मुशाफिरी

देव, देवदासी, दलाली आणि दुकानदारी

  ‘देवासमोर सारे सारखेच' हे जेवळ म्हणण्यापुरतेच नसले पाहिजे. प्रत्यक्षात सर्वच धर्मात महिला या धर्माच्या व्यापाऱ्यांच्या सर्वाधिक बळी ठरल्या आहेत. त्यांच्याशी धर्म हे बव्हंशी अन्यायाने, भेदभावाने वागले आहेत. अलिकडच्या काळात अनेक धर्मस्थळांना आर्थिदृष्ट्या चांगले दिवस आले आहेत. त्या धनराशीचा वापर देवस्थानांची स्वच्छता, सुरक्षा व देवाच्या भेटीसाठी येणाऱ्या महिला, देवाच्या नावावर सोडून दिलेल्या महिला यांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठीही व्हायला हवा. केवळ धर्माच्याच कोषात गुरफटून गेल्यावर किलोभर पिठासाठी किती आटापिटा करावा लागतो हे आपल्यासोबतच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानच्या आजच्या भिकमाग्या स्थितीकडे पाहिल्यास लक्षात येते.  

   गेल्या महिन्यात बुंदेलखंडी बागेश्वर शास्त्री (?) आणि अंधश्रध्दा निर्मुलन समिती यांच्यात चमत्कारांवरुन आव्हान, प्रतिआव्हान या स्वरुपाची बरीच खडाखडी झाल्याचे आपण साऱ्यांनी पाहिले. तुकाराम महाराजांबद्दल त्याने अनुदार उद्गार काढून नसता वाद ओढवून घेतला. या वादाला अनेकांनी जातीय-धार्मिक कोनातूनही पाहिले. त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. ‘तुकाराम महाराज बहुजनांपैकी होते व बागेश्वर हा अभिजनांपैकी ! म्हणून त्याने असे बोलायचा गाढवपणा केला' येथपासून ते ‘बागेश्वरच्या या बोलण्यामागे प्रतिगामी शक्ती कार्यरत आहेत, त्यांनी नेहमीच बहुजनांच्या श्रध्दा, श्रध्दास्थाने, नामी व्यवितमत्वांच्या अवमानात धन्यता मानली' असे म्हणणारेही अनेकजण निघाले.

   हा न संपणारा वाद आहे. श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्यातील सीमारेषा फारच पुसट आहे. या वादाने अनेकांचे बळी घेतले आहेत. डॉ नरेंद्र दाभोलकर, डॉ एम एम कलबुर्गी, प्रा. गोविंद पानसरे यांचे तर यावरुन खून पाडण्यात आले. जारण, मंत्र, तंत्र, चेटुक, भानामती वगैरे करतात या नावाखाली अनेकांना गावोगावी-खेडोपाडी ठेचून, हालहाल करुन, बहिष्कार टाकून मारले जाते. यापैकी काहींच्याच बातम्या होतात, सगळ्याच बाबी प्रसारमाध्यमांतून वाचायला मिळतात असे नाही. प्रशासकीय यंत्रणा..ज्यांनी  तटस्थ वागून जनसामान्यांचे हितरक्षण करावे अशी अपेक्षा असते, त्यातीलही अनेक उच्चाधिकारी हे जागोजागीच्या कथित बाबा-बुवा-महाराजांच्या पायांवर लोटांगणे घेतात, हेही लोकांनी पाहिले आहे. देव मानावा की मानू नये हा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण त्या मानण्याचा समाजाला उपद्रव होत असेल, भ्रामक समजुती पसरवून लोकांची फसवणुक केली जात असेल, कायदा-सुव्यवस्था धोवयात आणली जात असेल, देवाधर्माच्या नावावर कुणाच्या जिवीताला धोका व सार्वजनिक जीवनाला धवका पोहचेल असे घडत असल्यास तो प्रश्न केवळ व्यक्तीगत रहात नाही. जातीपातीच्या उतरंड्या असलेल्या या देशाला साधू-गोसावड्यांचा देश असेही हिणवले जात होते. इंग्रजांनी या देशात सर्वप्रथम शिक्षण आणले व महिला आणि सर्वसामान्यांना ग्रंथ, पुस्तक वाचण्यास मोकळीक मिळाली. शिक्षणाने व्यक्तीमत्व विकास, समाजाची उन्नती होते,  देशाची भरभराट होते. केवळ धर्माच्या कोषात गुरफटून गेल्यावर किलोभर पिठासाठी किती आटापिटा करावा लागतो हे आपल्या सोबतच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानच्या आजच्या भिकमाग्या स्थितीकडे पाहिल्यास लक्षात येते.

