‘एनएमएमटी'चा विद्यार्थी हिताय निर्णय

मासिक बसपासवर शाळा ते घर विद्यार्थ्यांना अनलिमिटेड प्रवासाची मुभा -आयुवत नार्वेकर

तुर्भे ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) विद्यार्थ्यांच्या बसपास योजनेत पालट करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. यामध्ये मासिक बसपासवर शाळा ते घर या ठिकाणापर्यंत कितीही वेळा विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे ‘एनएमएमटी'च्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

मागील काही वर्षांपासून पास योजनेमध्ये विविध सवलती दिल्यामुळे विद्यार्थी बेस्ट उपक्रमाकडे आकृष्ट झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या विद्यार्थी बसपासच्या संख्येत मोठया प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, परिवहन उपक्रमाचे आर्थिक उत्पन्न कमी झालेले आहे. यामुळे परिवहन उपक्रमाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मासिक बसपास संख्येत वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अशी माहिती उपक्रमाचे व्यवस्थापक  योगेश कडूस्कर यांनी दिली.
त्याचाच एक भाग म्हणून सध्यस्थितीत चालू असलेल्या विद्यार्थी मासिक बस पास योजनेत घर ते शाळा आणि शाळा ते घर अशी दिवसातून एक फेरी प्रवास करण्यास सवलत आहे. सदर मासिक बस पासामध्ये विद्यार्थ्यांना असलेले एका फेरीचे बंधन काढून शाळेत ये-जा करणे, तसेच जादा तासिकासाठी आणि शिकवणी यासाठी ये-जा करण्यासाठी त्रैमासिक बस पास प्रमाणे नो-पंचींग (जादा फेऱ्या प्रवास) करण्यास सवलत दिल्यास नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी सोयीचे होईल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांच्या बसपास संख्येत वाढ होण्यास मदत होईल.

त्यानुसार बसपास सवलत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. मासिक पास योजनेमध्ये दिवसातून शाळेत ये-जा करणे, जादा तासिका आणि शिकवणी करिता ये-जा करण्यासाठी सवलत असणार आहे. सदर बसपास नो-पंचींग असेल. महापालिका क्षेत्रातील काही बसमार्गावर पूर्णपणे वातानुकुलित बसेस चालवण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण बसेसच्या तिकीट दरानुसार मासिक बस पास शुल्क आकारुन वातानुकुलित बसेसमध्ये प्रवास करण्यास विद्यार्थ्यांना मुभा राहाणार आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वयाची २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सदर मासिक बसपास योजनेची सवलत घेता येणार आहे, असे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी सांगितले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

12 व 13 एप्रिल 2023 रोजी वाशी येथील सिडको कन्वेन्शन सेंटर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन