शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

तुर्भे ः नवी मुंबई महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे. शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन देण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यासाठी प्रथम ३१  जानेवारी आणि त्यानंतर १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन पध्दतीनेअर्ज करण्यात विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे विलंब होत असल्याच्या तक्रारी महापालिकडे करण्यात आल्या आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत उपलब्ध होणे, आदि कारणे आहेत.

दुसरीकडे महापालिका समाज विकास विभागाकडे आता वर्ष २०२१-२२ साठी २३ हजारापर्यंत आणि सन २०२२-२३ साठी २५ हजारापर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी या योजनेसाठी ३७ हजार अर्ज प्राप्त झाले होते, अशी माहिती उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली. दरम्यान, अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना येत असलेल्य अडचणी लक्षात घेऊन २८ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय आयुक्तांच्या मान्यतेने घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

दहावी, बारावी परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना