स्वाधार योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडे ६० कोटींचा निधी उपलब्ध  

 स्वाधार योजनेमध्ये अधिक सुलभता येणार - आयुक्त डॉ. नारनवरे

नवी मुंबई ः समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने आणि आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाला ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या प्राप्त झालेला ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाने मार्गी लावला आहे.  

राज्यात समाजकल्याण विभागामार्फत ४४१ शासकीय वसतिगृह कार्यरत असून त्यामध्ये ५० हजार विद्यार्थींची शिक्षणाची सोय झाली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. राज्यात विभागीय, जिल्हा आणि तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना ४८ हजार ते ६० हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. यापूर्वी शासनाने सदर योजनेसाठी १५ कोटीं रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. तसेच १२ मे रोजी रुपये ६० कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयक्तालयाला उपलब्ध झाला आहे.  

समाजकल्याण विभागाने सामाजिक न्याय पर्व तसेच योजनांची जत्रा या शासनाच्या विशेष अभियान अंतर्गत राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त आणि सबंधित जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी स्वाधार योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणावर तपासून मंजूर केले आहेत. आता विभागाला ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे मंजूर झालेले अर्ज निकाली निघणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाने दिलासा दिला आहे.  

स्वाधार योजनेच्या अटी-नियम यामध्ये बदल होऊन त्यात सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करुन त्यात सुधारणा करायच्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे राज्यातील विविध विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांच्या समवेत चर्चा आणि बैठक करुन याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने १ ते १३ मुद्यांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी आयुक्त कार्यालयाने नुकत्याच शासनास सादर केलेल्या आहे. स्वाधार योजनेच्या अटी-शर्ती आणि त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुलभता निर्माण होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पध्दतीने आणि वेळेत देणे सोयीचे होणार आहे.  

समाजकल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण आणि यशस्वी योजना आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन घेण्यात आला आहे. तसेच योजनेमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता आणि पारदर्शकता निर्माण होणार आहे. -डॉ. प्रशांत नारनवरे, आयुवत-समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका शिक्षण विभागातर्फे यादी जाहीर