   देव मानू नका, सरसकट सगळ्याच रुढी हद्दपार करा, पूजा-अर्चा सगळ्या बाद करा असे कुणीही म्हणत नाही. मात्र त्यांचे अवडंबर केले जाऊ नये, देवांची दलाली-एजंटगिरी करत लुबाडणाऱ्यांचे स्तोम माजवू नका ही अपेक्षा गैर नाही. दशक्रिया या नावाच्या मराठी चित्रपटात या दलाल लोकांची गुंडगिरी, गँंगबाजी, गट-तट पाडून थेट मारामाऱ्या करण्यापर्यंतच्या वृत्तीचे यथार्थ चित्रण आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी या कसलेल्या कलावंतांनी आपल्या अभिनयाने त्यात गहिरे रंग भरले होते. आपल्या धर्मातील काही उणीवा, त्रुटी, दोष, कालबाह्य रिती, स्त्रीयांसाठी काही जाचक पध्दती असतील तर त्या आपणच दूर केल्या पाहिजेत. त्या हटवेण्यासाठी चीन, पाकिस्तान किंवा इंग्लंड अमेरिकेतून कुणी येणार नाही. जुनाट, बुरसटलेल्या, अनाडी प्रकारच्या अंधविश्वासातून महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या काही भागात वाघ्या, मुरळी, देवदासी पहायला मिळतात. या महिन्यात मी तुळजापूर, अक्कलकोट, सिध्देश्वर, गाणगापूर अशा ठिकाणी जाऊन आलो. तेथे अन्नछत्र, पोटभर महाप्रसाद यांची व्यवस्था चांगली आहे.  तुळजापूर देवस्थान परिसरात आजही अशा मुरळ्या - नवस बोलण्यातून देवाला सोडून दिलेल्या विविध वयोगटातील महिला पहायला मिळतात. जेजुरी, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी तसेच निपाणी, कारवार, धारवाड, बेळगाव, सौंदत्ती अशा सीमावर्ती भागात हे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जाते. अपत्य होत नसलेली जोडपी म्हणे मुले होण्यासाठी देवाला नवस बोलतात व पहिले जे मूल होईल ते देवालाच अर्पण करतात. ते मुलगा असेल तर वाघ्या आणि मुलगी असेल तर तिला मुरळी असे संबोधले जाते. शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि विज्ञान, आरोग्यशास्त्राने लावलेले नवनवीन शोध यामुळे यांचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र या आधीच्या अनेक वर्षात अशा देवाला सोडलेल्या अपत्यांचे प्रमाण अधिक होते, त्यातील अनेक वाघ्ो व मुरळ्या आता वयोवृध्द झाल्या असून देवस्थानाच्या आवारात लोकांकडे हात पसरलेल्या त्यांना अवस्थेत मी पाहतो तेंव्हा मनापासून वाईट वाटते. त्यांच्या आईबापांच्या कालबाह्य, बुरसटलेल्या, प्रतिगामी विश्वास-श्रध्दा-विचारांचा परिणाम म्हणून या लोकांना जे भोगावे लागते ते खूपच दाहक आहे.

   कुणी म्हणेल की तुम्ही नेहमीच आपल्या धर्मातील त्रुटी दाखवता..जरा बाकीच्या धर्मांमधील वाईट बाबीही सांगा. त्यांच्यासाठी...मुस्लिम धर्मात तलाक दिलेल्या बाईला पुन्हा पहिल्या नवऱ्याकडे यायचे असेल, त्यालाच पती म्हणुन परत स्विकारायचे असेल तर मध्ये आणखी एक लग्न करावे लागते. (हलाला? ) आणि त्या नवऱ्याकडे राहुन मगच पहिल्या नवऱ्याकडे यावे लागते.  प्रख्यात दिवंगत अभिनेत्री मीनाकुमारी हिच्याबद्दलची माहिती मिळवून वाचा. त्यात या प्रकाराबद्दल विस्तृतपणे वाचायला मिळेल. अशाच काही बुरसटलेल्या प्रथा ख्रिस्ती धर्मातही आहेत. वैषम्य याचे वाटते की धर्म कोणताही असो..त्यातील अधिकात अधिक जाचक बाबी या केवळ महिलांनाच सोसाव्या लागतात. पुरुष यातून मात्र अलगद सुटतात.

