मुशाफिरी : जत्रांचे दिवस

जत्रांचे दिवस

   जत्रेत भटकायला, तिची मौज घ्यायला आवडत नाही अशा व्यक्ती विरळाच! या जत्रेत आपल्याला आपले काळाच्या ओघात सांडलेले-हरवलेले बालपण सापडते. त्यावेळी अनेक कारणांनी तिथे काहींना काही विकत घेता येत नव्हते, मनात असून अनेक गोष्टी करायच्या राहुन गेलेल्या असतात. आता ते करणे शक्य  आहे..पण ते करण्याची वेळ आणि वय मात्र निघून गेले आहे. देवदर्शनानंतर किंवा आधी अशा जत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविधांगी मनोरंजनासारखी बाब अन्यत्र कुठेही सापडणार नाही.

   २२ मार्च रोजीच्या गुढीपाडव्याने चैत्री मासारंभ झाला आहे. याच दिवशी शालिवाहन शके १९४५ ला सुध्दा प्रारंभ झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुढीपाडव्यास श्री महालक्ष्मी पालखी यात्रा निघते. अनेकांचा यात्रा आणि जत्रा या संकल्पना समजून घेण्यात गोंधळ उडू शकतो. यात्रा म्हणजे एकत्र येऊन केलेला प्रवास. एका ठिकाणाहुन निघुन यात्रा दुसऱ्या ठिकाणी पोहचते. तर जत्रा ही (सर्वसाधारणपणे धार्मिक मान्यतेच्या) एकाच जागी भरते. देवदर्शनासह मग तिथे  खेळ, खाऊ, मनोरंजनाची तात्पुरती केंद्रे, प्रसादालये हे सारे असते.

   आगरी आणि कोळी हे कष्टकरी समाज मूलनिवासी असलेल्या मुंबईत अनेक जुनी गावे होती. परळ, भोईवाडा, माहिम, वरळी, शिवडी, वडाळा, आणिक, चेंबूर, देवनार, कोपरी, मंडाले, मुलुंड, पवई, तुर्भे,  वाशी, घाटले, वाडवली, नाहुर, कांजूर, भांडुप, माहुल, चकाला, दांडा, कांदिवली, मढ, मनोरी, ओशिवरा, वर्सोवा, विलेपार्ले, आरे, बोरिवली, दिंडोशी, गोराई, कान्हेरी, मालाड, मालवणी, मनोरी अशी स्थानिक आगरी-कोळी मूलनिवासींची सुमारे ८७ गावे मुंबापुरीत आहेत. यापैकी विविध गावांमध्ये स्थानिक ग्रामदेवतांच्या जत्रा भरतात. देवीची पालखी निघते.  एकूणच जत्रा म्हणजे भक्तांसाठी, तरुण-तरुणींसाठी, विवाहितांसाठी, बच्चे कंपनीसाठी एक आनंद सोहळाच असतो. येत्या २७ तारखेस वाशी, नवी मुंबई येथील जुहु गावची जत्रा आहे. २८ मार्च रोजी आगरी-कोळी समाजांची आराध्य देवता एकविरा (कार्ले, मळवली-लोणावळा) देवीचा पालखी सोहळा आहे. ६ एप्रिल (चैत्र पौर्णिमा) या दिवशी हनुमान जयंतीला कल्याण तालुवयातील तीसगाव येथील गावदेवीची जत्रा भरते.

