मुशाफिरी : एकेक करुन हात सुटताना...!

एकेक करुन हात सुटताना...!

   आपल्या आयुष्यात कुणी यावे, कधी यावे, काय द्यावे, काय न्यावे हेही आपल्या हातात नसते. चांगली माणसे आयुष्यात येतात..आपले जगणे सुगंधित करतात आणि अलगद बाजूला होतात. काळ आपली खेळी खेळत असतो. आणि अचानक समजते...अरे तो हा गेला...अरे तो गेला. असे कुणाचे जग सोडून जाणे म्हणजे केवळ तो त्यांचा मृत्यु नसतो. तो अल्पांशाने आपलाही मृत्युच असतो. त्यांच्या मृत्युने काळाचा एक तुकडाच आपल्या आयुष्यातून ओरबाडून नेलेला असतो.

   एका भल्या सकाळी माझे मित्र श्री विवेकानंद कानेटकर यांचा टिटवाळ्याहून मला फोन आला. १९८५ ते २००१ पर्यंत आम्ही नेरुळच्या लंडन पिल्सनर कंपनीत एकत्र काम केले होते. त्यावेळी माझ्या नियुक्ती पत्रावर ज्या ‘मॅनेजर : पर्सोनेल ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन' या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व्यक्तीची स्वाक्षरी होती त्या श्री. श्रीरंग सुनंद साने ह्यांनी इच्छा व्यक्त केली होती की आम्ही सारे एकमेकांपासून विविध कारणांनी दूर गेल्यानंतर बराच काळ भेट झाली नव्हती म्हणून श्री साने खास पुण्याहुन नवी मुंबईत येऊन आम्हाला पार्टी देणार आहेत म्हणून! त्या पार्टीसाठी आमचे तत्कालिन निवडक सहकारी जमवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. पत्रकार म्हणून गोतावळा मोठा व जुन्यात जुन्या मित्र-मैत्रीणींना शोधून त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा माझा छंदच असल्याने यासाठी माझी निवड झाली असावी.

     माझ्या पध्दतीने मी सहकाऱ्यांशी संपर्क साधला व श्री. साने यांना सांगून ती नावे निश्चित केली. भेटायचे ठिकाण सीबीडी-बेलापूर मधील कोकण भवन परिसर ठरले. आम्ही सारे जण तिथे जमलो. महेश लंच होम हे ठिकाण तेथेच उभ्या उभ्या निश्चित झाले आणि दोन कार भरुन आम्ही तिकडे कूच केले. मग कोण काय करतंय, कुणाचं काय चाललंय याबद्दल प्रेमळ चौकशी झाली. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. श्री. साने यांनी कुणाला काय काय हवं ते मागवण्याची जबाबदारीही माझ्यावर टाकली. सामीष-निरामिष टेसदार पदार्थांचा आस्वाद घेत पार्टी पुढे सरकत होती. भरपूर फोटो काढले गेले. व्हाटस्‌ अप ग्रुप बनवून ॲडमिन म्हणून मी ते सारे फोटो सर्वांना शेअर करावे म्हणून श्री. साने आणि मंडळींचे मला फर्मान सुटले. आमच्यातला सवार्ंत ज्येष्ठ सदस्य ए.पी. डिसोझा वय वर्षे ७४..त्याही गडबडीत मला म्हणाला, ‘हे बघ..मी बरेच दिवस घरी आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांना सांगून एखाद्या को-ऑप. सोसायटीत किंवा इतर कुठे काही लेखनिकाचे वगैरे काम मिळेल तर बघ. घरी बसून कंटाळलोय. पुढच्या वर्षी २०२४ च्या फेब्रूवारीत मी पंच्याहत्तरीत प्रवेश करतोय. त्यानिमित्त मलाही तुम्हा साऱ्यांना पार्टी द्यायची आहे. त्याही वेळी आपले सारे जुने सहकारी जमा करण्याची जबाबदारी तुझीच! आज जे येऊ शकले नाहीत, त्यांनाही बोलव. मस्त एन्जॉय करु.'  मी माझ्या स्वभावाला अनुसरुन ‘हो' म्हटले. ही गोष्ट १९ फेब्रूवारीची.

