मुशाफिरी : रस आणि ‘रसिक'

रस आणि ‘रसिक'

   तुमचे आमचे आयुष्यच मुळी सुरु होते ते मातेच्या स्तनातून आलेल्या दुग्धरसाने! या रसाची सर आणि पोषणमूल्यं जगातल्या कोणत्याच रसाला नाही..आणि तुमचे आमचे आयुष्य संपते तेही कोणत्यातरी रसानेच ! मग ते शेवटच्या दिवसात दवाखान्यात (किंवा घरच्या घरी!) तोंडावाटे दिले जाणारे औषध असो, सलाईनद्वारे अंगात चढवलेले ग्लुकोज असो की मृत्युसमयी निकटच्या आप्तेष्टांनी तोंडात भरवलेले गंगाजल असो!

   सर्व त्रुतुंचा राजा समजल्या जाणाऱ्या वसंत त्रुतुला प्रारंभ झाला आहे. अलिकडले कालचक्र काहीसे बदललेले असले व याच वसंतात ऐन मार्च महिन्यात धो धो पाऊस सरी कोसळून गेल्या असल्या तरीही वसंत तो वसंतच! त्याचे मोठेपण अन्य कुणी अवकाळी,  अवलक्षणी  हिरावून घेईल असे काही संभवत नाही. हाच तो फळांचाही मौसम! फळांचा राजा आंबा याचे हसतमुखाने स्वागत करण्याचा काळ. जांभळे, जाम, करवंदे, टरबुज, कलिंगडे अशा रसदार फळांची आमराईत, मळ्यात, झाडावर, बाजारात चांगली आवक असण्याचा हा सुखद त्रतु. कुठलेच फळ किंवा कुठल्याच फळाचा रस ज्याला अजिबात आवडत नाही अशाला खुशाल ‘अरसिक'  समजावे.

   येत्या ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन' आहे. तब्येत चांगली, ठणठणीत ठेवण्यासाठी तुमच्या आमच्या आयुष्यात या फळांचे आणि त्यांच्या रसांचे महत्व किती हे नव्याने सांगायला नको! ‘ॲन ॲपल एव्हरी डे किपस्‌  डॉक्टर अवे'  असे उगाच नाही म्हटले जात! ज्यांना फळांच्या रसांऐवजी भलतेसलते (नवसागरी, नशिले, मादक, घातक, अंमली) रस सतत प्राशन करायची सवय (व्यसनच!) असते, त्यांना अकाली जडलेले रोग लक्षात घेता त्यांची वाटचाल काळाच्या आधीच आयुष्याच्या उतरणीच्या दिशेने कशी सुरु झालेली असते हे अवतीभवती आढळणारे असे रोगी पाहुन लगेच लक्षात यावे. तुमचे आमचे आयुष्यच मुळी सुरु होते ते मातेच्या स्तनातून आलेल्या दुग्धरसाने! या रसाची सर जगातल्या कोणत्याच रसाला नाही..आणि तुमचे आमचे आयुष्य संपते तेही कोणत्यातरी रसानेच ! मग ते शेवटच्या दिवसात दवाखान्यात (किंवा घरच्या घरी!) तोंडावाटे दिले जाणारे औषध असो, सलाईनद्वारे अंगात चढवलेले ग्लुकोज असो की मृत्युसमयी निकटच्या आप्तेष्टांनी तोंडात भरवलेले गंगाजल असो! अगदी मृतदेहाच्या तोंडातही अंत्यविधीपूर्वी पाणी पाजले जाण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. ‘फळांचा रस करुन तो घेण्याऐवजी थेट फळेच खा'असेच डॉवटर, वैद्य मंडळी सांगतात. कारण फळातल्या साखरेसोबतच फळातील अन्य घटकही आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. फळांसोबत आपल्या पोटात फायबर, तंतुमय भाग जातो..जो आपल्या आतड्यांसाठी, पोट साफ ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतो. माझ्या पाहण्यात असे अनेक मित्र आहेत की जे केळे खातानाही सालीसकट खातात. एक विश्वविक्रमी व क्रीडाविषयक विविध पदके मिळवणारा माझा एक मित्र आंब्याच्या फोडीही सालीसकट खाताना मी अनेकदा पाहिला आहे.  फायबर पोटात जाण्यासाठी आंब्याची साल खायला माझी काही हरकत नाही; पण आंब्याच्या मधुरतेसोबत ती तुरट चवीची साल खाणे हे मग एकूणच आंब्याच्या चवीला व ती खाताना लागलेल्या खाद्यसमाधीला बाधा पोहचवते असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यापेक्षा आंबा वेगळा खावा...व ताटभर साली स्वतंत्रपणे, वेगळ्या चावाव्यात असे मला वाटते. पण मी तो प्रयोग करणे नेहमीच टाळत आलो आहे. त्यापेक्षा त्या वेळेत मी आणखी एखाद दुसऱ्या आंब्याचा फडशा पाडणे पसंद करतो.

