किती बोलाल?

बोलता येते म्हणून एखाद्याने किंवा एखादीने किती बोलावे याचे भान बाळगणे गरजेचे असते. कुठे, कधी, किती वेळ, कसे, कशा पध्दतीचे, कुणाशी, कुठल्या आवाजात बोलावे याचे काही सामाजिक संकेत आधीपासूनच रुढ आहेत.

शतेषु जायते शूरः सहसत्रेषु पण्डितः !

वक्ता दशसहसत्रेषु दाता भवति वा न वा !!

असे एक सुप्रसिध्द संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ असा की शंभरात एखादाच शूर असतो..तर हजारात एखादा पंडित. दहा हजारांत एखादा वक्तृत्वात प्रवीण असतो आणि लाखांत एखादाच दानी असतो. मुळातच हे वचन दानाची, दातृत्वाची, दानशूरपणाची महति मनावर ठसवण्यासाठीचे आहे. मात्र ते अधिकाधिक वापरात येते ते मुख्यत्वे बोलण्याचे, मुद्देसूद, प्रभावी बोलण्याचे, वक्तृत्वाचे महत्व पटवण्यासाठीच!  लिहिणे, बोलणे, गाणे, संगीत रचना करणे, नृत्य, अभिनय, गीत रचना, मेंदी रेखाटन, गोंदणे आदि ६४ कला सांगितल्या गेल्या आहेत. व्यक्तीविकासासाठी त्या साऱ्या कलांची आवश्यकता असते. मानवास यातील बहुतांश कला जोपासता येतात, साध्य करता येतात. मानवांत आणि प्राण्यांत मुख्य फरक तो हाच! शिवाय मानव बोलून भावना व्यवत करु शकतो. त्याची बोली ही लिपीबध्द होते. अगदी अंधांसाठीही ब्रेल लिपी असून ती स्पर्शाने वाचताही येते. एका भाषेतील रचना या दुसऱ्या भाषेत रुपांतरीत, अनुवादित, भाषांतरीत करता येतात. प्राणी, पक्षांचीही त्यांच्यापुरती काही सांकेतिक भाषा असेलच म्हणा! मानवाने मानवासारखे वागले बोलले पाहिजे. अन्यथा त्याचे वर्तन पाशवी (म्हणजे पशुसारखे!) झाल्याचे म्हटले जाते. बोलता येते म्हणून एखाद्याने किंवा एखादीने किती बोलावे याचे भान बाळगणे गरजेचे असते. कुठे, कधी, किती वेळ, कसे, कशा पध्दतीचे, कुणाशी, कुठल्या आवाजात बोलावे याचे काही सामाजिक संकेत आधीपासूनच रुढ आहेत. जसे की सर्वसाधारणपणे वर्गातील शिक्षक-प्राध्यापक यांच्यासाठी ३५ किंवा ४५ मिनिटांची तासिका असते. त्यांनी तेवढा वेळ अध्यापनाचे पवित्र कार्य करावे अशी अपेक्षा असते. ग्रामीण भागातील काही शिक्षक याच वेळेत पान, तंबाखू खातात, कधी कधी तेथीलच खिडकीतून पचकन थुंकतात असेही पाहायला मिळते. एखाद्या दुःखाच्या ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी गेल्यास हळू आवाजात तेथील दुःखी परिवारातील प्रमुख व्यवितशी मृताबद्दल बोलावे, त्याच्या आठवणींना उजाळा द्यावा, हे करताना उगाचच विनोदनिर्मिती करणे, जोरात हसणे, हातावर टाळी देणे किंवा मागणे असला थिल्लरपणा टाळावा हे वर्तन अपेक्षित असते.