   कोणत्याही धर्माचे देवस्थान हे अनेकांना उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करुन देत असते. प्रवासी वाहने, हॉटेल, खानावळ, नारळ-हार-फुले, पूजेचे साहित्य, कपडे, भांडी, प्रसाद, खेळणी, इस्त्री-लॉण्डी्रचे दुकान, साबण-चादरी-तेलविक्रेते अशी ही मोठी साखळी आहे, ज्यांना यामुळे रोजगार लाभतो. हे लिहिताना मला यातना होत आहेत की काही धर्मस्थळांना वेश्यांचाही विळखा पडल्याला कित्येक वर्षे लोटली आहेत. शिर्डीसारखे सर्वधर्मीय मानले जाणारे तीर्थस्थळही यातून सुटलेले नाही. अशा ठिकाणी अन्य दुकानांसारखा देहव्यापाराचाही धंदा जोरात चालतो. घरातून पळून गेलेल्या, प्रियकराकडून फसवणूक झालेल्या, घरच्यांनी हाकलून दिलेल्या, आई-वडिलांचे अकाली निधन झाल्यावर अन्य नातेवाईकांनी सांभाळ न केल्याने निराधार बनलेल्या अशा विविध प्रकारे नाडलेल्या, फसलेल्या महिला दुसरे काहीच करण्यासारखे नाही अशा गैरसमजूतीतून वेश्याव्यवसायात उतरतात आणि आपले शरीर वखवखलेल्या गिऱ्हाईकांना ओरबाडण्यासाठी त्यांच्या हवाली करतात. जवानीचे दिवस असतात तोवर ठीक..यानंतर मात्र त्यांच्यापैकी अनेक जणी विविध रोगांच्या शिकार होतात. त्यांची आजारी पडल्यावर, वृध्दापकाळी देखभाल करण्यासाठी कुणीही ‘आपले' असे नसते. अशांची जीवनयात्रा अशा देवस्थानांच्या आजूबाजूच्या फूटपाथवर, रस्त्यावर अकाली संपते. देवाच्या दारी अनेक भिकारी हात पसरताना मी पाहतो...तेंव्हा आपण दूरदूरहून तेथे पूजा-अर्चा, पुण्यप्राप्ती, देवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जातो..पण देवांच्या दारातच रात्रंदिवस असणाऱ्या या अभाग्यांकडे मात्र देवाचेही लक्ष नसते, याचे वाईट वाटते. अनेक देवालयांत भक्त मंडळी देवदर्शन झाल्यावर (किंवा दर्शन घेतल्याच्या काही सेकंदातच तेथील बडवे, पूजारी, सुरक्षा रक्षक यांनी गाभाऱ्यासमोरुन अक्षरशः ढकलून बाहेर काढल्यावर) देवळातील जमिनीवर काही मिनिटे बसतात व तेथील वातावरण, पावित्र्य, मांगल्य मनात जपू पाहतात. यावेळी मी गाणगापूरला पाहिले की तेथे कुटुंबासमवेत काही लोक बसले होते..आणि तेथील एका खांबाजवळ कुत्र्याने घाण करुन ठेवल्याचे माझ्या लक्षात आले. कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यात असणारे गाणगापूर हे दत्ताचे पवित्र स्थान मानले जाते. तेथे विविध पाट्या, नावे कानडी व मराठीत पहायला मिळतात. दत्तमंदिर, कलेश्वर मंदिर, भिमा-अमरजा संगम, औदुंबर वृक्ष, अष्टतीर्थ अशी विविध स्थाने तेथे आहेत. कर्नाटकी सरकारने आणि या देवस्थानांच्या व्यवस्थापकीय समितीने तेथील स्वच्छतेची अधिक काळजी घ्यायला हवी. या मंदिराला  भवतगणांकडून मिळणाऱ्या विविध स्वरुपाच्या देणग्या, दान यातून मिळणारे उत्पन्न नवकीच या सत्कार्यी लावता येईल.

   आपल्यातल्या शहरी भागातील लोकांना घासाघीस अर्थात बार्गेनिंग करायची सवय असते. त्यातही माझ्यासारख्या जन्माने अट्टल मुंबईकराला घासाघीस हा जन्मसिध्द हक्कच वाटतो. पण मी तुळजापूर, गाणगापूर परिसरात पाहिले की तेथे पूजासामान, नक्षीदार कलाकुसरीची भांडी, भेटीदाखल घ्यायच्या वस्तू विकणाऱ्या काही दुकानदारांकडे आपण तीनशेची वस्तू अडीचशेला मागितली तर तो त्यांना राष्ट्रीय अपमान वाटतो. ते तुम्हालाच उलट चार शब्द ऐकवतील. ‘तीन-चार किंवा डझनभर वस्तू घ्यायच्यात, काही कमी करा'  असे म्हणूनही ते लोक फारशी किंमत करायचे औदार्य दाखवीत नाहीत. मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे परिसरातील दुकानदारांकडे जा आणि किंमत कमी करुन वस्तू मागा..ते नक्कीच ग्राहकांचा मान राखतील. त्यांच्याशी उध्दट वर्तन करणार नाहीत. ‘ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा' हे केवळ पाटीवर लिहीण्यापुरते नाही, तर खरंच ग्राहकांना तृप्त करा, त्यांना रास्त भावात द्या, ते पुढच्या वेळी तुमच्याच कडे येतील व येताना सोबत आणखी ग्राहक आणतील असा दृढ विश्वास आपल्याकडच्या दुकानदारांना असतो. कमी नफा व अधिकाधिक उलाढाल (व त्यातून मिळणारा शेवटी मोठा नफाच!) हे आपल्याकडील दुकानदारांचे सूत्र असते.

   आपल्या तमाम देवी-देवतांनी त्यांच्या नावावर काही दलालांनी, दुकानदारांनी चालवलेल्या जुनाट, कालबाह्य, टाकाऊ  प्रथा, रुढी, परंपरा त्यागून ‘माणसाने माणसाशी माणसासम विवेकी पध्दतीने वागण्यासाठी' सर्वांना आशीर्वाद व सद्‌बुध्दी द्यावी  हीच प्रार्थना! 

- राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

Read Next

मित्राची आई