आचार आणि संहिता

आपल्या जन्मदात्यांना वृध्दावस्थेत स्वतःचे स्वतः काही करणे अवघड होत जाईल त्या काळात त्यांच्या मुलांनी त्यांची यथोचित काळजी घ्यावी, त्यांच्या आजारपणात जपावे, त्यांचा ‘शेवटचा दिस' गोड व्हावा याची सर्वतोपरि दक्षता घ्यावी अशी आपल्या महान प्राचीन संस्कृतीची शिकवण म्हणजेच आपली पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली कौटुंबिक आचारसंहिता आहे. गेल्या पिढीपर्यंत हे सारे त्याबरहुकुम घडत होते. पण मध्येच ‘जेनेटिकल' बदल घडून यावा आणि आंब्याच्या झाडाला धोत्र्याची फुले लागावीत तसे काहीसे झाले आहे काय?

मानव समाज जसजसा विकसित, प्रगत, सुधारीत होत गेला तसतसे त्याने आदर्श वर्तनाबद्दल आपापले काही नियम बनवले; मानके, दंडके,  प्रमाणके,  निती, नैतिकता, धार्मिक वर्तणूक आदिंबाबत अलिखित स्वरुपाची नियमावली तयार केली. ती म्हणजेच ‘आचारसंहिता'  होय. दोन अधिक दोन बरोबर चार अशी आचारसंहिता काही ताठर, कायमची, शाश्वतच असते असे नाही.  टप्प्याटप्प्याने तिच्यात कालानुरुप बदल होत राहिले. ती नेहमीच लवचिक, बदलती, सर्वसमावेशक राहिली.

या आचारसंहितेत तत्व आणि प्रत्यक्ष वर्तन या दोहोंचा म्हणजेच थेअरी आणि प्रॅक्टीकल्स यांचा समावेश होतो. ही झाली एकूणच तत्व व वर्तन (आचरण) याबद्दलची आचारसंहिता. पण आपल्या देशात सारे काही राजकारणाने ग्रासलेले आहे. अगदी एकाच आईची लेकरे असणाऱ्या सख्ख्या बहीण-भावांत, भावा-भावांत, बाप-लेकांत, बाप-लेकींत, सोयऱ्या-सोयऱ्यांत, चुलत-आते-मावस-मामे भावंडांत, एकाच कारखान्यात, कार्यालयात, आस्थापनांत काम करणाऱ्यांत कसे (पक्षीय) भेदाभेदीचे राजकारणही चालते व त्या खेरीज एकमेकांना, एकमेकांच्या परिवारांनाही पाण्यात पाहण्याचेही (नीचस्तरीय गैर) वर्तन घडून येत  असते तेही आपण पाहात असतोच! या राजकारण्यांना वळण लावण्यासाठी व सत्ताधीशांनी निवडणूक काळात शासकीय यंत्रणेचा गैरवापर करुन मतदारांना प्रभावित करु नये म्हणून आदर्श निवडणूक आचारसंहिता - अर्थात कोड ऑफ कंडक्ट अंमलात आणली जाते. ती आधीपासूनच अस्तित्वात आहे. पण तिचा योग्य तो वापर सुरु झाला तो तत्कालिन केंद्रीय कॅबिनेट सचिव व त्यानंतर मुख्य केंद्रीय निवडणुक आयु्‌क्त  म्हणून १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ दरम्यान पदभार सांभाळलेल्या तिरुनेलै नारायण अय्यर शेषन यांच्याकडून! हा माणूस अनेकदा या आचारसंहितेच्या अंमलासाठी थेट तत्कालिन केंद्रीय मंत्र्यांनाही भिडला. एवढे असूनही आजही कुठे निवडणुक असली की साड्या, पैसे, कपडे, धान्य, भेटवस्तू यांचे मनमुराद छुपे किंवा खुलेही वाटप होते; निवडुकांआधी नियोजित मतदारांना घाऊक तीर्थयात्रांच्या माध्यमातून देवदर्शन घडवले जात असते. मग विचार करा...शेषन यांच्या पूर्वीच्या काळात काय काय होत असेल?