   यापैकी तीसगावची जत्रा माझ्या चांगलीच स्मरणात राहिली आहे. कारण माझे बालपण ज्या कल्याण पूर्वेकडील गावात  गेले..ते गाव व तीसगाव यांच्यात पायी केवळ वीस मिनिटांचे अंतर असल्याने त्या जत्रेसाठी वडील आम्हाला घेऊन जात. तेथील आकाश पाळणे, झोके मौतका कुआ, विविध खेळ तसेच मिठाया, प्रसाद, भजी-वडे यांचा तो दरवळणारा सुगंध बेभान करीत असे. भिंगऱ्या, बाईस्कोप, अनेक प्रकारची खेळणी तेथील तात्पुरत्या दुकानांमधून विक्रीस ठेवलेली असत. थोडक्यात माझ्या बालमनाला भुरळ घालणाऱ्या अनेक बाबी तेथे मौजुद असत.  तो सारा काळ १९६८-६९ व त्यानंतरच्या दहा-पंधरा वर्षांचा! याच्याच आसपासचा काळ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुरेल गाण्यांचे सुवर्णयुग म्हणून ओळखला गेला आहे. मला आठवते ‘मेरा गाव मेरा देश' या धर्मेंद्र, आशा पारेख, विनोद खन्ना अभिनित १९७१ साली रजतपटावर झळकलेल्या राज खोसला दिग्दर्शित चित्रपटात असेच एक जत्रेतील गाणे लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार द्वयीेने अतिशय सुरेखरित्या संगीतबध्द केले होते. ‘हाय शरमाऊ किसी किसी को बताऊ ऐसे कैसे मै सुनाऊ सबको अपनी प्रेम कहानियां..' हे ते गाणे..! ती जत्रा, ती खेळणी, ते आकाश पाळणे, ग्रामीण गर्दी, अंगावर काळी घोंगडी पांघरुन आलेला डाकू जब्बर (विनोद खन्ना) आणि त्याचा ठावठिकाणा गाण्यातून वर्णिणारी मुन्नी (लक्ष्मी छाया). ते ऐकून त्याचा मागोवा घेणारा अजित (धर्मेंद्र) आणि पोलीस असा सारा मामला व्यवस्थित जमून आला होता. दुसरे असेच जत्रेचे गाजलेले गाणे म्हणजे १९७२ साली पडद्यावर आलेल्या ‘राजा जानी' या मोहन सैगल दिग्दर्शित चित्रपटातील. ‘दुनिया का मेला मेलेमे लडकी लडकी अकेली शन्नो नाम उसका..' पुन्हा संगीतकार द्वयी लक्ष्मीकांत प्यारेलाल. पु्‌न्हा पडद्यावर धर्मेंद्र..पण यावेळी सोबतीला हेमा मालिनी. याही गाण्यात सर्व जत्राच व्यवस्थित उभी करण्यात दिग्दर्शकाला पुरेपुर यश आले आहे. जत्रेवर चित्रित केलेली गाणी या दोन्ही सिनेमांच्या आधी आली व नंतरही येत राहिली. पण या दोन्ही गाण्यांची बातच न्यारी. दोन्ही गाणी लता मंगेशकर यांनीच गायिली आहेत व दोन्ही गीतांचे रचनाकार आनंद बख्शी हेच होते हे विशेष. या सर्वांना तत्कालिन प्रेक्षकांची नस बरोबर सापडली होती हेच यातून दिसून आले.

   रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण मार्गावर असणाऱ्या साजगाव येथे कार्तिक शुध्द एकादशीला प्रारंभ होऊन जवळपास पंधरा दिवस चालणारी जत्रा ही ‘बोंबल्या विठोबाची जत्रा' या नावाने पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्या काळी..साडेतीनशे वर्षांपूर्वी मिरचीचा व्यवसाय करीत असत. विकलेल्या मिरचीच्या पैशांची वसुली करण्यासाठी ते साजगावच्या डोंगरावर येऊन बोंब अर्थात हाक मारीत असत अशी आख्यायिका सांगण्यात येते. यावरुन या जत्रेला ‘बोंबल्या विठोबाची जत्रा' असे नाव पडले आहे. तेथे जत्रेनिमित्त जनावरांचाही बाजार भरवला जातो. शेतीसाठी, जनावरांसाठी लागणाऱ्या अवजारेही तिथे विक्रीस ठेवली जात असल्याने  तेथे कृषिवल संस्कृतीचे पाईक मोठीच गर्दी कशी करतात हे मी पाहिले आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुवयात असणाऱ्या म्हसा या गावीही खांबलिंगेश्वर मंदिरातील शंकर देवाला केंद्रस्थानी ठेऊन म्हसोबा असे संबोधत पौष महिन्यात भरणारी जत्रा ‘म्हशाची जत्रा' म्हणूनच प्रसिध्द आहे. मोठ्या मोकळ्या जागेवर भरणारा गुरांचा बाजार हे या जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य सांगितले जाते. गुरे, शेतीची अवजारे यासोबतच येथे घोंगडी, ब्लँकेट, चादरी, भांडी, खेळणी, सतरंज्या, टोपल्या मिळत असल्याने कष्टकरी, मेहनती, शेतकरी वर्गाची मोठी गर्दी या जत्रेसाठी उसळत असते. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यांप्रमाणेच शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर लोक येथे जत्रेनिमित्त येतात. सातारा जिल्ह्याच्या वाई भागात भरणाऱ्या बावधनच्या यात्रेचे मुख्य आकर्षण तेथील ‘बगाड' हे असते. २ ते ३ वजनी बगाडाला दगडी चाके, कणा, बुट्टया, शीड आणि त्यावर टांगलेला बगाड्या असे स्वरुप असते व ते पहायला तीन-चार लाख लोक गर्दी करतात. बारा बैल हे बगाड ओढण्यासाठी असतात व हे बगाड ज्या शेतांतून जाते तिथे पिक जोमाने येते अशी श्रध्दा आहे.

