महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मुशाफिरी : मोशन, इमोशन आणि प्रमोशन
मोशन, इमोशन आणि प्रमोशन
तस्विरे लेना भी जरुरी है जिंदगी मे साहब
आईने गुजरा हुआ वक्त बताया नही करते
असे प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलझार यांनी सांगून ठेवले आहे. फोटो, छायाचित्र काढणे..स्वतःचे व इतरांचे..हे अनेकांना आवडते. त्या फोटोच्या रुपात तुमचा तो काळ जणू गोठवून, सांभाळून, जपून, राखून ठेवला जातो. तो फोटो तुमच्या रम्य आठवणींचे संचित बनतो.
फोटोतील प्रसंग, घटना, पात्रे पुन्हा जशाच्या तशा स्वरुपात पुन्हा कधीच अनुभवता येत नाही. कारण काळ पुढे सरकलेला असतो. काहींनी आपला हात कायमचा सोडलेला असतो. काळ, काम, वेग आपले काम करतात. वर्तमानाचा भूतकाळ बनतो. अवतीभवतीचे सारे बदलते. संदर्भ बदलतात. नाही बदलत तो केवळ फोटो. राजकारणातले उदाहरण देतो...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीसारखा वावरणारा निष्ठावंत सेवक चंपासिंग थापा, बाळासाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवलेले प्रि. मनोहर जोशी, नारायण राणे, बाळासाहेबांचा पुतण्या म्हणून त्यांच्यासोबत सतत वावरलेले राज ठाकरे या मंडळींचे बाळासाहेबांसोबत एकत्रित कितीतरी फोटो असतील. पण...पण आता त्यांचे सारे सारे संदर्भ बदलले आहेत. त्यांचे फोटो मात्र न बदललेले, तसेच्या तसेच राहिले आहेत.
या फोटोंना जोड मिळाली ती मोशन पिक्चर, व्हिडिओ अर्थात ध्वनीचित्रफितींची! त्यांनी फोटोंच्या पुढेच पाऊल टाकले. तो प्रसंग दोन मितीत नव्हे, तर तो सारा प्रसंग चालत्या बोलत्या हलत्या स्वरुपात साठवून ठेवण्याची व पडद्यावर पाहण्याची व्यवस्था या सिनेमाटोग्राफीने, व्हिडिओने केली. चित्रपटाचा शोध लागल्याला अनेक दशके होऊन गेलेली असली तरी प्रत्येकाला स्वतःवर किंवा आपल्या प्रियजनांवर चित्रपट बनवणे शक्यच नव्हते. व्हिडिओने ते काम सोपे केले. मग अवतरला स्मार्ट फोन! त्यावरील रेकॉर्डिंग आणि रील्स प्रकाराने तर आरपार बदल घडवले. कुणीही उठावे आणि व्हिडिओ बनवावे इतके ते आता सोप्पे बनून गेले आहे. या साऱ्याच्या मधला काळ होता दूरचित्रवाणी अर्थात चॅनेल्सच्या चलतीचा! त्या काळात काही चॅनेल्सवाल्यांनी त्याचा पुरेपुर वापर (अथवा गैरवापर !) करुन घेतला. मला २००६ ची म्हणजे आजपासून सतरा वर्षांपूर्वीची एक घटना आठवते. सार्वजनिक ठिकाणी एक मॉडेल राखी सावंत हिचे चुंबन मिका सिंग या गायकाने घेतल्याचा एक व्हिडिओ व त्यावरुन बरीच बातमीबाजी विविध चॅनेल्सवरुन करण्यात आली होती. आज सतरा वर्षांनंतरही यावर पोलीसी कारवाई झाल्यावरसुध्दा कनिष्ठ न्यायालयाने अजून आरोप निश्चिती केली नाही. मात्र त्यावर सनसनाटी निर्माण करण्यात राखी व मिका यशस्वी ठरले. भरपूर पब्लिसिटी त्यांना मिळाली. हे सारे ठरवून केले होते असे तेंव्हाही म्हटले जाई. आता म्हणे मिकाने पोलीसांचा एफआरआय रद्द करावा यासाठी त्याची वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'राखी व आपल्यात समझोता झाल्याने आता एफआरआय रद्द करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत' अशी त्याची विनंती आहे.
