मित्राची आई

मुशाफिरी 

मित्र ही आपल्या आयुष्यातील मर्मबंधातली ठेव असते. आई आपली असो की मित्राची..ती कधीही वाईट संस्कार मुलांवर करत नसते.  निसर्गाकडून व आपल्या आई-वडिलांकडून लाभलेले हे शरीर निर्व्यसनी, निरोगी, तंदुरुस्त ठेवावे असेच कोणत्याही घरातील माता ही आपल्या मुलांना शिकवत असते. त्या मातेच्या संस्कारांचा आदर सर्वांनी करायला हवा.

    आठवणी कधीही स्थलांतरीत होत नसतात. त्या आयुष्यभर तुम्ही जाल तेथे सोबत येतात. माझे बालपण ज्या कल्याणमध्ये गेले..तेथील मित्राची आई..त्या मित्राप्रमाणेच आम्ही भावंडेही तिला ब म्हणत असू.( ‘आई' साठी ब हे बा किंवा बाय चे अपभ्रंश रुप असावे!) कधीही कुठेही भेट झाली तरी गालावरुन हात फिरवून स्वतःच्या कानाजवळ कडाकडा बोटे मोडणारी माझ्या आयुष्यातील ब ही एकमेव ज्येष्ठ महिला होय. गेल्याच वर्षी ब ने स्वर्गाची वाट धरली. नंतर आम्ही ब च्या प्रेमाला पारखे झालो. कुणी आमच्या गालांवर मायाभरले, सुरकुतलेले, खडबडीत हात फिरवावे असे लाख वाटते..पण ते हात आज राहिले नाहीत. 

आता आमच्यासारखे अनेकजण वयाच्या अशा (साठीच्या आसपासच्या) टप्प्यावर आहोत  की आमच्यापैकी अनेकांचे आई वडिल हे जग सोडून गेले आहेत. ज्यांचे आईवडील आहेत, ते बव्हंशी वय वर्षे ८२-८५ ते ९०-९२ च्या घरात आहेत. अनेकांचे आई-वडील तसेच मामा-मामी, काका-काकी, आत्या, मावशी ही मंडळीसुध्दा देवाघरी गेली आहेत. थोडवयात.. डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणारे, आमच्या गालावर पंजे फिरवून स्वतःच्या कानाजवळ बोटे कडाकडा मोडणारे, ज्यांच्या पायावर डोके  ठेवून शुभाशिर्वाद मिळवावेत असे पायही नातेमंडळीत राहिलेले नाहीत, अशावेळी मित्रांचे माता-पिता हे आमच्यासारख्यांसाठी तीर्थस्वरुप भासल्यास नवल ते काय!

   हे आता मला आठवण्यास कारण काही दिवसांपूर्वीच माझा कल्याणनिवासी शाळासोबती मित्र नितिन सावंत याच्या वडीलांचे झालेले निधन. त्या दिवसांत मी सोलापूर, अवकलकोट, गुलबर्गा भागात असल्याने अंत्यविधीला जाणे शवय झाले नाही, म्हणून चार-पाच दिवसांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईची सांत्वनपर भेट घेतली. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात असे कुणी भेटायला आले तर एरवी शांत दिसणारी घरची गृहिणी धाय मोकलून रडायला लागते. मृताचे गुणगान रडून रडूनच ऐकवते...थोड्या वेळाने शांत होऊन मग नेहमीसारखे बोलते असे चित्र पहायला मिळते. एका ठिकाणी तर मी असे घडल्याचे ऐकले आहे की सांत्वनाला मंडळी गेली तेंव्हा ते कुटुंब जेवत होते. जेवल्यावर तेथील महिला उठली व मृताच्या तस्विरीजवळ बसून जोरजोरात रडायला लागली. मग काही वेळाने शांत झाली व सूनेला तिने सांगितले की यांच्यासाठी चहा आण..आणि सर्वांसोबत तिने चहाही घेतला. मला सांगायला समाधान वाटते की माझ्या मित्राच्या घरी यातले काहीएक घडले नाही. मी बारा-तेरा वर्षांच्या असल्यापासून त्याच्या घरी जात-येत आहे. त्याच्या आई-वडिलांशी माझा निकटचा परिचय आहे. माझा मित्र नितिन याची आई या दुःखातून लवकर सावरली. ६३ वर्षांचे वैवाहिक जीवन सुकर केलेला जोडीदार एक ना एक दिवस साथ सोडून जाणार हे त्या माऊलीने खेळकरपणे स्विकारले होते. या मित्राचे वडील ९२ व्या वर्षी गेले होते. त्यांनी स्वतःचे मरणोत्तर विधी बद्रीनाथ येथे स्वहस्तेच केल्याचेही यावेळच्या चर्चेतून समजले. मरणानंतर कोणतेही विधी करुन नयेत अशी त्यांची सूचनाही होती. पण लोकापवाद अथवा अन्य कारणांमुळे ते विधी करण्यात येणार होते.