   या जत्रा प्रकाराने अनेक सिनेमे, कथा, कादंबऱ्यांना विषय पुरवले आहेत. मराठीत जत्रा आणि हिंदीत मेला नावाचे सिनेमे येऊन गेले आहेत. ‘लॉस्ट ॲण्ड फाऊण्ड' फॉर्मुला जत्रेनिमित्त दाखवला तर सिनेमा हिट झालाच म्हणून समजा. मनोरंजन, करमणुकीसाठी जवळपास चित्रपटगृहे नसण्याचा तो काळ. रेडिओ अधिककरुन ऐकला जाई. त्यामुळे जवळपास कुठे जत्रा आली व त्यानिमित्त लोकनाट्य, तमाशे पहायची संधी मिळाली तर लोक ती सोडत नसत. ‘जोतिबाचा नवस' या १९७५ साली झळकलेल्या मराठी चित्रपटात जयवंत कुलकर्णी यांनी गायिलेले एक गीत आहे..‘ही दुनिया हाय एक जत्रा हौशे गवशे नवशे सतरा.. ' आता शहरी हौसे, गवशे, नवशे लोकांना ग्रामीण भागातील जत्रेच्या ठिकाणीच जायची आवश्यकता नाही की काय असे होऊन बसले. कारण शहरात ॲम्युजमेंट पार्क, मॉल्स, मल्टी स्क्रीन सिनेमागृहे सुरु झाली. ‘करलो दुनिया मुठ्ठीमे' अवतरला..आणि सारे जगच जणू तळहातावरच्या टच स्क्रीन वर आले. नाटक, सिनेमा, मालिका, पोर्नोग्राफी, गाणी, रिॲलिटी शो, लोकनाट्ये, तमाशे, कॅबरे, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, पुराणे, मौलिक साहित्य, विविध खेळांचे सामने असे सारेच तिथे उपलब्ध असते.

   ..पण ते सारे आभासी. वास्तव नव्हे! नवजात बालकाला भूक लागल्यावर त्याला आईचे दूधच लागते, आईचा फोटो किंवा व्हिडिओ तिथे त्याच्यासाठी अजिबातच उपयोगाचा नसतो. आयुष्याचेही तसेच आहे. आयुष्याला भिडण्यासाठी थेट मैदानातच उतरावे लागते. सोशल मिडियाची आभासी दुनिया फारतर दुरुन मार्ग दाखवील, पण ज्याचा रस्ता त्यानेच शोधायचा आहे. आपला देश, आपले राज्य, आपला तालुका, आपली माणसं, आपल्यांची मानसिकता, लोकांच्या काळ्या-पांढऱ्या छटा हे सारे जवळून पहायचे असेल तर कोणत्याही जत्रेत उगाचच, निर्हेतुकपणे फेरफटका मारा. भोळे भाविक, नवस फेडायला आलेले, लग्नानंतर पहिल्यांदाच नववधू-वराला गावदेवीच्या दर्शनासाठी घेऊन येणारे कुटुंबिय, नाटक-सिनेमे-ॲम्युजमेंट पार्कची चैन परवडत नाही म्हणून कुटुंब कबिल्यासह जत्रा अनुभवणारे, सुंदर मुली पहायला मिळतात..गर्दीचा फायदा घेऊन त्यांना धक्काबुक्की करता येते या विचाराचे काही आंबटशौकिन लोक, तसेच चतुर विक्रेते, भेसळवाले-मिलावटका मालवाले दुकानदार,  पाकिटमार, सोनसाखळी चोर, दर्शन लवकर मिळावे म्हणून ‘अंगात' आणणारे, बाहेरच्या विक्रेत्यांना दादागिरी दाखवून लुबाडणारे काही स्थानिक गावगुंड, त्यांना मूक साथ देणारे कायद्याचे  काही रखवालदार असे सारे एकाच जागी सहज अनुभवता येईल.

- राजेंद्र घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : रस आणि ‘रसिक'