विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ

 जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ४०० जलतरणपटू सहभागी

नवी मुंबई ः विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन खेळाडुंना त्यांचे कौशल्य सिध्द करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात नवी मुंबई महापालिका कटीबध्द आहे. या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तर गाजविणारे नवी मुंबईकर खेळाडू घडतील, असा विश्वास महापालिका क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी व्यक्त केला.

वाशी येथील फादर ॲग्नेल जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी उपायुवत पोटरे आपले मनोगत व्यक्त करीत होते.

याप्रसंगी उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्यासह साहसी जलतरण क्षेत्रातील राष्ट्रीय तेनझिंग नोर्गे पुरस्कार विजेते जलतरणपटू  शुभम वनमाळी, ‘फादर ॲग्नेल शिक्षण संस्था'चे प्रमुख फादर अल्मेडा, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू रुपाली रेपाळे, गोकुळ कामथ, ‘मुंबई विभाग व्हॉलीबॉल असोसिएशन'चे सचिव धनंजय वनमाळी, राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक संतोष पाटील, आदि उपस्थित होते.

लहानपणी नवी मुंबई महापालिकेच्या जलतरण स्पर्धेत सहभागी होत होतो, तेव्हापासून मिळालेल्या प्रोत्साहनाचा माझ्या आजवरच्या यशात महत्वाचा वाटा आहे. यंदा ४०० हुन अधिक जलतरणपटुंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून सदर गोष्ट आनंदायी असल्याचे मत जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी व्यक्त केले.

नवी मुंबईतील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असून महापालिका विविध स्पर्धांच्या नियमित आयोजनातून खेळाडुंना आपला खेळ सिध्द करण्याची संधी देण्याचे चांगले आणि महत्वाचे काम करीत असल्याचा विशेष उल्लेख फादर अल्मेडा यांनी यावेळी मनोगतात केला.

कोव्हीड प्रभावित दोन वर्षांच्या कालावधीनंतर या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न होत असल्याने यामध्ये सहभागासाठी मुले आणि युवकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. यावर्षी ४०० हुन अधिक जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, अशी माहिती महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

नवी मुंबईकर जलतरणपटू रिषभ दास याचा विशेष सत्कार