राजकारणाचे आपण बाजूला ठेवू या. कारण तो न संपणारा विषय आहे. पण प्रत्यक्ष जीवनातही या आचारसंहितेचे महत्व अनन्यसाधारण आहे. बघाना..तुमचा आमचा जन्म झाल्यानंतर आपण कमावते होईपर्यंतच्या काळात आपले माता-पिता आपला सांभाळ, देखभाल, शिक्षण, पालनपोषण करतात.. त्यांनी ते करावे आणि आपले जन्मदाते जेंव्हा सेवानिवृत्त होतील, वयोवृध्द होतील, वयोमानानुसार त्यांना काही आजार जडतील, त्यांना स्वतःचे स्वतः काही करणे अवघड होत त्यावेळी मुले-सूना-मुलगी यांनी त्यांना जपावे अशी आपली पारंपारिक आचारसंहिता आहे. पण पाश्चिमात्य देशांकडुन जे चांगले घ्यायचे ते घेता घेता त्यांचे अतिरेकी व्यक्तीस्वातंत्र्य, अतिरेकी खासगीपणा यांची भुरळ आपल्याकडील अनेकांना पडली. आईबापांच्याच मदतीवर काहींनी उच्च शिक्षणाच्या नावाखाली परदेश गाठले. मग तिकडचे ‘पॅकेजप्रिय कल्चर' त्यांनी अंगिकारले. लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, चंगळवाद, भौतिक सुखाला चटावण्याची सवय लागली आणि त्यांनी आपल्या भारतीय आईबापाला अलगद बाजूला सारले. त्यांच्या शिक्षण आणि परदेशवारीसाठी बापाने कर्ज काढले आणि मुलगा तिकडून कळवतोय...‘तुम्हाला दरमहा पाहिजे तेवढे पैसे पाठवीन, पण मी आता पुन्हा भारतात परत येणार नाही, मी माझी जीवनसाथीही परदेशातच शोधली आहे. आपण आशीर्वाद द्यावेत.'

माझ्या नात्यातील काही कुटुंबांत असे घडले आहे, इतरत्रही असे घडत असल्याचे मी पाहतोय. काही मुलग्यांप्रमाणेच  बापासाठी  ‘काळजाचा तुकडा' असलेल्या काही मुलीही याहुन वेगळ्या वागत नाहीत. परदेशात जाऊन त्याही तिकडच्याच होऊ पाहतात. भारतात, महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्याच्या बदलापूरसारख्या भागात वाढत असलेले वृध्दाश्रम आणि तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात जरा डोकावून पाहा. मी काय सांगतोय..त्याचा अर्थ ध्यानात येईल.

हा झाला एक भाग. लग्न हा एक ‘संस्कार' असल्याचे आपली महान संस्कृती सांगते. या लग्नविधीपूर्वी, लग्नविधीत व नंतर फोटोग्राफरला हवे तसे फोटो काढले नाहीत तर जणू जगबुडीच होईल किंवा आपला धर्मच बुडेल असे मानून बाकी साऱ्यांना बाजूला सारत पहिले फोटो काढलेच पाहिजेत असे एक नवे कलम आचारसंहितेत घुसले आहे की काय अशी मला साधार भिती वाटते. आठवण, हौस, आनंद, सुखद स्मृति वगैरे काहीही म्हटले तरी या फोटो पोझच्या हव्यासापोटी ज्यांना आपण निमंत्रण पत्रिका देऊन सन्मानपूर्वक बोलावले आहे, त्यांना उगाचच ताटकळत ठेवतो आहोत, ही अपराध भावना  काही यजमान मंडळींना असू नये, हे मोठे खेदाचे! बरे, एवढा आटापिटा करुन प्रि मॅरेज, मॅरेज, पोस्ट मॅरेज, डेस्टिनेशन मॅरेजगिरी करत पोझ देऊन लग्न करत काढलेले फोटो असतील..तर ते लग्न तरी दीर्घकाळ टिकावे? बघा जरा अवतीभवतीच्या भपकेबाज लग्नांच्या ‘टिकण्याच्या कालावधीचा' अदमास घेऊन!

