बेलापूर मध्ये रंगला सायकल  कट्टा

महाराष्ट्रातील सायकलपटू ईशान्येतील मुलांसाठी प्रेरणादायी

वाशी ः ‘तुम्हाला जितका जास्त त्रास होईल, त्यातून तुम्हाला तितकी अधिक प्रेरणा मिळेल', असे मत शाश्वती भोसले हिने व्यक्त केले. बेलापूर येथील ‘ॲग्रो गार्डन'मध्ये सायकल प्रेमींसाठी ‘सायकल कट्टा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  शाश्वती भोसले हिने आपल्या सायकल प्रवासाचे अनुभव सर्वांसमोर मांडले.

७ वर्षे काम केल्यानंतर कामापासून विश्रांती घ्यायची म्हणून २०१९ मध्ये ईशान्य भारतात सायकलिंग करण्याचा निर्णय शाश्वती हिने घ्ोतला. ती एकटीच बाहेर पडली. त्रिपुरापासून सुरुवात करुन नंतर मिझोराम, आसाममध्ये प्रवास करत वाटेत म्यानमार मध्येही छोटासा सायकल प्रवास शाश्वती भोसले हिने केला. दक्षिणेला अंदमानमध्येही सायकलिंग केले, पश्चिम भारतात पुणे ते गोवा पर्यंतचा सायकलप्रवास केला. एक महिला आणि आणि एकटीने सायकल प्रवास करताना तुला भीती वाटली नाही का?, या प्रश्नाचे उत्तर देताना शाश्वती म्हणाली, तिला सदर प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे.

‘आता मला या प्रश्नाचीच भीती वाटते. मला कधीच विशेष वाईट अनुभव आला नाही. ‘जेव्हा तुम्ही सायकलवर असता, धडपड करता तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. सायकल चालवताना आपण कधीही कोणतेही लक्ष्य ठेवत नाही, प्रवासाच्या नोंदीही करण्यात वेळ वाया घालवत नाही. कारण त्यामुळे तुम्ही त्यावेळचे आनंदी क्षण गमावता. हाच फरक व्यवसाय आणि छंदामध्ये आहे. छंद जोपासताना कोणतेही लक्ष्य नसते. म्हणूनच त्यातून जास्तीत जास्त आनंद मिळतो, असे मतही शाश्वती भोसले हिने व्यक्त केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालक आक्रमक