मुशाफिरी : निमित्त.. आंतरराष्ट्रीय महिला दिन

निमित्त.. आंतरराष्ट्रीय महिला दिन

   आंतरराष्टीय महिला दिन काय असतो, का साजरा होतो, महिलांना समान हक्क, समान कामासाठी समान वेतन, संपत्तीतील महिलांचे अधिकार, तिला घरी-कार्यालयात दिली जाणारी वागणूक वगैरे गोष्टींबद्दल फारशी माहिती असण्याआधीपासूनच आपल्याकडील काही समाजांतून घरातील महिलांचा मान राखण्याची पध्दत होती, आजही आहे. आजी, मोठी आई (मोठी काकी), धाकटी आई (धाकटी काकी) ही संबोधने यामागची भावना स्पष्ट करण्यास पुरेशी आहेत.

   भावाकडे गेलो होतो. त्याला त्याची पत्नीने बाजारातून काही आणायला सांगत होती.  मग तो आणि त्याच्या मोटारसायकलवर मागे बसून मी असे दोघेजण बाजाराकडे निघणार इतवयात त्याच्या मुलीने मागून आवाज दिला..‘बाबाss..'

भाऊ म्हणाला, ‘काय गं?' तर ती म्हणाली, ‘काही नाही, जपून जा..'

तो म्हणाला ‘हो..व्यवस्थित जाईन, तू निर्धास्त रहा.'

बाजारातून परत आल्यावर त्याची पत्नी मला म्हणाली..‘कळलं..? यासाठी मुलगी असायला हवी.'

   दहा वर्षांपूर्वीचा हा प्रसंग मला आजही ठळकपणे आठवतो. तो भाऊ सहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला. ती मुलगीही एम बी बी एस झाली. त्यानंतर तिचे लग्न झाले व आता ती एम डी करतेय. आम्ही एकाच मुलावर थांबल्याने आम्हाला दुसरे अपत्य नाही. त्यामुळे मुलीचा बाप होण्याचा अनुभव नाही. मुलीला लहानाचे मोठे करतानाचा अनुभव, तिचे शिक्षण, तिचे लाड, तिचे करिअर, तिच्यामुळे आपोआप पालकांना येणारे ताणतणाव, तिच्या लग्नाची चिंता, तिच्या लग्नानंतर तिचे कसे होईल याचा अप्रत्यक्ष दबाब यातले मला थेटपणे काहीच माहित नाही; भावाबहिणींच्या-मित्र-मैत्रीणींच्या-मेव्हणे मंडळींच्या मुलींना माया लावण्यात आमचे आयुष्य सरत आले. मित्राच्या मुलीला सून म्हणून स्वीकारल्या नंतर आम्ही उभयता तिलाच मुलगी मानतो. मुलीचे प्रेम काय असते हे मी जागोजागी पहात आलो आहे. माझी आई मला सांगायची..‘एखादा बाप जेंव्हा मरतो ना..तेंव्हा त्याच्या मरणाची खबर ऐकून पार वेशीवरुन त्या बाबाच्या नावे टाहो फोडत मुलगी धावत त्याच्या प्रेताजवळ येते आणि बाबाs s म्हणत हंबरडा फोडते तेंंव्हा त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे खुले होतात.'

   माझ्या आईच्या सांगण्यातील ग्रामीण, प्राचीन, भावनिक संदर्भ काहीही असला तरी मला वाटते मुलगी आणि तिचा पिता यांच्यातील अनुबंध दर्शवण्यासाठी तो पुरेसा असावा. सालाबाद प्रमाणे यंदाही ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन येत आहे. त्यानिमित्ताने आयुष्य सुखकर करणाऱ्या काही महिलांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी घेतलीच पाहिजे. आईबद्दल काय लिहावे आणि किती लिहावे? आपल्या साऱ्यांच्या आयुष्यात येणारी किंवा आपल्या साऱ्यांना जिच्यामुळे आयुष्य मिळते ती पहिलीच एकमेव महिला म्हणजे आई. तिच्याबद्दल लिहीले जात नाही असा कोणताही दिवस नसावा. ८ मार्च हा तिच्यासह अन्य साऱ्या महिलांसाठीही आहे. मला आत्यांचेही प्रेम खूप लाभले. करिअरच्या मागे लागणे, विभक्त कुटुंबे, स्वतःपुरतेच पाहण्याची वृत्ती, निवासासाठी फ्लॅट  पध्दतीचा सरसकट अंगीकार या व अशा अनेक कारणांमुळे गेल्या पंचवीस तीस वर्षात काका, मामा, आत्या, मावशी अशा विविध नात्यांचा काहीसा संकोच झाल्याचे माझे निरीक्षण आहे. पूर्वी नात्यात कुणाकडे लग्न, पूजा, बारसे, साखरपुडे असले काही कार्यक्रम असले की नातेवाईक  मंडळींचा मुक्काम त्या मंगल कार्य असणाऱ्या घरी हमखास पहायला मिळे. शाळा, वलास, प्रॅक्टिस, अभ्यास, जवळ आलेली परिक्षा, ड्युटी (सर्वसामान्य उच्चार दुटी) असली मामुली कारणे सांगून कुणी हे प्रसंग टाळीत नसत. माझी आत्या स्व.सौ. आनंदी भगत हिच्या घरी माझ्या बालपणीचा सर्वाधिक काळ गेला आहे. ती रहात असलेल्या कल्याणच्या टाटा कॅम्प येथे शनिवार, रविवार पडद्यावर चित्रपट दाखवले जात.  १९७०-७५ चा तो काळ. अनेक हिंदी सिनेमे मी तेथेच बघितले. बघता बघता झोप आली की आत्या मला मांडीवर घेत असे. तिच्या पाच मुलांत मी जणू सहावा समजून तिने मला अपार माया लावल्याची कृतज्ञ आठवण मला कायम असते. आणखी एक आत्या म्हणजे बदलापूरला राहणारी सिता आत्या! तिच्याकडे जाण्यासाठी मे महिना किंवा दिवाळीच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नसे.

