नवी मुंबईकर जलतरणपटू रिषभ दास याचा विशेष सत्कार

महापालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अथर्व जरंगे खुल्या गटाचा चॅम्पियन

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये खुल्या गटात अथर्व जरंगे, १६ वर्षाखालील मुलांच्या गटात रिषभ दास, १४ वर्षाखालील मुलांच्या गटात विहान जेजुरकर तर  वर्षाखालील मुलींच्या गटात अहविहा गांधी यांनी चॅम्पियनशिपचा सन्मान स्विकारला. त्याचप्रमाणे १२ वर्षाखालील मुलांच्या गटात तोशल भिरुड तर मुलींच्या गटात अमिता कुडवा हिने चॅम्पियनशिप पटकाविली. १० वर्षाखालील मुलांच्या गटात रायन सय्यद आणि मुलींच्या गटात निधी सामंत यांनी तर ८ वर्षाखालील मुलांच्या गटात इवान शाह आणि मुलींच्या गटात अलिसिया शेट्टी यांनी चॅम्पियनशिपचा चषक संपादन केला.

सदर नवी मुंबई महापालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धकांनी सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत विजेत्या जलतरणपटुंना महापालिका क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू तथा ‘ठाणे जिल्हा जलतरण असोसिएशन'चे सचिव गोकुळ कामथ आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटू ऋतुजा उदेशी यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नुकत्याच भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स-२०२२ मध्ये प्री रिलेमध्ये सुवर्ण, मेडली रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये कांस्यपदक पटकाविणाऱ्या रिषभ दास या नवी मुंबईकर जलतरणपटुचा विशेष सन्मान करण्यात आला.

जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक, बटरपलाय, ब्रेस्टस्ट्रोक, फ्री स्टाईल आणि इंन्डिइज्युअल मिडले या ५ जलतरण प्रकारात सदर जिल्हास्तरीय स्पर्धा वाशीतील फादर ॲग्नेल शिक्षण संकुलच्या जलतरण तलावात ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाली.

८ वर्षाखालील मुले-मुली, १० वर्षाखालील मुले-मुली, १२ वर्षाखालील मुले-मुली, १४ वर्षाखालील मुले-मुली, १६ वर्षाखालील मुले-मुली तसेच खुला गट पुरुष आणि महिला अशा १२ वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेत्या प्रथम ३ क्रमांकाच्या स्पर्धकांना विजेतेपदाचे पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक स्पर्धा प्रकारांतील विजेतेपदाच्या क्रमांकानुसार गुणांकन करण्यात येऊन सर्व स्पर्धा प्रकारातील गुणांचे एकत्रीकरण करुन प्रत्येक वयोगटात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या जलतरणपटूला त्या गटाच्या चॅम्पियनशिपचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

दरम्यान, कोव्हीड कालावधीतील २ वर्षांनंतर सदर जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याने मुलांप्रमाणेच पालकही मोठ्या उत्साहाने आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

राज्यातील नामांकित कुस्तीगिरांच्या खेळाचा नवी मुंबईत थरार