बारावीमध्ये १७९ विद्यार्थी, दहावीमध्ये २५२ विद्यार्थी उत्तीर्ण

 सीबीएसई बारावी, दहावी परीक्षेचा ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'चा निकाल १०० टक्के

पनवेल ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल १२ मे रोजी जाहीर केला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'च्या खारघर सेवटर-१९ मधील ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'ने यंदाही धवल यश प्राप्त केले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही इयत्तांमध्ये ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'चा निकाल १०० टक्के लागला आहे. याबद्दल ‘संस्था'चे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्राचार्य, शिक्षकवृंदाचे अभिनंदन आणि कौतुक केले.

इयत्ता बारावी मध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मधील सर्वच्या सर्व म्हणजे १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे १३९ आणि वाणिज्य शाखेच्या ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल' मधून भाग्यश्री शरद सुरासे (९७.२० %) प्रथम, आदिनाथ आपटे (९५.८० %) द्वितीय आणि पृथ्वी प्रवीण पाटील (९५.६० %) तृतीय आला. विशेष म्हणजे भाग्यश्री सुरासे हिने कोणताही क्लास न लावता परीक्षेत यश मिळविले असून, ती दहावीतही टॉपर होती.

‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल' मधील ३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक, ९१ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक, १२२ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक आणि १७२ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. विद्यालयातील जान्हवी शर्मा हिने मॅथेमॅटिक्स या विषयात, तर पृथ्वी प्रवीण पाटील आणि उन्नती श्रेष्ठ सिंह यांनी फिजिकल एज्युकेशन विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.

इयत्ता दहावी परीक्षातही ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल' मधील सर्वच्या सर्व २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून पार्थ बुटे (९८.४० %) प्रथम, तर्जनी पास्तागिया (९८.२० %) द्वितीय आणि तुषार चिंचणीकर, पार्थ क्षीरसागर (९८ %) संयुक्तपणे तिसरे आले आहेत. विद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस या विषयात, चार विद्यार्थ्यांनी मॅथेमेटिक्स विषयात, तीन विद्यार्थ्यांनी मराठी विषयात, दोन विद्यार्थ्यांनी सोशल सायन्स विषयात तर दोन विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयात १०० गुण मिळविले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘संस्था'चे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, ‘संस्था'चे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य राज अलोनी, अमोघ ठाकूर आदींनी अभिनंदन केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 स्वाधार योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडे ६० कोटींचा निधी उपलब्ध