   माम्या, मावश्या, बहिणी, आतेबहिणी, मावसबहिणी, मामेबहिणी, भावजया, मित्रांच्या पत्नी या साऱ्या महिला मंडळींनी माझे करण्यात कसलीच कसूर ठेवली नव्हती. आम्ही मुंबईत डोंगरी येथे रहात असताना मला आठवते..माझ्या आईची एक आत्या तेथील बाजारात भाजी-फळे विकत असे. आम्ही तिच्या दुकानात गेलो की माझ्या हातावर ती फणसाचे गरे ठेवी. कधी ताडगोळे देई. पेण तालुका हे माझे आजोळ. तेथील डोलवी या गावात माझी एक मावशी रहात असे. तर मोठी मावशी मुंबईत डोंगरी येथे. दोन्ही मावश्यांकडे दिवसाच्या कोणत्याही वेळी जा..जेवायला घातल्याशिवाय कधीच सोडले जात नसे. डोलवीच्या मावशीचा आवाज तर अतिशय मृदु आणि मायाभरला. २००८ साली ती वारली. तेंव्हा ‘माय जगो आणि मावशीही' हा लेख मी याच मुशाफिरी लेखमालेतून लिहिला होता. तो रत्नागिरीच्या मंडणगड येथे असणाऱ्या स्नेह ज्योती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांच्या हाती लागला आणि त्यांनी त्या लेखाचे ब्रेल रुपांतर करुन मावशीबद्दल भाच्याच्या भावना काय असतात ते अंध मुलांनाही वाचता येण्याची सोय केली. त्यांनीच माझी आजवर वीस पुस्तके ब्रेल लिपीत रुपांतरीत केली आहेत. २००८ पासून सेनगुप्ता बाईंशी माझा निकटचा स्नेह जुळला. माझ्या आईचे नाव प्रतिभा व सेनगुप्ता बाईही प्रतिभाच! त्यामुळे मी त्यांच्यात माझ्या आईला पाहात असे. कुणाला वाटेल की बंगाली महिलेला मराठी कसे एवढे जमत असेल म्हणून! त्यांच्या माहितीसाठी सांगतो..माझ्या पूर्वजांचे गाव असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे या प्रतिभा बाईंचे वडील शिक्षक होते. त्यांचे नाव यशवंत किनरे. म्हणजे अस्सल मराठी माणूस. त्यांच्या मुलींनी आपल्या आजीच्या नावे असलेल्या जमिनीवर ही अंधशाळा उभारली व २००३ पासून गेली वीस वर्षे ती शाळा त्या चालवीत आहेत. यात त्यांना त्यांच्या सर्व बहीणींची सक्रिय साथ आहे. त्या साऱ्या महिलांना माझा त्रिवार सलाम!

