भारतातील शिल्पधन : महाबलीपुरम मंदिर (भाग-२)

महाबलीपुरम मंदिर (भाग-२)

महाबलीपुरम या शब्दाचा अर्थ होतो,प्रचंड शक्तीचे गाव.महाबलीपुरमचा इतिहास पाहिला तर असे दिसते की,हे शहर प्राचीन काळी खूप मोठे व्यापारी बंदर होते.दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील काही भांडी, वस्तू व नाणी या ठिकाणी सापडली आहेत. पल्लव साम्राज्याच्या (झ्ीत्त्ीन्ी ब्हीेूब्) काळात महाबलीपुरमचा खूप विकास झाला.आता जी मंदिरे, शिल्पकाम पाहायला मिळते आहे, ते सर्व पल्लव साम्राज्याच्या काळात झाले आहे. इथल्या प्रचंड मोठ्या खडकांना फोडून आकर्षक शिल्पकाम केलेली मंदिरे, मंडप व वास्तूंची निर्मिती पल्लव साम्राज्याच्या काळात झाली. या सर्व शिल्पांवरून पल्लव साम्राज्याच्या कला,इतिहास या बद्दल असलेल्या ज्ञानाची माहिती मिळते.
महाबलीपुरम मधील सर्वात प्रमुख स्थळांपैकी एक असलेला मंडप दोन विशाल दगडांवर कोरीव काम करून तयार केला आहे. याची लांबी ३० मीटर तर रुंदी ९ मीटर आहे.विविध प्राण्यांची देवदेवतांची चित्रे या ठिकाणी रेखाटली आहेत.
 

पंच रथ मंदिर
७ व्या शतकात निर्माण केलेले पंच रथ मंदिर दक्षिण भागामध्ये आहे. इथल्या पाच रथांना पांडवांची नावे दिलेली आहेत. पाच रथांपैकी चार रथ एकाच खडकात कोरून तयार केले आहेत.या सर्व रथांपैकी धर्मराजाचा रथ सर्वात उंच व बहुमजली आहे.प्रवेशद्वारा जवळील पहिला रथ द्रौपदीचा असून आकाराने छोटा आहे.
द्रौपदीच्या रथानंतर येतो अर्जुनाचा रथ. अर्जुनाचा रथही आकाराने छोटा असून भगवान शंकराला समर्पित आहे. भीमाच्या मंदिराच्या खांबावर वाघाच्या चित्रांची सजावट केली आहेत, तर नकुल व सहदेवाच्या रथावर हत्तीची चित्रे काढली आहेत. हे सर्व रथ दगड कोरून बनवण्यात आले आहेत. महाबलीपुरमचे पंच रथ जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जातात.
 

त्रिमूर्ती मंदिर
नावाप्रमाणेच तीन देवतांना समर्पित असलेले हे मंदिर संपूर्ण दगडात घडवलेले मंदिर असून  पौराणिक कथांची चित्रे चित्रित करण्यात आली आहे. ब्रम्हा,विष्णू व महेश यांची चित्राकृती या मंदिरात आहेत.या मंदिराचे वैशिष्ठ्य असे आहे की, इतर मंदिरात दगडी खांब आहेत, पण या मंदिराला एकही खांब नाही.
 

वराह मंदिर
एका अखंड पाषाणाला कोरून त्यामध्ये तयार करण्यात आलेले वराह मंदिर शिल्पकलेचा चमत्कार म्हणावा लागेल. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून इतर मंदिरांप्रमाणेच ७ व्या शतकात तयार केले आहे. हा संपूर्ण परिसर ग्रेनाईट दगडाचा असून सर्व शिल्पे या ठिकाणी कोरली आहेत. या मंदिराच्या भिंतीवर भगवान विष्णूचे वराह रूप चित्रित करण्यात आले आहे, वराह रूपातील विविध प्रसंग इथे पाहायला मिळतात.
 

कृष्णा बटरबॉल
दगडाच्या उंचवट्यावर गोल आकाराचा विशाल असा दगड खूपच कमी भाग जमिनीला टेकलेल्या व उताराच्या दिशेला कधीही घरंगळेल अशा अवस्थेत शेकडो वर्षे एकाच जागेवर आहे.या दगडास कृष्णाचा लोण्याचा गोळा अर्थात कृष्णा बटरबॉल म्हणून ओळखले जाते.पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात व फोटो काढतात.
 

महिषासुरमर्दिनी मंदिर
हे अखंड खडकाला कोरून तयार केलेले सुंदर मंदिर आहे. या मंदिराला यमपुरी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हिंदू पौराणिक कथांचे चित्रण या मंदिराच्या भिंतीवर केलेले पाहायला मिळते. एका दृश्यामध्ये भगवान विष्णू सात फण्यांच्या नागराजांवर विराजमान झालेले दिसत असून दुसऱ्या चित्रात माता दुर्गा सिंहावर बसून महिषासुर या दानवाचा वध करताना दिसत आहेत.
मंदिरावरील कोरीव काम हे अतीव कोरीव असे आता राहिलेले नाही. कारण इतक्या शतकानंतर वातावरणाचा परिणाम कलाकृतींवर झालेला आहे. तरीही साधेपणा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ या सर्व मंदिरांमध्ये दिसून येतो. या मंदिराभोवती अनेक भव्य पिवळसर रंगाच्या  शिळा आहेत. या दगडाचे वैशिष्टय म्हणजे कितीही उन्हाचा मारा असला तरी हा दगड विशेष तापत नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डिसेंबर २००५ मध्ये आलेल्या त्सुनामीने शोर टेंपल कॉम्प्लेक्समधील मंदिरांचे काही बुडलेले भाग उघडकीस आणले. यामुळे या किनाऱ्या वरील इतर मंदिरांबद्दल पुढील संशोधनास सुरुवात झाली.
आधीच सांगितल्याप्रमाणे महाबलीपुरम परिसरात १०० च्या वर मंदिरं आहेत.
 -माहिती संकलन सौ. संध्या यादवाडकर. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आचार आणि संहिता