राखी व मिका यांच्याबाबतीत झालेल्या प्रकाराच्या वेळी सोशल मिडिया अजून अवतरला नव्हता. ज्या काही बाईट्स किंवा वक्तव्ये पहायला मिळायची ती केवळ सेलिब्रिटी लोकांचीच! रस्त्यावर चालणाऱ्यांना त्यावर त्यावेळी जाहीरपणे व्यक्त होता येत नव्हते. आता २०२३ साली शिवसेना शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे व शितल म्हात्रे यांच्या दरम्यानच्या एका वादग्रस्त व्हिडिओ नंतर मोठ्या प्रमाणावर जनसामान्य त्यावर मते मांडू लागले. आधीच्या विविध व्हिडिओंचा वापर त्या व्हिडिओची पुष्टी किंवा प्रतिवाद करण्यासाठी करु लागल्याचे पहायला मिळतेय. महाराष्ट्राच्या राजकारणात दृकश्राव्य माध्यमांचा सर्वात परिणामकारक वापर कुणी केला असेल तर तो मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी! त्यांचा ‘ए लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग अनेकांच्या स्मरणात आहे. माहिमच्या अनधिकृत दर्ग्याबाबतच्या व्हिडिओने तर शासकीय यंत्रणांना कामाला लावून केवळ बारा तासांत कारवाईचा निकाल मिळवला..जरी त्याला कुणी ‘फॅब्रिकेटेड' किंवा ‘स्क्रिप्टेड' म्हणत असले तरी हे वास्तव आहे! व्हिडिओंचा वापर असा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, बेकायदा कामे शासनयंत्रणांच्या नजरेस आणून देण्यासाठी होत असेल तर तो कुणाला नको? योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य कृती केली की त्याचा परिणाम पहायला मिळतो. याला नियोजन, व्यवस्थापन, सुयोग्य संचालन म्हणतात. आपापली छबी चमकवण्यासाठी, आपले काम, कार्य, उत्पादन, निर्मिती, रचना लोकांसमोर आणण्यासाठी सगळेचजण ते करीत असतात आणि त्यात गैर असे काहीच नाही. अलिकडे त्याला मार्केटिंग, प्रमोशन अशी नावे आहेत. पण हे पूर्वीही व्हायचे बरे! राज कपूरचा संगम नावाचा सिनेमा १८ जून १९६४ रोजी रजतपटावर झळकला. त्यावेळी अनेक फिल्मी पार्ट्याना राज कपूर, राजेंद्र कुमार व वैजयंती माला एकत्रितच जायचे. सिलसिला चित्रपटात अमिताभ, रेखा, जया हे तिघेही जण एकत्र आहेत. अमिताभ-जयाचा प्रेम विवाह असूनही अमिताभच्या रेखा हिच्यासोबतच्या संबंधांवर चर्चा घडवून आणली जात असे आणि सिनेमा, सिनेमाचा विषय यावर चर्चा, वाद, प्रतिवाद सुरु ठेवले जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जाई. हे सारे एकप्रकारचे प्रमोशनच होते. सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वीही असे होत असे. मराठीतील नामांकित साहित्यिकाने निर्मिलेल्या एका चित्रपटातील बाल कलाकाराला विविध कार्यक्रमांत बोलावून त्यातील संवाद बोलायला लावत, त्याचे सत्कार घडवून आणले जात असत. हे दुसरे तिसरे काही नसून प्रमोशनच तर होते. मात्र त्याला थेट प्रमोशन असे त्यावेळी कुणी म्हणत नसे आणि तसे प्रमोशन करण्यात काही गैरही नसे, नाही. यात काही उघडेबोडके, चवचाल, अंगप्रदर्शन करणारे, समाजविघातक, कुणाच्या इमोशन्स-भावना दुखावणारे, आंबटशौकीनांच्या नजरेला खाद्य पुरवणारे असे त्यावेळी आढळून येत नसे. आता कपिल शर्मा शो, चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा कार्यक्रमांतून अनेक नाटक, माालिका, चित्रपटांचे व्यवस्थित सशुल्क प्रमोशन केले जात असते. विविध भाषांतील नामांकित दैनिके, साप्ताहिकेही अशा कामासाठी कॉलम सेंटिमीटर दराने आपापली पाने उपलब्ध करुन देण्यालाही जमाना लोटला आहे.