गेल्या काही वर्षांपूर्वी भ्रमणध्वनी नामक यंत्राचा शोध लागला, त्याआधी संगणक अवतरला, त्यावर ईमेल सुविधा आली, मग संगणक बोलूही लागला. या संगणक व भ्रमणध्वनीने दूरध्वनी, फॅक्स, टेलेक्स, टेलिप्रिंटर आदिंची मवतेदारी मोडीत काढली. त्यानंतर समाजमाध्यमे अवतरल्यावर तर त्यांनी साऱ्यांचेच वर्चस्व संपुष्टात आणून छापील वर्तमानपत्रांनाही सशक्त आव्हान देत स्वतःची ताकद वाढवली. तरीही या साऱ्यात बोलणे, लिहिणे, वाचणे, संगीत, नृत्य, अभिनय आदि बाबीही कायम राहिल्याच! उलट त्यांच्या सशवत दळणवळणाला अधिक गति आली. अधिक आयाम प्राप्त झाले. आपल्यासारख्या खंडप्राय व खेड्यांनी बनलेल्या देशातही या समाजमाध्यमांचे वापरकर्ते प्रचंड संख्येने वाढत गेले. अगदी पोस्ट, बँक, शिधापत्रिका, आधारकार्ड अशांच्या नित्याच्या व्यवहारांच्या बाबतीतही मग मोबाईल नंबराची नोंद, त्यावरील बोलणे, त्यावर येणारा ओटीपी इत्यादी बाबी कामकाजाचा एका भाग बनून गेल्या. तर.. वक्तृत्व अर्थात बोलण्याची कला या साऱ्यातही अधिक खुलली, रुजली, उठून दिसू लागली. नित्याचे घरगुति बोलणे, शिळोप्याच्या गप्पा, रंगमंचीय-विचारमंचीय बोलणे, सार्वजनिक नळावरील बायकांचे बोलणे, भिशी कार्यक्रमातील बोलणे, तिकडे लग्न लागून गेल्यावर इकडे खुर्च्या गोलाकार मांडून त्याच सभागृहात सामुहिक गप्पा हाणणे हे सारे वक्तृत्वाचे स्वतंत्र प्रकार आहेत.

दर्जेदार वक्तृत्वाचे वरदान फार थोड्या (वक्ता दशसहस्त्रेषु!) लोकांना लाभलेले असते. जसेकी स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व.आचार्य प्र.के.अत्रे, स्व. पु. ल.देशपांडे, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन, स्व.माधवराव गडकरी, स्व.प्राचार्य शिवाजीराव भोसले, स्व. बाबासाहेब पुरंदरे, स्व. विलासराव देशमुख, स्व. रावसाहेब रामराव (आर आर) पाटील, राज ठाकरे, स्व. आमदार केशवराव धोंडगे, माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रविण दवणे, नितिन बानुगडे पाटील हे व असे बिनिचे वक्ते आपल्याकडे होऊन गेले, आजही आहेत. यापैकी स्व. अटलजी, स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन, स्व. विलासराव देशमुख, स्व. माधवराव गडकरी (तत्कालिन संपादक - दै. लोकसत्ता) आदिंना ऐकायचा मला योग आला. मुंबईतील एक सभा मला आठवते. तिथे लालकृष्ण अडवाणी, तत्कालिन खासदार जयवंतीबेन मेहता (अखंड शिवसेना-भाजपची युती असताना!) अभिनेता शत्रुघ्न सिन्हा विचारमंचावर होते व स्व. बाळासाहेब ठाकरे बोलत होते. ते अडवाणींना उद्देशून म्हणाले की, ‘भाजपवाल्यांनो, तुमच्या झेंड्यातील तो हिरवा डाग काढून टाका, झेंडा पूर्ण भगवा ठेवा.'  ते नीट न समजल्याने अडवाणी यांनी बाळासाहेब मराठीत काय म्हणाले ते जयवंतीबेन यांच्याकडून समजून घेतले.

मनात आलेले इतके रोखठोक व कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता जाहिरपणे बोलणारे बाळासाहेब ते बाळासाहेबच! दुसऱ्या एका सभेत मी पाहिले की विचारमंचावर स्व. प्रमोद महाजन होते, पण तेथे बोलणाऱ्या वक्त्यांच्या यादीत मात्र त्यांचे नाव नव्हते. त्या सभेस जमलेल्या विशाल जनसमुदायातून प्रमोद महाजन यांच्या नावाचा असा काही पुकारा सुरु झाला की सूत्रसंचालकाला आयोजकाच्या परवानगीने महाजन यांना भाषणासाठी बोलवावे लागले. १९८४-८५ च्या सुमारास मी पनवेलमध्ये ऐकलेली एक जाहिर सभा आठवते. तेंव्हा बॅ.अब्दुल रहमान अंतुले हे माजी मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते. ‘दै. लोकसत्ते'चे तत्कालिन संपादक स्व. माधवराव गडकरी यांनी ‘अंतुल्यांना पाडा भ्रष्टाचार गाडा' ही मोहिम राबवली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्या स्व. दि.बा.पाटील यांचे नाव दिले जाणार आहे, ते त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. पनवेल, पेण, अलिबाग येथे जाहिर सभा घेऊन गडकऱ्यांनी अंतुल्यांविरोधी रान उठवले व स्व. दि. बा. पाटील साहेब यांना निवडून आणण्यात त्यांच्या ववतृत्वाने त्यावेळी मोठी भूमिका बजावली. गडकरी यांनी ‘सभेत कसे बोलावे' हे पुस्तकही लिहिले आहे, जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे.