   नितिनची आई स्वतः चांगली वाचक, चांगली श्रोता असल्याने त्या माऊलीला अनेक नव्या, कालसापेक्ष, अद्ययावत बाबींची जाण आहे. भावनेच्या आहारी न जाता व्यवहार्य कसे वागावे याची तिला माहिती आहे. नवनव्या पाककृतींची माहिती लिहुन काढण्याचा छंद आहे. त्यामुळे मी त्यांना नेहमी डायऱ्या, पुस्तके देत असे व त्यांचा तिथे सकारात्मक उपयोगही केला जात असल्याचे मी पाहिले आहे. मी माझ्या निवडक मित्रमैत्रीणींना घेऊन त्यांना भेटायला गेलो तेंव्हा मोकळ्या वातावरणात त्या माऊलीशी आमची चर्चा झाली. यात एक विषय वृध्दाश्रमांची उपयुक्तता हाही होता. वृध्दाश्रम का असायला हवेत, याबद्दल त्या मातेने ठाम व सुस्पष्ट विचार मांडले. त्याबद्दल नंतर केंव्हातरी लिहीन. आमची आई आज हयात नाही. मी नितिनच्या आईमध्ये माझी आई शोधायचा प्रयत्न करतो. माझे बालपण, तरुणपण कल्याणमध्ये गेले. त्या वयातील आठवणी कुणीही आयुष्यभर विसरत नसते. आमच्या घरासमोरच पावशे परिवाराचे घर होते..म्हणजे आजही आहे, आम्ही मात्र तेथून नवी मुंबईत स्थलांतरीत झालो. पण आठवणी  त्या त्या जागी रेंगाळतात, थबकतात, तुम्हाला कातरवेळी बेचैन करत त्या आयुष्यभर तुम्ही जाल तेथेही सोबत येतातच. तेथील मित्राची आई..तिचे नाव सोनाबाई. विविध स्थानिक भाषांत आईला मा, बा, ब, बाय, आय, आयव अशी विविध संबोधने आहेत. सोनाबाईला तिची मुले ब म्हणत..( ब हे बा किंवा बाय चे अपभ्रंश रुप असावे!) आम्ही भावंडेही तिला ब म्हणत असू. कधीही कुठेही भेट झाली तरी गालावरुन हात फिरवून स्वतःच्या कानाजवळ कडाकडा बोटे मोडणारी माझ्या आयुष्यातील ब ही एकमेव ज्येष्ठ महिला होय. मी, माझ्या दोन्ही बहिणी..आम्ही वयाने मोठे झालो, आम्हाला मुले झाली, बहिणींकडे तर जावई, सूना, नातवंडेही आली. पण ब ने आमचे लाड करताना आमच्या गालांवरुन हात फिरवणे कधीही चुकले नाही. ब ला मुलगी नसल्याने तिच्या घरी माझ्या दोन्ही बहिणींचे खूप लाड होत असत. ब च्या हातची तांदळाची मऊसुत भाकरी, सुक्या बोंबलाचे कालवण, मटण यांचा आस्वाद मी कितीदातरी घेतला असेल. साऱ्या कॉण्टिनेण्टल डिशेस त्यापुढे फिक्याच! कोणतेही शालेय शिक्षण न घेतलेली ब व्यवहारी जगाचे ज्ञान मात्र व्यवस्थित जाणून होती. उतारवयात तिला पांडुरंगशास्त्री आठवलेप्रणित स्वाध्याय परिवाराचा मार्ग गवसला. ती स्वाध्याय परिवारात सुमारे तीस वर्षे होती व तेथील तत्वज्ञान विद्यापीठच्या विद्या प्रेमवर्धन परिक्षांची प्रमाणपत्रं तिने स्व.पांडुरंगशास्त्री यांच्या हस्ते स्विकारली आहेत. विविध धार्मिक पर्यटन तिने केले. मुलांनाही तो मार्ग दाखवला. गतवर्षी ब ला आजाराने गाठले. शरीर थकले होतेच. २७ मे २०२२ रोजी ब ने नश्वर देहाचा त्याग करुन स्वर्गाची वाट धरली. तिच्या अंत्यविधीला स्मशानात जमलेल्या लोकांसमोर मला बोलावे लागले. डोळ्यांत आसवांची गर्दी होती; पण ते दिसू न देता जे सुचेल ते बोललो. नंतर आम्ही ब च्या प्रेमाला पारखे झालो. कुणी आमच्या गालांवर त्यांचे मायाभरले, सुरकुतलेले, खडबडीत हात फिरवावे असे लाख वाटते..पण तसे हात आज राहिले नाहीत.

