टॅबलॅब द्वारे विद्यार्थी जिज्ञासा पुर्ततेतून स्वयंपूर्ण बनणार -राजेश नार्वेकर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील २ उपक्रमांचा महापालिका आयुवतांच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबई ः बदलत्या काळानुसार शिक्षण पध्दतीतही आधुनिक बदल होत असून यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थी आघाडीवर असावेत यादृष्टीने आंबेडकर नगर, रबाले येथील महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात आयवा या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या टॅबलॅब तसेच मनोरंजनातून शिक्षण अशी अनोखी संकल्पना राबवित निर्माण करण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी झोन अशा दोन आगळ्या वेगळ्या उपक्रमांचा शुभारंभ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, हायवा कंपनीचे एमडी पंकज कपूर, कंपनीचे पदाधिकारी प्रशांत मानकामे व सुदेश धाबेकर, कार्यकारी अभियंता मदन वाघचौरे, वास्तुविशारद रेश्मा साठे, केंद्र समन्वयक आनंदा गोसावी, शाळेचे मुख्याध्यापक अमोल खरसांबळे, जे.पी.सिंह, रंजना वनशा, शाळेचे समन्वयक कमलेश इंगळे, अभियंता प्रशांत पिंपळे, देवेंद्र पाटील, आदि उपस्थित होते.

सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाला सुसंगत असे टॅबलॅब आणि ॲक्टिव्हिटी झोन असे दोन उपक्रम सुरु करुन महापालिका शाळांतील मुले स्मार्ट होतील यासाठी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रयोगशील शिक्षण काळाची गरज असल्याचे सांगितले. पाठ्यपुस्तक वाचून ज्या गोष्टी लक्षात रहात नाहीत, त्या पाहिल्यामुळे अधिक लक्षात राहतात. सदर बाब नजरेसमोर ठेवून टॅबलॅब सारखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेची पुर्तता करुन त्यांना स्वयंपूर्ण बनवेल, असा विश्वास आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला. अशाच प्रकारे अत्यंत कल्पक रितीने मांडणी करण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी झोनमधील अनेक गोष्टी खेळता खेळता खूप काही शिकवतील असेही ते म्हणाले. या दोन्ही अत्यंत लाभदायक  सुविधांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

हायवा कंपनीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयास ४० अत्याधुनिक शैक्षणिक टॅब देण्यात आलेले असून शाळेत टॅबलॅब निर्माण करण्यात आलेली आहे. दर्जेदार आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने सदरचा अत्यंत उपयोगी उपक्रम असून डिजीटल लर्नीग टुल्स आणि कन्व्हेजिनियस पीएएल सॉपटवेअर द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने नव्या संकल्पना सोप्या पध्दतीने मांडणी करुन समजाविल्या जातील, अशी महिती हायवा कंपनीचे एमडी पंकज कपूर यांनी दिली. भारत सरकारच्या निपुण भारत या संकल्पनेचे टॅबलॅब मूर्त स्वरुप असून यामुळे महापालिकेचे विद्यालय डिजीटल लर्नींग स्कूल मध्ये रुपांतरीत होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उज्वल कामगिरीचा आढावा घेताना हायवा कंपनीने पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सीएसआर निधीतून टॅबलॅब उपक्रम राबविल्याबद्दल आभार व्यक्त केले.

दरम्यान, ॲक्टिव्हिटी झोन आणि टॅबलॅब या उपक्रमांची यशस्वीता पाहून महापालिकेच्या इतरही शाळांमध्ये सदरचा प्रयोग राबविता येईल, असे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. वास्तुविशारद रेश्मा साठे यांच्याकडून ॲक्टिव्हिटी झोन मधील साहित्याची तसेच कन्व्हेजिनियसचे अक्षत राठी यांच्याकडून टॅबलॅब संकल्पनादारे दिल्या जाणाऱ्या शिक्षण पध्दतीची आयुक्त नार्वेकर यांनी बारकाईने माहिती घेतली.

ॲक्टिव्हिटी झोनमध्ये सापशिडी, बुध्दीबळ, रॉक क्लायबिंग, ॲबॅकस अशा विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आलेली असून सुर्यमालेची आकर्षक प्रतिकृतीही ग्रहांच्या वैशिष्ट्यांसह साकारण्यात आलेली आहे. याद्वारे सुर्यापासून ग्रहांचे अंतर, त्यांच्या फिरण्याची गती, त्यामुळे होणारी दिवस-रात्र अशा विविध वैज्ञानिक बाबींची माहिती मुलांना हसत खेळत घेता येणार आहे. या झोनमधील प्रत्येक साहित्य आणि खेळ मुलांना विज्ञानाची माहिती देणारा तसेच शास्त्राची गोडी वाढविणारा आहे.

१० वी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे, अभ्याससाठी मेहनत घ्यावी, यश तुमचेच आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल येईपर्यंतच्या मधल्या कालावधीत आपल्या मनाचा कल ओळखून आपल्या आवडीचे क्षेत्र पुढील अभ्यासासाठी निवडा असे सांगत आयुक्त नार्वेकर यांनी नववी पर्यंत आपण केवळ एक एक इयत्ता वर चढतो. पण, १० वी च्या परीक्षेनंतर आपण आपल्या जीवनाचा मार्ग निवडतो. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात शिका आणि मोठे व्हा. -राजेश नार्वेकर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

आदिवासी मुलांना शालेय गणवेश आणि सायकलचे वाटप