   या गोष्टीला दिवस नऊ होत नाहीत तोच २८ फेब्रूवारीच्या सकाळी ग्रुपवर संदेश येऊन आदळला..की ए.पी.डिसोझा यांचे हृदयविकाराने निधन!. आम्ही सारे नखशिखान्त हादरलो. संदेश पाठवणाऱ्याने सारी खातरजमा केली असल्याने विश्वास  ठेवणे भागच होते.  सौम्य स्वभावाच्या, मितभाषी, तब्येतीनेही सुयोग्य असा  डिसोझा जो १९ तारखेला आमच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेत होता तो २८ तारखेला जगाचा निरोप घेणार आहे असे कुणी सांगितले असते तर तसे सांगणाऱ्याला आम्ही वेड्यात काढले असते. पण सत्य हे कल्पनेपेक्षाही दाहक असते ते असे!  लंडन पिल्सनर येथील माझ्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात मी त्याला कधी कुणावर ओरडताना, कुणाशी भांडताना तर सोडाच;  कुणावर साधे डोळेही वटारुन पाहताना बघितले नव्हते. त्या साऱ्या आठवणींचा पट त्याच्या निधनाची बातमी ऐकून डोळ्यांसमोर तरळला.

   अर्थात ही अशी माझ्या मित्रांनी मला दिलेली पहिलीच हुलकावणी नव्हे! मला आठवते...२०१६ साली माझा एक मित्र संजय गवळी हा कॅन्सरच्या दुखण्याने मृत्यू पावला. त्याच्या मृत्युनंतर आम्ही एस एस सी. १९७८ च्या बॅचचे  अनेकजण आणखी घट्टपणे जवळ आलो. २०१६ च्या डिसेंबर २६ डिसेंबरला लोणावळा येथे राहणाऱ्या आमच्या मित्राच्या घरी काही जणांनी एक दिवस मुवकामाला जाण्याचा बेत ठरला व तो प्रत्यक्षात उतरवला. तेथे जाऊन जेवण, गाणी यात त्या यजमान मित्रासह त्याच्या परिवारानेही सहभाग घेतला. आम्ही तेथे गेलेले सहा मित्र रात्री एकाच लांबलचक अंथरुणात झोपलो. आमच्यातलाच एकजण यानंतर चिरनिद्रा घेणार आहे याचा कुणाला अंदाज होता? २६ जानेवारी २०१७ रोजी म्हणजे आम्ही तेथे गेल्याला महिना होत नाही तोच आमचा दीपक पवार नावाचा मित्र जो लोणावळ्यात सोबत होता..त्याने या जगाचा निरोप घेतल्याचे दुःखद वृत्त मिळाले. तब्येतीने एकदम सडपातळ, पाहिल्यावर याला काही दुखणे असेल याची सुतराम कल्पनाही येणार नाही अशा दीपकला म्हणे किडनीविकाराचा त्रास होता..व त्यानेच त्याचा घात केला होता. यशवंत  हाही एस एस सीचाच सोबती. २०१७ साली पावसाळी सहलीसाठी आमच्यासोबत खोपोलीच्या धबधब्याखाली भिजताना साथीला होता. तोही त्यानंतर वर्षभरातच हृदयविकाराने गेला.