   आणखी एक शाळासोबती शरद ननावरे..पुन्हा मुक्काम पोस्ट कल्याणच! शाळेत असताना त्याच्या घरी जाण्याचा योग येई. आपल्या मुलाचे सारे मित्र त्याच्या माऊलीच्या व्यवस्थित लक्षात होते. ग्रामीण भागात बालपण गेलेल्या महिलांनी मुलांचे लाड करणे म्हणजे काय असते ते मी शरदच्या आईकडून माझ्या वयाच्या साठीतही अनुभवले आहे. मुख्य म्हणजे आम्ही मित्र मैत्रीणी आजही त्याच्या घरी जमलो तर त्या माऊलीला आमच्याशी गप्पा करणे, जु्‌न्या आठवणी काढणे, आमच्या वयाचेच होऊन थट्टा मस्करी करणे यात कोणताही संकोच वाटत नाही. वयोमानपरत्वे त्यांचेही शरीर थकले आहे, नजर काहीशी क्षीण झाली आहे; पण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे हात अजूनही खंबीर आहेत. अलिकडच्या काळात बोकाळलेल्या सोशल मिडियामुळे कुणी कुणाकडे फारसे न जाण्याच्या युगात आम्ही शाळकरी सोबती मात्र व्हर्च्युअल-आभासी भेटींपेक्षा थेट भेटींवर विश्वास ठेवतो. कारण? ईमोजी मिळतो, स्मायली मिळते, वेगवेगळ्या प्रसंगांचे फोटो-व्हिडिओ आणि शुभेच्छा संदेश मिळतात..पण आपल्या डोवयावर हात ठेवून शुभचिंतन करणारे, थेट स्पर्श करणारे ॲप अजून कुणी शोधले नाही, शोधूही शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्याच व्यवितमत्वांच्या सहवासात जायला हवे.

   या सगळ्यात मला अतीव दुःख देणारी बाब म्हणजे संजय गवळी आणि संतोष जांगरे या माझ्या दोन मित्रांच्या मातापित्यांच्या निधनाबद्दलची माहिती योग्य वेळेत न मिळणे ही होय. दोघेही आपापल्या विश्वात रमले. नंतर दृष्टीकोनातील अंतरामुळे त्यांचा माझ्याशी फारसा निकटचा संपर्क राहिला नाही. त्यामुळे त्यांच्या तीर्थरुपांबद्दलचे दुःखद वृत्त मला प्राप्त होईपर्यंत खूप वर्षे  लोटली होती. या दोघांच्याही मातांच्या प्रेमळ सहवासाची मी लाभार्थी राहिलो आहे. त्यांच्या हातचे खाल्ले आहे. संजयच्या वडीलांना ते वृध्दाश्रमात असताना मृत्यू आल्याचे मला समजले तोवर मध्ये चार पाच वर्षे उलटून गेली होती. त्यानंतर मी जेव्हा त्याला भेटलो तोवर गुटका, तंबाखू, दारु यांच्या अतिरेकी सेवनाने त्यालाही  कॅन्सरने गाठले आणि संतोषला किडनी विकाराने. त्यावर खूप महागडे उपाय करुनसुध्दा माझे हे दोघेही मित्र वाचू शकले नाहीत.  वयाच्या पन्नाशीतच त्यांची इहलोकाची यात्रा अकाली संपली. आजमितीस माझ्याकडे या दोघांच्या व त्यांच्या मातापित्यांच्या केवळ आठवणीच शिल्लक आहेत. मित्र ही आपल्या आयुष्यातील मर्मबंधातली ठेव असते. निसर्गाकडून व आपल्या आई-वडिलांकडून लाभलेले हे शरीर निर्व्यसनी, निरोगी, तंदुरुस्त ठेवावे असेच कोणत्याही घरातील माता ही आपल्या मुलांना शिकवत असते. त्या मातेच्या संस्कारांचा आदर सर्वांनी करायला हवा. मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांना हीच विनंती आणि भरभरुन शुभेच्छा.  

 - (मुशाफिरी) राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : निमित्त.. आंतरराष्ट्रीय महिला दिन