महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा

‘वेस्ट टु बेस्ट प्रोजेक्ट'द्वारे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मुक्त वाव - आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः शहर स्वच्छतेमध्ये सर्व घटकांचा सहभाग असावा यादृष्टीने नवी मुंबई महापालिका विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर राहिली असून अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम महापालिका शालेय विद्यार्थ्यांकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार झाले तर त्याचा प्रभाव संपूर्ण आयुष्यभर राहतो. सदर बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता प्लास्टिमॅन, ड्राय वेस्ट बँक सारख्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांप्रमाणेच स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत असते. या सर्व स्पर्धांना मिळणारा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन अशाच प्रकारचे आगळेवेगळे उपक्रम राबविण्यावर भर  दिला जात आहे. अशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ‘वेस्ट टु बेस्ट प्रोजेक्ट' महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते ९ वी मधील विद्यार्थ्यांकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून टाकाऊतून टिकाऊ अशी संकल्पना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारली जात आहे.

‘वेस्ट टु बेस्ट प्रोजेक्ट' असे या स्पर्धात्मक उपक्रमाचे शिर्षक असून २३ फेब्रुवारी पर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करुन सादर करावायाच्या आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक महापालिका शाळेतून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत प्राथमिक गट, इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक गट आणि इयत्ता नववी
माध्यमिक गट अशा ३ गटांतून प्रत्येकी ३ अशाप्रकारे एकूण ९ सर्वोत्तम प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक शाळांतून निवडलेले ९ प्रकल्प अंतिम फेरीसाठी २४ फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालय स्तरावर पाठविण्यात येणार असून त्याठिकाणी त्यांचे मूल्यमापन होऊन अंतिम विजेत्या प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करताना प्लास्टिक कचरा, टाकाऊ लाकूड, काच, पेपर अथवा कार्डबोर्ड, ई-वेस्ट अशा विविध स्वरुपातील कचरा म्हणून टाकून दिल्या जातील, अशा साहित्याचा वापर करन कल्पकतेने आकर्षक वस्तू तयार करणे अपेक्षित आहे. या माध्यमातून मुलांमधील कल्पनाशक्तीला चालना मिळणार असून कचऱ्याचे मूल्य मुलांच्या मनावर नकळतपणे बिंबवले जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका शाळांतील प्रत्येक मुलाने यामध्ये सहभागी व्हावे. आपल्या सृजनशीलतेला मुक्त वाव द्यावा आणि त्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रोत्साहित करावे. -राजेश नार्वेकर, आयुक्त  -नवी मुंबई महापालिका.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