   उरणचे ज्येष्ठ लेखक श्री गजानन मोरेश्वर दर्णे हे लेखनविश्वातील एक सुपरिचित नाव. विविध दैनिके, साप्ताहिकांसह मुंबई आकाशवाणीवर त्यांच्या अनेक कथा प्रकाशित, प्रसारित करण्यात आल्या आहेत. मंडणगड (रत्नागिरी) येथील  स्नेह ज्योती अंध शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांचा व माझा परिचय होणे व माझी ब्रेल लिपित पुस्तके प्रकाशित होण्यामागचे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे श्री गजानन दर्णे होय. नव्वदी गाठलेल्या दर्णे यांना शेवटच्या दिवसात स्मृतिभंशाने गाठले होते. दिवसाच्या कोणत्याही वेळी ते कॉल करुन सांगत की, ‘कथा पाठवतो.'  पण कथा काही मला मिळत नसे. वयोमानपरत्वे त्यांनीही जगाचा निरोप गेल्या वर्षीच घेतला. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे तत्कालिन कार्यवाह श्री अरविंदकुमार शर्मा दादर पूर्वेस रहात असत. त्यांनी ‘अलबेला' फेम अभिनेते दिग्दर्शक मास्टर भगवानदादा यांच्याकडे लेखनिक म्हणूनही काम केले होते. त्यांच्या पत्नी सौ. आशा याही स्त्री मुवती संघटनेच्या सक्रिय सदस्य होत्या. दादरला गेलो की शर्माजींकडे माझी फेरी होत असे आणि माझे लेख, पत्र लोकसत्ता, म.टा. किंवा अन्य कोणत्या आघाडीच्या दैनिकात वाचले की शर्माजींचा फोन येणे हे ठरलेले. शर्मा दाम्पत्याचे जावई म्हणजे विख्यात अभिनेते सुनिल तावडे होय. तावडेंचा मुलगाही पुढे अभिनेता बनला. ‘त्या मंडळींचे शूटींग बघायला आपण नक्की जाऊ'  असे शर्माजी मला नेहमीच सांगत असत. पण तो दिवस काही आलाच नाही. शर्मांनीच या जगातून एविझट घेतली. ज्यांची शेकडो नव्हेत, तर हजारो पत्रं विविध वर्तमानपत्रांतून प्रसिध्द झाली व त्या पैकी एका खंडाचे प्रकाशन गोरेगाव येथील शाळेत माझ्या हस्ते करण्यात आले ते श्री. मधुकर भिकाजी ताटके हे माझे जुने स्नेही.  पत्नीच्या निधनानंतर काहीसे एकाकी झालेले श्री. ताटके डोंबिवली येथे रहात असत. पत्र फॅक्सने पाठवणे व लगेच वर्तमानपत्र कार्यालयात  फोन करुन ते व्यवस्थित आले आहे ना याची खात्री करणे याची ताटके यांना सवय. संघाचे संस्कार असलेले श्री. ताटके वेळ पाळणे, भाषा, शिस्त, सहकार्य या बाबतीत खूपच काटेकोर असल्याचे मी पाहिले आहे. हजार हा शब्द ते ‘सहस्त्र' म्हणून बोलत व तसाच लिहीत असत. मी चालवीत असलेल्या वर्तमानपत्राला देणगीदाखल पाच हजाराचा चेक एकदा त्यांनी माझ्या हाती सोपवला व ‘हा पाच सहस्त्राचा धनादेश लगेच अधिकोषात जमा करा'  असे सांगितल्याचे मला आजही ठळकपणे आठवते. असे सहस्त्रमोलाचे नव्हे, तर लक्ष लक्ष मोलाचे श्री ताटके यांनी अंतिम श्वास घेतला व त्यांचे निधनाचे वृत्त दै. महाराष्ट्र टाईम्समधून प्रसिध्द झाल्यानंतर मला समजले. त्यांना मूलबाळ नव्हते, त्यांची डोंबिवली येथील भाची त्यांची काळजी घेत असे एवढेच मला माहित होते.

   नवी मुंबईत घणसोलीचे ॲड जयराम म्हात्रे, माजी आरोग्य सभापती दीपक दगडू पाटील, माजी परिवहन सभापती सुरेश श्रीपत म्हात्रे या मंडळींशी माझे चांगले स्नेह संबंध जुळले होते. ही सारी मंडळी मितभाषी, सुस्वभावी, समोरच्याची अडचण समजून घेत त्याला मदतीचा हात पुढे करणारी होती, असे माझे निरीक्षण आहे. या तिघांनीही एकेक करुन हे जग अकाली सोडले व निजधामाची वाट धरली....आणि आता रोजी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे श्री शरद वर्तक यांनी आमचा हात सोडला. नेटके, नेमके, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशयाचे लिखाण करणाऱ्या, चित्रपट विश्वाची सैर घडवणारेही लेखन करणाऱ्या श्री वर्तक यांचा या संघाच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा राहिला आहे. वरवर धडधाकट वाटणारे वर्तक इतक्या तडकाफडकी आमच्यातून जातील असे वाटले नव्हते. पण जे आपल्याला वाटत नसते नेमके तेच आपल्या पुढ्यात येऊन ठाकते असा माझा आता अनुभव पक्का होत चालला आहे. कार्यालयीन वेळेच्या कचाट्यात सापडल्याने तसेच पूर्वनियोजित बाहेरगावच्या दौऱ्यामुळे मला वर्तकांच्या निधनानंतर संघाने ठेवलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही. पण म्हणून त्या वेदनेमागची तीव्रता थोडीच कमी होते? जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्यात येऊन आपले काम चोखपणे बजावत अलगद अलविदा करणाऱ्या या सर्व सहृदांच्या स्मृतीस माझे भावपूर्ण अभिवादन.

-  राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

Read Next

मुशाफिरी : पुरणपोळ्या आणि...मांडे