नमुंमपा शाळेतील शिक्षण व्हिजनचा नावलौकिक

नमुंमपा शाळांतील 154 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत झळकत उंचविला शिक्षण व्हिजनचा नावलौकिक

  नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती  योजना परीक्षा 2022-23 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून महापालिकेच्या 53 प्राथमिक शाळांतील 154 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान  मिळवित नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण व्हिजनचा नावलौकीक वाढविला आहे.

     यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिका शाळा क्र. 31, कोपरखैरणे या शाळेतील प्रतिक्षा सोमनाथ नांगडे  या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चौथे स्थान पटकावित महापालिका शाळांतील  गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नाममुद्रा उमटविलेली आहे. महापालिकेच्या 25 शाळांमधील विद्यार्थी गुणवत्ता यादीत  झळकले असून घणसोली येथील नमुंमपा शाळा क्र. 42 येथील 34 विद्यार्थी तसेच नमुंमपा शाळा क्र. 55 राजर्षी  छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाळे येथील 30 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. नमुंमपा  शाळा क्र. 31 सेक्टर 7 कोपरखैरणे येथील 16 विद्यार्थ्यांनी तसेच नमुंमपा शाळा क्र. 33 पावणे येथील 11  विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.  या यशाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश  नार्वेकर यांनी तिचे आणि गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

     राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022-23 यामध्ये महापालिकेच्या 53 शाळांमधील इयत्ता 8  वीतील 535 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल 154 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मानांकन पटकाविले  असून त्यांना दरमहा रु.1 हजार याप्रमाणे वर्षाला रु.12 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम 4 वर्षे मिळणार आहे. ही  शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता 12 वी पर्यंत या विद्यार्थ्यांना दरमहा प्राप्त होणार आहे.

    याशिवाय महापालिका शाळांतील गुणसंपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक  कारकिर्दीला आर्थिक बळ मिळावे यादृष्टीने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आर्थिक  दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणा-या शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थांना  महापालिकेच्या वतीने प्रति महिना रु.600/- इतका आर्थिक लाभ दिला जात आहे. गुणवत्ता यादीत  आलेल्या या नवी मुंबई महापालिका शाळांमधील 154 शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनाही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा लाभ मिळणार आहे.

      इयत्ता 8 वी च्या आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  वाटचालीला आर्थिक कारणांमुळे अडचणी येऊ नयेत यादृष्टीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा  घेतली जात असून यामध्ये महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेले आहे त्याबद्दल आयुक्त राजेश  नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातून चतुर्थ क्रमांकाने शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी प्रतिक्षा नांगडे व इतर सर्व गुणवत्ता यादीत  मानांकन मिळविणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे तसेच त्यांना प्रोत्साहित करणा-या पालकांचेही अभिनंदन केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मनपा सीबीएसई शाळा प्रवेशाची आज सोडत