नवी मुंबई महापालिका तर्फे ‘फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा'चे आयोजन

 ‘फोर्टी प्लस क्रिकेट'मुळे आरोग्याविषयी जागरुकता वाढीस -आ.गणेश नाईक

नवी मुंबई ः आरोग्य जपणुकीचे महत्व जनमानसा आता चांगलेच रुजू लागलेले असून क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकृतीबाबत जागरुक असणाऱ्या खेळाडुंनी मास्टर प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु केलेले ‘फोर्टी प्लस क्रिकेट'चे लोण आता नवी मुंबईतून राज्यभरात लोकप्रिय होत असल्याबद्दल आमदार गणेश नाईक यांनी आनंद व्यक्त केला. ‘फोर्टी प्लस क्रिकेट'मुळे नवी मुंबईच्या गावागावात संघ निर्माण झाले. स्पर्धेमुळे खेळाडू एकत्र आले आणि परस्परांतील संवाद वाढला. सदरची गोष्ट अतिशय चांगली झाल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. तसेच फोर्टी प्लसचे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे व्हावे, अशाही सूचना केल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने घणसोली, सेक्टर-१६ येथे आयोजित दोन दिवसीय ‘नवी मुंबई महापालिका चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा'च्या शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आ. गणेश नाईक यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत स्वतः बॅटींग करीत स्पर्धेचा शुभारंभ केला. याप्रसंगी क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ‘फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशन'चे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील आणि पदाधिकारी नरेश गौरी, लिलाधर पाटील, विकास मोकल, मनोज म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

 विविध खेळांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील असून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजनातून खेळाडुंना त्यांचे क्रीडागुण सिध्द करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून करुन वयाच्या चाळीशीनंतर क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या आरोग्याविषयी जागरुक असणाऱ्या फोर्टी प्लस खेळाडुंना प्रोत्साहित करण्यासाठी ‘नमुंमपा चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा'चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये नवी मुंबई मधील गावांतील ३३ संघ तसेच शहरी भागातील २२ संघ सहभागी होत असून ४ मार्च रोजी, सायं. ६ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. क्रिकेटप्रेमींनी खेळाडुंना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेप्रसंगी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी केले आहे. 

 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

नवी मुंबईकर ओमी केणी यांनी सामनावीर म्हणून पटकावली चार चाकी कार