शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालक आक्रमक

 एनएचपी स्कूलसमोर आंदोलन

वाशी ः नवी मुंबई शहरातील इतर सर्व शाळांनी एनसीआरटी पाठ्यपुस्तके ग्राह्य धरली असताना ऐरोली येथील एनएचपी (होराईझन पब्लिक स्कूल) शाळा प्रशासनाने सदर पुस्तके देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पालकांना नाहक भुर्दंड बसत आहे. तसेच शाळेने नियमबाह्य शुल्क वाढ केली असून, अनेक बाबतीत शाळेचा अरेरावीपणा सुरु आहे. त्यामुळे शाळेच्या मनमानी कारभार विरोधात पालकांनी ५ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या एनसीआरटी पाठ्यक्रमाची पुस्तके न वापरता खाजगी पाठ्यक्रम शिकवून पालकांना ८ हजार रुपयांची महागडी पुस्तके खरेदी करण्यास शाळा भाग पाडत आहे. तसेच कोरोना काळात शासनाने आदेश देऊनही शुल्क वसुली केली. वेळेवर शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना रोज १०० रुपये दंड आकारला. यावर्षी शाळेच्या माध्यमातून १५ टक्के नियमबाह्य शुल्क वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना काळात सरकारने शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना देऊनही शाळेने एकही रुपया कमी केला नाही. याविरोधात पालकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर शाळा प्रशासनाने पालकांच्या मागणी नुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते, असे यावेळी पालकांनी बोलून दाखवले. मात्र, शाळा प्रशासनाने आपल्या आश्वासनावर घुमजाव करत आपला मनमानी कारभार सुरुच ठेवला. याबाबत शाळा प्रशासन बोलण्यासही तयार नाही. याशिवाय पाल्यांना शुल्काबाबत मानसिक त्रास दिला जातो. सदर प्रकार बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेच्या मनमानी विरोधात पालकांनी रास्ता रोको आंदोलन केले, असे पालक आशिष सैदाणे यांनी सांगितले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेला देश विदेशातील स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद