीला असतातच. आपला काका, मामा, मावशी, आत्या, भावंडे यापैकी कुणी पाहुणे येऊन  दोन चार तास थांबून परत गेलेही..तरीही घरातील या मुलांच्या खोल्यांची दारे बंद असतात. अनेकदा पाहुण्यांची चाहुल ऐकून ही मुले आपल्या खोलीत अभ्यासाचे/कामाचे निमित्त करुन बसतात; तर कधीकधी खाणा-खुणा करुन आपल्या आईवडीलांना विचारतात..‘हा काका (किंवा मामा, मावशी, आत्या असे अन्य कुणीही!) लगेच जाईल... की मुक्कामाला राहील म्हणून....' अशीही माझी माहिती आहे.

   ‘आल्यासारख्याला दोन घास खाऊन जा, दोन-चार दिवस राहुनच जा...' या आग्रहाला पहिली चाट दिली ती गावोगावी, शहरोशहरी वाढलेल्या क्षुधा शांती गृहे, भोजनालये, उपहार गृहे अर्थात हॉटेलांनी! दूरवरच्या, अनोळखी गावी उतरण्यासाठी सर्वात उपयोगी पडे ते आपल्या नातेवाईकाचे घरच! हॉटेलांनी ती उणीव भरुन काढली.  एकेकाळची गरीबी असलेल्या घरातील मुले-मुलीही काळाच्या ओघात  शिकली, चांगली कमावती झाली, प्रसंगी शिक्षण-नोकरीनिमित्त परगावी, परप्रांतांत जाऊन राहू लागली. विमानप्रवासही स्व-बळावर करु लागली. एकेकाळच्या त्या गरीब, उपेक्षित परिवारातल्या नव्या पिढीनेही पैसा पाहिला आणि काही नातेवाईकांचे तुटक, तुच्छतादर्शक वर्तनही लक्षात ठेवले. त्यामुळे माया न लावणाऱ्यांच्या घरी जाणे, मुवकाम करणे त्यांना शवयतो आवडले नाही. कुणाकडे जाणे किंवा कुणी आपल्याकडे येणे न आवडलेल्या लोकांच्या हे पथ्यावर पडले.

   ...पण या साऱ्यात नात्यांची विण उसवली, माया-ममता-आदर-जिव्हाळा-स्नेह या गोष्टी जणू पातळ झाल्या, दुरावल्या. हा सारा ‘काळाचा महिमा' समजायचा की आपली माणसेच काहींंना नकोशी झालीत? 

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पाणी वाचवा..भविष्यासाठी नियोजन करा.!