समाजमाध्यमे तर आता विनामूल्य स्व-प्रमोशनसाठी राजरोस, रात्रंदिवस, ट्वेन्टी फोर बाय सेव्हन मौजूद असतात. सकाळी, दुपारी, रात्री.. केंव्हाही फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब सुरु करा. कामवाली बाई शीला करणारी अपर्णा तांदळे, खरंच..वाली डॉ ज्योती सावंत, सपना मुखर्जी, रींकू झा, हेमांगी कवी, अनुष्का बोराडे, बस कंडवटर मंगल सागर गिरी, तसेच कल्याणी पाटील, खुशी बाली, मंजु अग्रवाल, सोनाली, राखी सावंत, माधुरी पवार, गौतमी पाटील या व अशा कित्येक महिला आपापल्या रीळा (रील्स) घेऊन जणू तयारच असतात. काही रीळा उत्पादक अनेक चटकमटक महिलांच्या रीळा बनवून इतरांसाठी पेश करत असतात. त्यात मलाईका अरोरा, उर्फी जावेद, सनी लिओनी सारख्यांचा समावेश होतो. काही महिला खरोखरंच अभिनय, सादरीकरण, मूल्य, दर्जा, आशय, सामाजिक बांधीलकी आपापल्या सादरीकरणात घेऊन येतात, त्यातून त्यांची सृजनशीलता दिसून येते. जे पाहताना मनस्वी समाधान वाटते. बाकी अनेकींची आशुकमाशुकगिरी, चवचालपणा, सवंग विनोद, अंगदाखवेगिरी, टिकटॉकगिरी ही आंबटशौकिनांसाठी उपयुक्त खाद्य ठरते. चांगल्या घरातील महिलाही जेंव्हा अक्षरशः चिअरगर्ल्ससदृश्य लिला अशा रीळांमधून करतात; विवाहिता, एक-दोन मुलांच्या माता असूनही छचोर, स्वस्त, उत्तान, टपोरी -छपरीटाईप वाटतील अशी दृश्ये बनवून समाजमाध्यमांवर प्रदर्शित करतात, तेंव्हा मात्र खेद वाटल्यावाचून रहात नाही. अशा महिलांच्या परिवारातील वडील, भाऊ, नवरा, मुलगा, दीर, सासरा, नंदावा यांना अशा वेळी काय वाटत असेल, असा प्रश्न मनात येतो.
काही दैनिकांच्या डिजिटल आवृत्यांमधून, काही चॅनेल्सच्या समाजमाध्यमी बातम्यांमधून नट-नट्या, राजकारणी, नामांकित खेळाडू, नृत्यांगना अशांच्या आयुष्यातील खासगी, चार भिंतींच्या आतील घटनांवरील वार्तांकन करीत वाचक-दर्शकवर्ग मिळवण्याचा, टीआरपी वाढवण्याचा खटाटोप दिसून येतो. अनेक सूज्ञ वाचक त्यावर रोकड्या प्रतिक्रिया देऊन अशा दैनिकवाल्यांची, चॅनेलवाल्यांची बिनपाण्याने कशी चंपी करतात हेही पाहायला मिळते. या साऱ्या गोष्टींशी सर्वसामान्य वाचकांना काहीच देणेघेणे नसते. नागरिकांना त्यांच्या आजूबाजूच्या, रोजमर्राच्या जिंदगीशी भिडताना अनेक अडचणींना तोंड देताना मेटाकुटीला यावे लागते. त्यांना त्यांचे प्रश्न, समस्या मांडणारी, सोडवणारी प्रसारमाध्यमे अपेक्षित असतात. त्यामुळे बऱ्यापैकी विश्वसनीयता असलेली वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स अशी छचोरगिरी करतात तेंव्हा लोकांचा भ्रमनिरास होतो. गुलजार म्हणतात त्याप्रमाणे तस्वीरे लेना भी जरुरी है जिंदगी मे साहब..हे खरे..पण ती तस्वीरे संस्मरणीय, आपलीशी वाटणारी, तुमच्या आमच्या जिंदगीशी सुसंवाद साधणारी असावीत, छिद्रान्वेषीपणा करणारी नसावीत हेही तेवढेच खरे!
तत्कालिन प्रसारमाध्यम जगतात स्वतः विविध वृत्तपत्रे चालवून वस्तुनिष्ठ वार्तांकन, अभ्यासपूर्ण संपादनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन आणि सर्वांना शुभेच्छा.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.