   नवी मुंबईतील करावे गावचे रहिवासी व मुशाफिरी स्तंभाचे नियमित वाचक प्रवीण म्हात्रे यांनी मला कळवले की ‘तुमच्या लिखाणातून आई, वडील, बहिणी यांचा नेहमी उल्लेख होतो, तो मला भावतो.' यावर माझे म्हणणे असे की ज्यांनी आपल्याला हे जीवन दिले व ज्या बहिणी आपल्याला भल्याबुऱ्या प्रसंगात साथसंगत करीत असतात, त्यांचे उल्लेख तर येणारच की! भारतात आंतरराष्ट्रीय महिला दिन १९७७ नंतर नियमितपणे साजरा व्हायला सुरुवात झाली. तो दिन काय असतो, कशासाठी साजरा होतो, महिलांना समान हवक, समान कामासाठी समान वेतन, संपत्तीतील महिलांचे अधिकार, तिला घरात, कार्यालयात दिली जाणारी वागणूक वगैरे वगैरे बाबींबद्दल फारशी माहिती असण्याआधीपासूनच आपल्याकडील काही समाजांतून घरातील महिलांचा मान राखण्याची पध्दत होती, आजही आहे. आजी, मोठी आई (मोठी काकी), आई, धाकटी आई (धाकटी काकी) ही संबोधनेच यामागची भावना स्पष्ट करण्यास पुरेशी आहेत. घरातील ज्येष्ठ महिलेच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली घरातील विविध समारंभाचे आयोजन केले जाते, अशी कित्येक घरे आजही माझ्या पाहण्यात आहेत. पति गमावलेल्या महिला, त्यांना दिली जाणारी वागणूक, हळदीकुंकू कार्यक्रमातील त्यांचे स्थान हे विषय मला नेहमी बेचैन करणारे व त्यामुळे त्यावर सतत लिखाण करीत राहण्याचे बनून राहिले आहेत. पति गमावलेल्या पाच महिलांच्या हस्ते माझ्या मालकीच्या साप्ताहिक वार्तादीपच्या वर्धापनदिन कार्यक्रमात दीप प्रज्वलन केले व त्या पाचही महिलांचा जाहिर सत्कार साडीचोळी देऊन करण्याची संधी घेतली होती. ह्याची प्रेरणा मला 'सावित्री मंच नवी मुंबई' या संस्थेच्या एका कार्यक्रमातून मिळाली होती. यानंतर मग ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील हे त्यांच्या कलाश्रम संस्थेच्या वतीने ‘स्वबळ हळदी कुंकू' कार्यक्रम मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरामधील पु ल देशपांडे सभागृहात आयोजित करुन पति गमावल्यानंतरही खंबीरपणे परिस्थितीशी मुकाबला करत संसाराचा गाडा समर्थपणे पुढे नेणाऱ्या महिलांचा सत्कार व त्यांना रोख मदत करण्याचा उपक्रम यशस्विपणे राबवीत आहेत. त्याही कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेत्री वर्षा उसगावकर हिच्या सोबतीने पाहुणा म्हणून हे सत्कार करता आल्याचा मला विशेष आनंद आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त परिचयातील महिलांना शुभेच्छा संदेश व विविध चित्रे व्हाट्‌स अप, फेसबुकवर पाठवण्याबरोबरच प्रत्यक्षात असे काही करता येण्याचे समाधान शब्दांच्या पलिकडले आहे.

   अशा विविध वयोगटातील नातेवाईक महिलांप्रमाणेच वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेताना लाभलेल्या मैत्रीणी याही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतात. आमच्यासारख्यांचे माध्यमिक शिक्षण झाले (१९७२-१९७८) त्या काळात वर्गातल्या मुलींशी तितकेसे जवळीकीचे नाते प्रस्थापित होत नसे. आमच्या वर्गातील कुठल्याही मुलाचा वर्गातील (किंवा शाळेतील) कुठल्याही मुलीशी प्रेम विवाह झाला नाही.  पुढे महाविद्यालयीन जीवनात हे चित्र बदलले. अनेक महाविद्यालयीन मित्र-मैत्रीणींच्या प्रेम विवाहा करिता त्यांच्या आईवडिलांकडून परवानगी मिळवण्यासाठी मला पुढे केले जाई व अशी शिष्टाई मी अनेकदा केली आहे. शाळा व कॉलेजातील अनेक मैत्रीणींशी आजही सुमारे पन्नास वर्षे उलटल्यावरही आमचा संपर्क राहिला आहे. त्यांना आम्ही काही मित्र भेटल्यावर ए मंगे, ए पमे, ए लते, ए नले अशा नावांनी जेंव्हा त्यांचा मुलगा, मुलगी, सूना, जावई, नातवंडे यांच्यासमोर बिनधास्त हाका मारतो तेव्हा या घरच्या सदस्यांच्या  चेहऱ्यावरील आश्चर्य लपून रहात नाही.

   आंतरराष्ट्रीय महिला दिन असो, रक्षा बंधन असो, दिवाळी पाडवा असो, भाऊबीज असो, वसंत पंचमी असो, होळी असो की व्हॅलेन्टाईन डे असो..हे सारे निमित्त आहेत आपल्या आयुष्यात आलेल्या व आपले जीवन सुकर, सुगम, सुसह्य करणाऱ्या महिलांचा योग्य तो मान सन्मान राखण्याचे. हा मान राखण्यासाठी असे कोणते दिनविशेषच हवेत अशातला भाग नाही. नेहमीच्या जीवनात, रोजही ते करता येण्यासारखे आहे. येणारा होलिकोत्सव व आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तमाम महिलावर्गाला हार्दिक शुभेच्छा.

- राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

Read Next

मुशाफिरी : एकेक करुन हात सुटताना...!