   ‘फळांचा राजा' मानला जाणाऱ्या या आंब्याचा रस अनेक महानगरांतून मस्तपैकी थंड करुन बुफेच्या वेळी विवाह किंवा तत्सम समारंभांच्या जेवणावळींत ठेवलेला असतो. माझ्यासारखे अनेक आंबासंप्रदायप्रेमी खवय्ये तेथे वाट्यांवर वाट्या फस्त करीत असताना कॅटररला हे परवडते तरी कसे, हा प्रश्न मला सतावीत असे. याबद्दल माझ्या एका कॅटरर मित्रानेच माझ्या ज्ञानात मौलिक भर घातली. त्याने सांगितले की या आमरसात पपईच्या फोडीही घालून त्या घुसळलेल्या असतात व कित्येकदा साखरही घालून त्याची चव वाढवली जात असते.

   कोणत्याही फळाच्या रसात अशी साखर घालणे हे अंतिमतः चूकीचे असते. कारण मुळ फळाचीच ती गोडी की काय समजून असे रस अधिक प्यायल्याने अनावश्यक साखर आपल्या पोटात व त्यामुळे रक्तात जाते, जे प्रकृतीला घातक ठरु शकते. उसाचा रस हे आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचे पेय आहे. ते अनेक रोगांवरही औषधस्वरुपी काम करते. मी महाराष्ट्रात व आंध्र, कर्नाटकच्या महाराष्ट्राला खेटून असणाऱ्या अनेक भागांत फिरलो व तेथेही उसाच्या रसाचा आस्वाद विविध रसवंतीगृहांतून घेतला. उसाच्या रसात साधा (बिनबर्फाचा) व बर्फ घातलेला असे प्रकार मी नेहमी पाहतो. उन्हाळ्याला प्रारंभ झाला की राज्याच्या विविध खेड्यांमधून लाकडी गाडा घेऊन उसाचा रस लागलीच बनवून देणारी अनेक जोडपी नवी मुंबईतही आल्याचे दिसून येते. काचेचा ग्लास, प्लास्टिक पिशवी, कागदी ग्लास अशांतून हा रस दिला जातो. सोबतीला लिंबुही असतो. अनेक रसवंतीगृहे किंवा रस्त्यावर असणाऱ्या उसाच्या गाड्यांवर दिल्या जाणाऱ्या उसाच्या रसासाठी वापरलेला बर्फ हा हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी बर्फाच्या लाद्या वापरल्या जातात, त्यातून उरलेला स्वस्त बर्फ असतो असा अपप्रचार करणारे अनेकजण आहेत. मुळात मृतदेह ठेवण्यासाठीचा बर्फ हा त्या शवागारापुरताच असतो, तो कधीही कुणीही विक्रीला काढत नाहीत, त्यामुळे भलत्या शंका मनात नकोत! एक मात्र आणखी मुद्दा आहे तो असा की अशा काही रसवाल्यांनी घेऊन ठेवलेला बर्फ हा तिथेच जवळ कुठेतरी (बहुधा रस्त्यावरच...गोणपाटाखाली त्यावर भुसा टाकून) झाकून ठेवलेला असतो. त्यावर थोडे पाणी टाकून स्वच्छ केल्याचे दाखवत तो रसात मिसळण्यासाठी वापरला जातो. इथे मात्र आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. कारण त्या रस्त्यावर अनेक सुक्ष्म जीवजंतू फिरत असतात. तिथेच फिरणाऱ्या कुत्रे, गायी, बैल, उंदीर, मांजरी अशा प्राण्यांनी त्यांचे विविध विधी तिथे केलेले असतात. त्यांना काय माहित की मानवप्राण्याला दिल्या जाणाऱ्या रसात हा बर्फ टाकायचा आहे म्हणून!

