मुशाफिरी : पुरणपोळ्या आणि...मांडे

पुरणपोळ्या आणि...मांडे

   देशाच्या एका कोपऱ्यात बनणारे पदार्थ सर्वदूर मिळण्याची आता सोय असते. पुरणपोळी तर वर्षभर आणि कुठेही मिळू शकते. या पुरणपोळी परिवारातील ज्येष्ठ सदस्य म्हणजे खान्देशातील मांडे होत. त्यांचा उल्लेख संत ज्ञानेश्वरकाळातही आढळतो. रायगडातील पोपटी, सोलापूर-सातारा व अन्य काही ठिकाणचा हुरडा, नागपूरचे सावजी मटण जसे नाव मिळवून आहेत, तसाच लौकिक या मांड्यालाही प्राप्त झाला असून ‘मांड्याचे जेवण' प्रकाराला बहिणाबाई चौधरींच्या खान्देशात पुरेशी प्रतिष्ठाही लाभली आहे.

   ‘होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या xxवर बंदुकीची गोळी' असे आपल्यापैकी अनेकजण लहानपणापासून ऐकत आले आहेत. होळी ठीक आहे, त्यानिमित्त बनवली जाणारी पुरणाची पोळीही ठीक..पण गोळी मारायला त्या सायबाचाच ‘तो' प्रच्छन्न अवयव कशाला मध्ये घेतला हा प्रश्न पडतो. कदाचित भारतावर इंग्रज राजवट असण्याच्या काळात हे यमक जुळवले असावे व त्या गोऱ्या सायबाचा निषेध नोंदवण्यासाठी अशी रचना करण्यात आली असावी.

   गेल्याच महिन्यात होळी येऊन गेली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने या निमित्त एक विशेष उपक्रम राबवला गेला. ‘होळीमध्ये पुरणपोळी नैवेद्य किंवा तत्सम मौलिक साहित्य केवळ रुढीच्या नावाखाली जाळून राख करण्याऐवजी अशी पुरणपोळी आमच्याकडे द्या; आम्ही ती गरीब, गरजूंपर्यंत पोहचवू' हा तो उपक्रम. याची बातमी सोशल मिडियावर करावी म्हणून अंनिस नवी मुंबईचे श्री अशोक निकम यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्या प्रमाणे मी बातमी केली व तिला प्रचंड प्रतिसादही लाभला. सानपाडा येथील शिवसेनेचे (उबाठा गट)श्री बाबाजी इंदोरे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी अंनिसला या कामी सहकार्याचा हात पुढे केला. माझा आजवरचा अनुभव असे सांगतो की शिवसेना ही उजव्या, हिंदुत्ववादी विचारांची...आणि अंनिस म्हणजे विवेकवादी, वाईट परंपरांना छेद देणारी, विज्ञानवादी, पुरोगामी विचार मांडणारी, चमत्कार-भोंदूगिरी-बाबागिरी-जारणमारण-भुतप्रेताच्या अंधविश्वासांना विरोध करणारी संघटना. त्यामुळे अंनिसचे कार्यक्रम उधळून लावण्यात, त्याविरोधात फलकबाजी करण्यात (आधीची..न फूटलेली ) शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली आहे. पण यंदाच्या होळीनिमित्त हा ‘ट्रान्सफर सीन' घडला. अंनिसच्या मोजक्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या सानपाडा येथील कार्यकर्त्यांनी पुरेपुर सहकार्य केलं. श्रमशक्ती,  वाहनव्यवस्था, घरोघरी जाऊन पुरणपोळ्या जमा करणे, योग्य आकाराच्या खोक्यांमध्ये त्या साठवणे,  गरीब वस्त्यांमध्ये जाऊन त्या वितरीत करणे या साऱ्या कामी अंनिस व ठाकरे गटाचे कार्यकर्ते सोबतीने काम करत होते..हे सामाजिक अभिसरणाचे चित्र मला खूपच आशादायक वाटते. या निमित्त सुमारे ११०० पुरणपोळ्या होळीच्या आगीत भक्ष्यस्थानी पडून त्यांची केवळ राख होण्याऐवजी त्या गरीब, गरजूंच्या मुखात गेल्या. होळी, होलिका,  हुताशनी, हावलूबाय म्हणून जी कुणी देवता असेल तिने नक्कीच या पोळीदात्यांना व त्या पुरणपोळ्या त्यांच्या घरापर्यंत आणून देणाऱ्यांना भरभरुन आशीर्वादच दिले असतील.

   अलिकडे केवळ होळीलाच नव्हे, तर एरवीही पुरणपोळ्या बनवण्याचे व सेवनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र आताच्या अनेक महिला या अर्थार्जनाच्या कारणास्तव ‘कामकाजी' बनल्यामुळे त्यांना या पुरणपोळ्या बनवण्यामागच्या खटाटोपापासून वाचवण्यासाठी अन्य घटक पुढे सरसावले आहेत. विविध गावी, शहरांत महानगरांमधून पुरणपोळ्या या वर्षाच्या कोणत्याही त्रतूमध्ये उपलब्ध असतात. त्यातही डाळ पुरणपोळी, जाड पुरणपोळी, खोबऱ्याची पुरणपोळी, मुगडाळ पुरणपोळी, खजूर पुरणपोळी, खव्याची पुरणपोळी, शुगर फ्री पुरणपोळी, अननस पुरणपोळी, चॉकलेट पुरणपोळी, बदाम पुरणपोळी, ड्रायफ्रूट पुरणपोळी, अंजीर पुरणपोळी हे व याहुन अधिक प्रकार असून प्रति नग ३०/- रुपये ते प्रतिनग ७०/- रुपयांपर्यंत त्यांची किंमत असते. एवढेच नव्हे, तर जॅकफ्रूट पुरणपोळी, तीळ पुरणपोळी, स्पायसी पुरणपोळी, गुलकंद पुरणपोळी हेही आणखी प्रकार असतात..अशी माझ्या एका मित्राच्या पत्नीने  ही सारी पुरवलेली माहिती ऐकून मी चाट पडलो. मला स्वतःला दुकानातून आणलेली पुरणपोळी खाण्याची कधी वेळ आली नाही. कारण आई, बहिणी, पत्नी, सून यांच्यासह माझ्या माम्या, मावश्या, आत्या, वहिन्या, मेव्हण्यांच्या पत्नी, मित्रांच्या माता, मित्रांच्या पत्नी, माझ्या शाळकरी जीवनापासूनच्या मैत्रीणी यांनी ती बाजू भवकमपणे सांभाळून धरली होती, धरली आहे.

   या पुरणपोळी गटातीलच एक ज्येष्ठ सदस्य म्हणून मांडे या प्रकाराकडे पाहता येईल. जन्माने मी पक्का मुंबईकर. माझे पूर्वज रायगड जिल्ह्यातले. पंचवीस वर्षे माझे वास्तव्य कल्याणमध्ये व गेली सत्तावीस वर्षांहुन अधिक काळ मुवकाम पोष्ट नवी मुंबई. हा सारा भाग म्हणजे समुद्र, खाड्या, नद्या, खाजणे, खदानी, तलावांचा प्रदेश!  त्यामुळे भात, मीठ, मासे, अंडी, काेंबड्या, मळ्यातील ताज्या भाज्या, आंबे, जांभळे, कलिंगड, टरबुज, बोरे, सिताफळे, रामफळे, पेरू, तुती  यांच्यासह तत्सम उपज होणारे अन्नपदार्थ स्वाभाविकपणे येथील स्थानिकांच्या सेवनात येणारे! पुन्हा स्वयंपाकामध्ये गोडाधोडाऐवजी तिखटाचेच प्रमाण अधिक. त्यामुळे पुरणपोळी, मांडे बनवले जाणे, खाण्यात येणे, त्यांची आवड असणे तसे कमीच! मला आठवते..नाशिक हे मूळ गाव असलेल्या माझ्या एका शाळकरी मित्राकडून या मांड्याबद्दल मी सर्वप्रथम ऐकले व माझ्या आईला त्याबद्दल सांगितले. ही गोष्ट १९७५ च्या सुमाराची. माझी आई म्हणाली...‘त्याच्या आईला आपल्याकडे बोलावून घे. काय लागतील त्या वस्तू मी पुरवते. मांडे आपल्या घरी करायला सांगू या. म्हणजे त्याची सारी पाककृती मलाही नीट पाहता येईल.'  मांडे शेकण्यासाठी लागणारी मोठी खापरी घेऊन ती माऊली आमच्या घरी आली व अनेक तास खपून ते मांडे आम्हाला बनवून खायला घातले.

   यंदा फेब्रूवारी महिन्यात माझा मूळचा खान्देशी आणखी एक शाळकरी मित्र शरद ननावरे याच्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी या गावी भटकंती निमित्त गेलो असता, तिथे ताजे मटण कुठे मिळते हे शोधता शोधता एका ठिकाणी भट्टी, पिठाचे मोठ मोठे पांढरे शुभ्र गोळे, खापरी पहायला मिळाली. शरद म्हणाला..‘अरे हे मांड्यांसाठी लागणारे गोळे.'  तीस रुपये प्रति नग मिळणारे हे गोळे घरी आणून मांडे करता येतात. मात्र त्यासाठी मोठ्या घमेल्याच्या आकाराची खापरी हवी.

   ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणच्या पाच जिल्ह्यांमध्ये पाहुणा घरी आला आणि मटण, मासे यांचे सामीष भोजन त्याला यजमानाने खाऊ घातले नाही तर त्याचा योग्य तो पाहुणचार केलाच नाही, असा समज आहे. खान्देशात मांडे खाऊ घातले नाही म्हणजे पाहुणचार केला नाही असे समजतात. मांड्यांसाठी विशिष्ट प्रतिच्या गव्हाचे पीठ दळून घेत त्यातील काेंडा वेगळा केला जातो. मग ते भिजवून त्याचे मोठे गोळे केले जातात. यासाठी मैदा चालत नाही. त्यात पुरण मिसळले जाते. मग ते गोळे लाटून हातावर घेऊन त्याला आणखी मोठा आकार दिला जातो. ही कृती काहीशी रुमाली रोटी बनवण्यासारखी आहे. पण रुमाली रोटीसारखे मांडे हवेत उडवण्याचे आणि मग झेलण्याचे नाटक इथे केले जात नाही. ते गांभीर्यपूर्वक बनवून मोठ्या खापरीवर भाजले जातात. त्यांना तूप लावले जात नाही. पाणी घातले जात नसल्याने मांडे दोन ते तीन दिवस टिकतात. मांड्यांसोबत (शक्यतो) आमरस दिला जातो. काही ठिकाणी गुळवण, काही ठिकाणी दूधही सोबतीला घेतात. त्यात कुस्करुन काही लोक मांडे खातात. भजी, आमटी, कुरडया, बटाट्याची तसेच काळ्या वाटाण्याची भाजीही साथीला असते. मांड्याला खापरपोळी असेही नाव आहे. ‘मांड्याचे जेवण' असे प्रतिष्ठीत नाव या भोजन प्रकाराला आहे. खान्देशचे मूलनिवासी असलेल्या माझ्या मित्र-मैत्रीणींच्या खान्देशातील घरी जाऊन मांडी घालून बसत या भोजनाचा मी यथेच्छ आस्वाद घेतला आहे.  संत ज्ञानेश्वर यांच्या काळात विसाजी पंतांनी ज्ञानेश्वर व त्यांच्या साऱ्या भावंडांना छळल्याचा उल्लेख आहे. त्या काळात ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली होती. पण खलपुरुष विसाजी पंतांनी खापरी विकणाऱ्याला दम भरल्याने मुवताईंना मांडे भाजण्यासाठी खापरी मिळाली नव्हती. तेंव्हा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या सामर्थ्याने आपली पाठ एवढी तापवली की त्यावर मांडे सहज भाजले जावे. यातून निवृत्तीनाथांची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली असा उल्लेख आहे. त्यातील चमत्कार, दैवी योग, योगसामर्थ्य वगैरे बाबींवर आजच्या विज्ञानयुगात एखाद्याचा भले विश्वास बसणार नाही; पण मांडे या खाद्यप्रकाराला इसवी सन १२७५ च्या आधीपासून लोकमान्यता आहे एवढे मात्र निश्चित! प्रामुख्याने खान्देशात लोकप्रिय असलेले मांडे पार छत्रपती संभाजी महाराज नगरातील पैठणनिवासी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना आवडत होते ही  बाब मांड्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.

   दर्दी खाद्यरसिक, चिकित्सक महिला मांड्याचा अस्सलपणा लागलीच जाणतात. कशात काेंडा मिसळला आहे, कोणते मांडे अधिक करपवले आहेत, कोणत्या मांड्याची चव बिघडली आहे, ते त्यांना लगेच समजते. पण ज्यांना मांडे खायला नि पचवायला जमते, त्यांनाच जमते. इतरांनी उगाचच अतिखादाडीचा प्रयोग केल्यास पोट बिघडून प्रसाधनगृहाच्या दिशेने धावाधाव करावी लागते हेही ध्यानी असू द्यावे. आम्हा मांसाहारप्रेमींत चिंबोरी, कोळंबी, शेवंड, करपाल, बांगडे, चिकन हे पदार्थ गरम मानले जातात. ज्यांना ते पचवणे जमते त्यांनी त्याचा जमके आस्वाद घ्यावा. बाकीच्यांनी ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे सूत्र पक्के ध्यानी बाळगावे हेच उत्तम!  

- राजेंद्र घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : जत्रांचे दिवस