तीन वर्षांपूर्वी करोनाने तुम्हा आम्हाला घरी जखडून ठेवल्यावर गुगल मीट, व्हाट्‌स अप संवाद, समाजमाध्यमावरील टेलिग्राम यांचा वापर वाढला व घरातल्या घरात बसून शेकडो दर्शकांशी जिवंत (म्हणजे आपलं लाईव्ह हो!) संवाद साधण्याची आणखी एक कला विकासित झाली. शाळा-महाविद्यालयीन शिक्षक-प्राध्यापकांना याचा अधिक वापर करता आला. ‘वर्क फ्रॉम होम' हेही करोना रोगाचेच एक अपत्य! प्रिंट आणि इलेवटॉनिक्स माध्यमांतून काम करणाऱ्या आमच्यासारख्या पत्रकारांना या दोन्ही माध्यमांच्या ताकदीचा अदमास घेऊन वावरावे लागते. डेस्कवरचे काम असो..की जाहिर सभेतील वार्तांकन, बंद केबिनमधील मुलाखत असो..की एखाद्या जत्रा-यात्रा, रेल्वे स्थानक-बस स्थानक, प्रदर्शनी अशा ठिकाणचा वार्तालाप..या साऱ्यात समोरच्याने नेमवया शब्दात, नेटकेपणाने व्यक्त व्हावे ही अपेक्षा असते. तेथे एखाद्याच्या/एखादीच्या रसवंतीला उगाचच बहर येेणे आमच्यासाठी धोवयाची घंटा असते...आणि हे सारे होत असताना आमच्या खिशातला मोबाईल वाजणे हे तर आणखीच तापदायक. बरे वाजला तर वाजला..त्यावर बोलणाऱ्याने तरी थोडक्यात आवरावे? माझा एक वयस्क मित्र असाच कधीही कोणत्याही वेळी फोन करुन मी बोलायच्या अवस्थेत आहे की नाही याचा विचार न करता अघळपघळ, पाल्हाळीक बोलून माझे डोके खात असतो. एकाला मोबाईलवर कॉल करुन व्यासपीठावर भाषण करताना कसे पॉज-बिज घेत बोलतात, आवाजात चढ उतार, नाटकी अभिनिवेश आणतात..तसे बोलायची सवय आहे. एका मित्राला स्वतःची दुःखभरी दास्तान मला कधीही, केंव्हाही, कितीही वेळ फोन करुन ऐकवायची खोड आहे. एका कथित ज्येष्ठाला आपण किती महान आहोत हेच समोरच्याला ऐकवायची वर्णवर्चस्ववादी खुमखुमी आहे. अशा ठिकाणी एक जरी शब्द माझ्याकडून वेडावाकडा गेला तर पार दैनाच! तरी सारे भान राखून, त्यांच्या वयाचा, (आणि केवळ वयाच्याच!) ज्येष्ठत्वाचा मान राखत मी श्रोत्याची भूमिका वठवतो. कधी कधी डाफरुन ‘नंतर कॉल करतो' म्हणून सांगत खूप दिवस कॉलच करणे टाळतो, याचा जायचा तो संदेश नेमकेपणाने जातो. एखाद्याला कंटाळा येईपर्यंत बोलणे, कंटाळा येईपर्यंत बोलणे, व्यक्तीगत संकटांच्या कथा सांगत राहणे, मंचाचे भान विसरुन औचित्यशून्य वक्तव्ये करणे हे सारे अनाडीपणाचे लक्षण आहे. तेच नेमके आता आपल्या अवतीभवती अधिककरुन घडत असल्याचे ऐकावे लागत आहे. तुमचे काय निरीक्षण आहे? सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा व चांगले काही ऐकवणारे वक्ते भेटोत अशा शुभकामना!

- राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : मोशन, इमोशन आणि प्रमोशन