   रसाचा आणखी प्रगत, आरोग्यदायी प्रकार म्हणजे औषधी विविध काढे, आसवं, क्वाथ होत. गुढीपाडव्याला, दिवाळीला व एरवीही माझी आई मला कडूलिंबाच्या पाल्याचा कपभर रस प्यायला देत असे. हा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असे तिचे म्हणणे! तो कितीही कडू लागला तरी मी गटकन पिऊन टाकत असे. हाच वारसा आता पत्नीने सुरु ठेवला असून मी तो पिण्याचे काम मुकाटपणे करतो. लिंबाचा रस हा ऑल टाईम हिट मामला. मला कोणत्याही त्रतूत, कुणीही, कोणत्याही वेळी लिंबूपाणी, मध दिले तरी मला चालते.  बाकी आंबा, पपई, द्राक्षे, अंजीर, टरबुज, कलिंगड, संत्री, मोसंबी, चिकू, तुती, बोरे, सिताफळे, रामफळे, ताडगोळे असली फळे माझ्यासमोर केंव्हाही ठेवा.. काही मिनिटातच त्यांचा फडशा पडलेला दिसेल. चहा या आंग्लदेशीय तसेच कृत्रिम पेयाबद्दल मला तेवढीशी आस्था नाही. त्यात सकाळी खारी, टोस्ट, बिस्किट वा तत्सम पदार्थ बुडवून खाता येतात म्हणून मी तो घेतो एवढेच. सकाळचा चहा झाला की दिवसभरात मला कधीही चहा शक्यतो नकोसाच असतो. वाशीच्या मिनी सी शोअर येथे सचिन आंब्रे नावाचे एक गृहस्थ पूर्वी विविध पानांचे, फळांचे औषधी रस बनवून विकत असत व काहींना घरपोचही पुरवीत असत, याची या निमित्त मला आठवण येते व त्या रसांचाही मी पुरेपुर आस्वाद घेतल्याचे स्मरते.

   शहाळ्याचे पाणी, ताडी, निरा, शिंदी हेही या रससंप्रदायाचे अविभाज्य घटक आहेत. शहाळ्याचे पाणी आणि त्यातील नरम खोबऱ्याची मलई चाखणे म्हणजे निव्वळ स्वर्गीय सुख. निरा आता सर्वत्र मिळायची सोय असते. मुंबईहुन पुणे, अलिबाग, विरार, डहाणू कडे जाताना रस्तोरस्ती या निरा विकणाऱ्यांचे स्टॉल्स लागलेले दिसतील. मात्र अनेकदा यात भेसळीचे प्रमाण असल्याचेच दिसून येते. निरा दुपारनंतर प्यायला मजा येत नाही. बऱ्याच ठिकाणी निरेमध्ये साखर, पाणी आणि बर्फ टाकून ती पार मचूळ केलेली असते. जातिवंत निराप्रेमी ‘रसिक' असला ‘मिलावटका माल' लगेच ओळखतो. निरा केंद्रात काचेच्या ज्या ग्लासांत भरुन तुम्हाला निरा प्यायला देतात, ते धुण्याचा (?) विधी पाहिलात तर तसल्या ग्लासांना कधीही हात (किंवा ओठ!) लावायचे धाडस पुन्हा तुम्ही करणार नाही. त्यापेक्षा ती कागदी ग्लासातून प्यालेली बरी! मी अनेकदा अशी निरा घरुन पाण्याची रिकामी बाटली सोबत नेऊन त्यात भरुन आणली आहे, बऱ्याचदा त्यातच भरुन तिथेच निरा प्यायलो आहे. उन्हाळ्यातील अनेक विकारांवर ही निरा गुणकारी असते. शिंदी प्यायचे फार भाग्य मला लाभले नाही. मात्र ताडीचा आस्वाद वेळोवेळी घेतला आहे. कल्याणला आम्ही ज्या खेड्यात राहिलो तेथील अनेकांची ताडाची झाडे असल्याने ताडी भरपूर मिळत असे. सकाळी सकाळी ताडाच्या झाडाखाली जाऊन तेथेच ताडी पिण्याचाही मी अनुभव घेतला आहे. पनवेल-माथेरान रस्त्यावर आकुर्ली गावात आजही अशी झाडावरुन काढलेली ताडी सकाळी मिळते. उरण, पनवेल तालुक्यातही अनेक ठिकाणी ती उपलब्ध होते. ही सारी नैसर्गिक, प्राकृतिक पेये, फळांचे रस तुमच्या आरोग्यास आणखी बळ पुरवणारेच आहेत. घोर दुदैव हे की त्यांना लोकमान्यता, राजमान्यता, प्रतिष्ठा मिळाली नाही. ज्याच्या अतिप्राशनाने अंतिमतः तुमच्या शरीराचे नुकसानच होते त्या दारुला, वाईनला मात्र ती मिळाली. त्यासाठी विविध उठाठेवी करुन, रांगा लावून, प्रसंगी मारामाऱ्या करुन लोक अशा घातक पेयांना कवटाळू लागल्याचे दिसत आहे. शेवटी काय..पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना..!!

-  राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

किती बोलाल?