अनेक विवाहेच्छु मुलग्यांना बायको कशी हवी? तर गोरी पान, नुसते तांदळाचे पीठ जणू!  सोबत गाडीवर बसवायला व मिरवत फिरवायला. मग ती अनाडी, अर्धशिक्षित, रोगीट, अशुध्द बोलणारी, गावंढळ असली तरी चालेल अशी काहींनी वैवाहिक आचारसंहिता बनवून घेतली आहे. हल्ली जिकडेतिकडे सेल्फ कंटेंड, स्वयंपूर्ण, सॉफिस्टिकेटेड गृहसंकुलांचे पेव फुटले आहे. गावठाणातली गचडीपचडीतली, सुर्यकिरणेही अंगावर न पडणारी, काेंदट हवामानातली घरे अनेक मुलींना आवडत नाहीत. अशा मुलींसाठी घरातही मग फारसे काम उरत नाही. या प्रकारच्या कचकड्याच्या बाहुल्या अनेक घरांतून सुना म्हणून येतात आणि त्यांना सासू-सासरे हे ‘डस्टबिन' वाटतात. अनेकींनी आपल्या नवऱ्याला बैलोबा बनवून ठेवलेले असते मग त्यालाही आपल्या जन्मदात्यांची अडचण होऊ लागते व तो बायकोपुढे गुबुगुबु मान डोलावीत तिचेच पुढचे सारे ऐकत जातो. तर काही ठिकाणी लग्नात काढलेल्या रोमॅण्टीक फोटोपोझ पेक्षा वेगळेच घडते. व्यसनी नवरा असेल तर तो तिला हवे तसे बडवीत राहतो. तिला माहेराहुन पैसे आणण्यासाठी छळतो. काही मुली मग स्वतंत्र निर्णय घेऊन असे नवरे सोडतात आणि वेगळे राहण्याचा निर्णय घेतात. तोवर या जोडप्याला मुले झाली असतील तर मात्र प्रश्न अधिकच गंभीर बनतो.  काही मुलग्यांची लग्नाआधीची ‘प्रकरणे' लग्नानंतरही सुरुच राहतात, हे लक्षात आल्याने मग त्यांच्या धर्मपत्नीवर घटस्फोटापर्यंत जाण्याची वेळ येते... आणि निमंत्रितांना ताटकळत ठेऊन लग्नप्रसंगी काढलेले वेगवेगळ्या पोझमधील फोटो जणू या दोन्ही कुटुंबांना वाकुल्या दाखवतात. विवाहाबद्दलची आचारसंहिता आता फारच विचित्र आणि लवचिक स्थितीत पोहचली आहे हे नवकी!

‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' या म्हणीचा अर्थ असा आहे की मागच्या पिढीपेक्षा नव्या पिढीने आणखी पराक्रमी व्हावे, अनेकांपर्यंत घराण्याचे नाव सकारात्मक अर्थाने जावे असे वर्तन पुत्राचे असावे. हा झाला आदर्श विचार. पण प्रत्यक्षातली याबाबतची आचारसंहिता आणि अनेकांचे प्रत्यक्ष वर्तन आता फारच वेगळ्या वळणावर येऊन पोहचले आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता बापजाद्यांनी मेहनतीने, कष्टाने, प्रसंगी उपासमार सोसून, अर्धपोटी राहून, काडी काडी जमवून उभे केलेले वैभव हे नादान, दिडदमडी, अजिबातच पात्रता नसलेल्या व वाईट संगतीने वाया गेलेल्या ऐतखाऊ,  चंगळवादी मुलांच्या हाती लागल्याने त्याचा कसा ऱ्हास होत जातो हे अवतीभवती पाहायला मिळत आहे. वृथा अहंकार, नसती घमेंडखोरी दाखवणारी, कुसंस्कारी-व्यसनी-अनाचारी-दुराचारी लोकांत वावरल्याने गृहसौख्यातही विष कालवणारी दिवटी मुले दिसून येत आहेत. नवी मुंबईतील ज्येष्ठ साहित्यिक श्री. साहेबराव ठाणगे त्यांच्या एका कवितेत म्हणतात, त्याप्रमाणे...

उपाशीच बाप

अर्धपोटी मेला

तालुका जेवला

तेराव्याचे

अशी दारुण परिस्थिती ओढवली आहे. अर्धपोटी बाप मेला..तो सुटला तरी..पण त्याच्या पश्चात जर त्याची पत्नी..या दिवट्यांची आई हयात असेल तर तिच्यावर काय प्रसंग येत असतील? या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो.

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : आल्यासारख्याला दोन दिवस राहुनच जा